Saturday, July 5, 2014

ड्रेस्डेन - प्राग - ४ (अंतिम)

ड्रेस्डेन - प्राग - १
ड्रेस्डेन - प्राग - २
ड्रेस्डेन - प्राग - ३

सहलीचा शेवटचा दिवस उगवला. सॅक्सॉन स्वित्झर्लंड हा ड्रेस्डेन पासून अंदाजे पाउण तासावर असणारा परिसर. एल्बं नदी, आजूबाजूचे डोंगर, आणि वर्षानुवर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेतून, झीज होऊन तयार झालेले उंचच उंच खडक असा हा परिसर. अठराव्या शतकात स्वित्झर्लंड मधले दोन कलाकार त्यांच्या काही कामासाठी जेव्हा या भागात आले, तेव्हा त्यांना दूरवर हे डोंगर दिसले. हा निसर्ग आणि हे डोंगर त्यांना त्यांच्या मायभूमीशी साधर्म्य साधणारे वाटले. म्हणून त्यांनी या परिसराला आधी जर्मन स्वित्झर्लंड नाव दिले. कालांतराने त्याची ओळख सॅक्सॉनी हे या राज्याच्या नावावरून सॅक्सॉन स्वित्झर्लंड अशी झाली. या परिसरातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे बास्टाय (Bastei). हजारो वर्षांपूर्वी झीज होऊन तयार झालेली ही उंचच उंच अशा खडकांची रांग. येथील अद्भुत निसर्गाने अनेक चित्रकारांना आपल्याकडे आकर्षित केले. त्याचबरोबर अनेक साहसी लोकांसाठी रॉक क्लाइम्बिंग करता हा परिसर प्रसिद्ध होता. राथेन (Rathen) हे या ठिकाणच्या पायथ्याचे गाव. नदीच्या एक काठावर हे गाव आणि दुसऱ्या काठावर बास्टाय. गाडीने या ठिकाणी पोहोचलो. इथपर्यंत येण्यासाठी ड्रेस्डेन हून ट्रेन देखील आहेत. ट्रेन किंवा गाडीने येउन पुढे नदीच्या पलीकडच्या बाजूला जाण्यासाठी फेरी आहे.
राथेन चा पायथा आणि फेरीतून दिसणारा परिसर



इथे नदीचे पात्र फार मोठे नाही. लगेचच दुसऱ्या बाजूला पोहोचलो. पुढे वरपर्यंत जाण्यासाठी मार्ग आहेत. एक पायऱ्यांचा मार्ग आहे, काही वेगवेगळ्या अंतराचे चढत जाण्याचे मार्ग आहेत. याविषयीची सगळी माहिती लिहिलेले फलक आहेत. आम्हाला वेळेचा अंदाज घेता पायऱ्यांचा मार्ग सोयीचा होता. त्याप्रमाणे निघालो.
सकाळी लवकरची वेळ असल्यामुळे गर्दी नव्हती. एकीकडे वाहत जाणारी एल्बं नदी, तिच्या तीरावर वसलेली कौलारू घरे, दूरवरची शेतं आणि एका बाजूला उंचच उंच खडक. थोड्या थोड्या अंतरावर आजूबाजूचे बघण्यासाठी जागा केलेली आहे. मधेच एखादा उंच खडक. त्यावर पुन्हा चढून जाण्यासाठी पंधरा वीस पायऱ्या, अरुंद वाट आणि वरून दिसणारे विहंगम दृश्य. त्यात भर म्हणून दूरवर दिसणारी रेपसीड ची शेते आणि वरून मधूनच डोकावून जाणारा सुर्य. आजूबाजूला सगळी जर्मन वानप्रस्थाश्रमी मंडळी, काहींच्या सोबत त्यांची नातवंडे, काही आज्यांचा ग्रुप, त्यांची चालणारी खुसुर फ़ुसुर आणि या सगळ्यांचा उत्साह बघून आनंदित झालेलो आम्ही. मधेच अशा दुसऱ्या ठिकाणाहून दिसणारे पर्यटक. अशा अनेक जागांवरून आजूबाजूचा परिसर न्याहाळून परत पुढचा मार्ग सुरु.



राथेन स्थानकाहून नुकतीच निघालेली ट्रेन. ड्रेस्डेन प्राग हा लोहमार्ग या भागातून जातो. 


हळूहळू हे खडक अधिकाधिक दिसू लागतात. जवळ दिसू लागतात. चढत चढत वर पोहोचलो की वर लागतो तो हा बास्टाय पूल. अशा अनेक खडकांना एकत्र बांधण्यासाठी आधी येथे लाकडी पूल बांधला गेला. १८५१ साली हा पूल पुन्हा ने नवीन बांधण्यात आला.
पुलाची सुरुवात.


पुलावरून दिसणारे दृश्य आणि दुसऱ्या बाजूला दिसणारे पर्यटक



इथेच एक किल्ला होता जो नामशेष झाला. तिथून अजून वेगळा नजारा दिसतो म्हणून या एवढ्या भागात जाण्यासाठी नाममात्र तिकीट आहे. उर्वरीत संपूर्ण परिसरातला प्रवेश विनामूल्य आहे. इथे काही छोटे पूल बांधले आहेत.


किल्ल्याच्या बाजूने दिसणारा बास्टाय पूल.

अंधश्रद्धा जगात सगळीकडे आहेत हे पुन्हा बघायला मिळाले. पुलावर उभे राहून दोन फुट पलीकडे असणाऱ्या या कपारीत पैसे गेले तर इच्छा पूर्ण होते म्हणून अनेक लोक नशीब आजमावत होते. बाकी ठिकाणी पै पै चा हिशोब ठेवणारे जर्मन्स, इथे मात्र सढळ हस्ते दान करीत होते. आमच्या समोर तरी कुणाचेही पैसे तिथे पडले नाहीत.


पुलावरून पुढे गेलो की पुन्हा प्रत्येक बाजूने वेगळे खडक आणि या पुलाचा वेगवेगळ्या उंचीवरून देखावा दिसतो.



वेगवेगळ्या बाजूने सगळा परिसर बघून झाला. आता घरी परतण्याची वेळ झाली होती. इथपर्यंत चढून मग परत उतरायला सुरुवात केली.


खाली उतरलो आणि फेरीने नदीच्या अल्याड येउन गाडीने परत घराचा रस्ता धरला.

खास युरोपीयन पर्यटन स्थळांमध्ये तेवढे नाव नसलेले पण भावून टाकणारे ऐतिहासिक ड्रेस्डेन, अतिप्रसिद्ध पण थोडी निराशा करणारे प्राग आणि विदेशी पर्यटकांसाठी अगदीच अनभिज्ञ असा बास्टाय परिसर बघून परतीचा प्रवास सुरु झाला. चार दिवसांच्या सुट्ट्यांचा शेवटचा दिवस म्हणून रस्त्यांवर गाड्यांची जत्रा भरली होती. एकीकडे रेपसीड ची शेते आणि पवनचक्क्या सोबतीला होत्या. एक आठवणीत राहील अशी सफर संपली आणि सोबतच ही लेखमाला सुद्धा...

2 comments:

  1. Just read it . Very well written and really very informative. Can't wait to visit this place now

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अजित. अवश्झा भेट द्यावी असेच आहे ड्रेस्डेन आणि बास्टाय.

      Delete