ऑन लाईन वाचनाचे जेव्हा अनेक पर्याय उपलब्ध झाले तेव्हा मिसळपाव या एका संस्थळाचा शोध लागला. आणि त्यावर रुळताना एक नवीन प्रकार वाचनात आला - शतशब्दकथा. शीर्षक सोडून शंभर शब्दात लिहिली जाणारी कथा. पण म्हणजे १०० शब्दांची मर्यादा असे नाही, १०० म्हणजे १०० शब्द. ना कमी ना जास्त. कथेचे सार वाचकांपर्यंत पोचवताना ते अचूक १०० शब्दात पकडणे हे तसे प्रचंड अवघड काम. त्यातही बरेचदा शेवट हा काहीसा ट्विस्ट देणारा. आतिवास ताई यांनी पहिल्यांदा हा साहित्य प्रकार तिथे लिहिला आणि त्याला शतशब्दकथा हे नावही मिसळपाववरच मिळाले. आतिवास ताई मुळातच खूप सुरेख लिहितात, त्यांची प्रत्येक कथा ही सहज आणि सोप्या प्रसंगातून, शब्दातून खूप छान आशय मांडणारी असायची. मग इतर लेखकांनीही शतशब्दकथा लिहिल्या, त्यातही अनेक सुंदर कथा वाचायला मिळाल्या. हे सगळे वाचताना नेहमीच की लेखक/लेखिकेचे कौतुक वाटायचे. इतक्या बोलक्या आणि सुंदर आशयाच्या, कधी निरगसतेवर भाष्य करून हसवणाऱ्या तर कधी समाजातल्या वास्तवावर नेमके बोट ठेवून अस्वस्थ करणाऱ्या. अर्थात कधीही हे असे काही आपण लिहून बघावे असे मात्र वाटले नाही. आणि याच दरम्यान मिसळपाव वर शतशब्दकथा स्पर्धा आयोजित केली गेली. बरं स्पर्धा असल्याने त्यात इतर नियमही होते, ज्यातला एक नियम सगळ्यात महत्वाचा आणि तेवढाच रोचक होता. तो असा की पहिल्या फेरीत निवडल्या गेलेल्या शतशब्दकथांचा सिक्वेल लिहायचा. म्हणजे पहिली कथा स्वतंत्र म्हणून बघताना पूर्ण हवीच पण त्याला पुढेही नेता यायला हवे. दोन्ही वेळा अर्थातच १०० शब्द.
रोज नवीन कथा येऊ लागल्या, उत्तमोत्तम काही वाचायला मिळू लागले. आणि एक दिवस वाटले की चला, आपणही हे असे काही लिहून बघुयात. बराच वेळ घालवला आणि हे खालचे सहजपणे सुचले.
"मिपावर स्पर्धा आहे, काहीतरी लिहुयात असा विचार तिच्या मनात आला. “कथा हा काही आपला प्रांत नाही” म्हणून पुढच्याच क्षणी तो दूरही सारला. स्पर्धेसाठी एकाहून एक सरस कथा येऊ लागल्या आणि पुन्हा त्या विचाराने डोके वर काढले. कशावर लिहिता येईल? ग्रामीण, शहरी, आनंदी, दुःखद, विनोदी, खुसखुशीत, थरारक, स्त्रिया, भयकथा कित्त्येक प्रकार आहेत पण लिहावे काय? बर त्याचा सिक्वेलाही हवाय आणि कथा पूर्णही हवी. ये अपने बस की बात नाही” असे म्हणत तिने मिपा उघडले. एवढ्या सगळ्या बाबी पाळून लिहिणारे लेखक किती महान आहेत असे म्हणून तिने मनोमन त्यांना वंदन केले. आणि एकदम सुचले. हेच विचार कागदावर उतरवले आणि कथा पूर्ण केली.".
हे लिहिताना जेव्हा शब्दांशी खेळावे लागले तेव्हा उमगले की हे काम किती कठीण आहे ते. कुठे एक शब्द कमी, कुठे जास्त. पण अवघड असले तरीही या प्रयत्नाने वेड लागले लिहायचे, कारण त्यात मजा येत होती.
अर्थातच ही कथा म्हणून देण्यासारखी नव्हती. मग ठरवले की आता लिहायचीच एक कथा. स्पर्धेसाठी म्हणून असे नाही, पण ही लिहिण्यातली गंमत पुन्हा अनुभवायला मिळावी म्हणून. पुन्हा विचारचक सुरु झाले आणि एक विषय सापडला. माझ्याच आजूबाजूच्या व्यक्तींकडून. माझ्या आईच्या कॉलेजमध्ये अशा अनेक मुली येतात ज्यांना शिकायची इच्छा असते, पण कधी गरिबी, कधी घरच्यांची अनास्था किंवा कुठल्याही कारणाने त्यात असंख्य अडचणी येतात. कित्येकींची आयुष्य या सगळ्यात बरेचदा भरडली जातात, पण काही जणी त्या हजारो अडचणीतूनही मार्ग काढतात आणि प्रेरणादायी ठरतात. अशाच अनेकींच्या कहाण्या एकत्र झाल्या आणि मनात तयार झाली ही कथा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
निकाल
दहावीचा निकाल लागला. सगळीकडून कौतुक झालं. आमची एकच खोली, आईबापांचे हातावरचे पोट, पण बाईंनी कॉलेजची फी भरली. अशातच मामा आले घरी. "कुठे शिकवताय पोरीला, मी मुलगा बघितलाय, हुंड्याशिवाय लग्न होईल." मामा पैसावाले. बैठका झाल्या, लग्न पण लागले. तिकडे दिवसभर शेतात काम अन रात्रीचा मार. कामाचे काही नाही, परीक्षेत पण हंडे भरून आणायची सवय होती, पण तिकडे गुरासारखे राबवायचे. जीव नकोसा झालेला. मामाची पोरगी कॉप्या करून दवाखान्यात सिस्टर. अन मला धाडले नरकात. रोजच्या रडायचा पण वैताग आला एक दिवस अन ठरवलं. याचा निकाल लावायचाच. आता मागे फिरायचं नाही. निघाले तशीच. मंगळसूत्र मोडले. अन पळून आले इकडे बाईंच्या संस्थेत. उद्यापासून कॉलेज सुरु.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लिहिताना त्यातून स्पर्धा हा उद्देश फारसा न राहता, अशा प्रेरक कहाण्या वाचून जो काही हुरूप येतो तसा देण्यात मी थोडी जरी यशस्वी ठरले तरी छान वाटेल एवढेच मनात होते. आणि म्हणता म्हणता, अनेक चांगले प्रतिसाद मिळाले आणि या कथेने पुढच्या फेरीत मजल मारली. त्याच दरम्यान भारतात जायचे होते आणि एकीकडे याचा सिक्वेल लिहायचा होता. पहिली कथा लिहिताना काही गोष्टी डोक्यात होत्या पण नेमकं असं काही जमत नव्हतं. आणि प्रवासातच एक विषय सुचला, आणि फायनल झाला. भारतातल्या गडबडीत आधी कागदावर कथा लिहिली. संगणकावर कथा लिहिताना शब्द मोजणे हे काम मायक्रोसॉफ्ट वर्डचे. इथे कागदावर लिहिताना अजूनच मज्जा. तरीही मसुदा तयार झाला आणि नवऱ्याने जुगाड करून संगणकावर टंकायला सुरुवात केली. पुन्हा शेवटपर्यंत असंख्य बदल केले, हे चांगले की ते चांगले म्हणून नवऱ्याचे डोके खाल्ले. आणि एकदाची कथा लिहून झाली. हुश्श.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
निकाल - उत्तरार्ध
शेवटची सही करताना बघता बघता मन भूतकाळात गेले. सासरच्या त्रासाला कंटाळून परत आल्यावर मामांनी केलेले भांडण, समाजातली खोटीनाटी बदनामी, एकटी बघून लोकांनी घेतलेला गैरफायदा, कधीतरी सोबतच्या श्रीमंत मैत्रिणींचा वाटलेला हेवा, पण नशीबाने लाभलेले कायम पाठबळ देणारे मार्गदर्शक, कापड दुकानात काम करत संस्थेच्या वसतीगृहात राहून कष्टाने पूर्ण केलेले शिक्षण, काळा कोर्ट चढवून कोर्टात आले तो दिवस…
आणि आज समोर होती सुनीता, डोळ्यात तीच चमक, अंगावर माराच्या त्याच खुणा. हुंड्यासाठी हिला जाळायला निघाले होते. पण पठ्ठीने पुराव्यानिशी खेचून आणले कोर्टात. इतक्या वर्षात काय बदलले असा प्रश्न पडतो कधीतरी, पण हेच बदलण्यात माझा खारीचा वाटा. आज न्यायाधीश म्हणून निकाल दिलेली ही पहिली केस.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दुसरी कथा लिहिताना स्पर्धा आहे हे जास्त डोक्यात होतं हे मात्र कबुल करावेच लागेल. पहिल्या वेळी जेवढे वाटले नाही तेवढे या दुसऱ्या कथेनंतर लोकांच्या प्रतिसादाची वाट होती. आणि या कथेला तिसरा क्रमांक मिळाला. अर्थातच ज्या अनेक मुलींच्या प्रेरणेतून ही कथा तयार झाली त्या केंद्रस्थानी होत्याच. त्यामुळे अशा अनेक मुलींची आयुष्य नव्याने उभी राहावीत हे त्याचे खरे बक्षीस असेल. पण पहिल्यांदाच काहीतरी वेगळे लिहिण्याचा अनुभव मिळाला, ते लिहिताना त्यातून आनंद मिळाला आणि शेवटही तसाच झाला, त्यामुळे यानिमित्ताने मिसळपाव संपादक, संयोजक सर्वांचे परत एकदा आभार. आणि लिहिताना माझ्या प्रत्येक प्रश्नाला न कंटाळता उत्तर देणाऱ्या, समीक्षकाची भूमिका पुरेपूर वठवणाऱ्या नवऱ्याचे श्रेय हे सुद्धा यात यायलाच हवे. बरेच दिवस झाले या स्पर्धेला, फक्त माझ्याही ब्लॉगवर याची नोंद राहावी म्हणून घेतले लिहायला.
बक्षीस म्हणून मिळालेले पुस्तक हे -
योगायोगाने पुस्तकाची कथाही अशाच एका धडपडलेल्या, लहान वयात काही चुका करून शेवटी त्यातून बाहेर पडणाऱ्या मुलीबद्दल. त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.
अशी ही १०० शब्दांच्या २ कथांसाठी लिहिलेली मोठ्ठी पोस्ट...

No comments:
Post a Comment