Wednesday, November 24, 2021

स्टील इन स्टाईल - स्टीलचे डबे, भांडी, आठवणी आणि वारसा!


काल सृजनला किंडरगार्टेन मध्ये घ्यायला गेले तेव्हा तिथल्या एका केअर टेकर बाईने विचारले की "तुम्ही हे स्टील चे डबे कुठून आणता?" भारतातून. मी लगेच उत्तर दिलं. "मला वाटलंच" असं ती म्हणाली. पुढे "त्यातला एक डबा मी पण शाळेत असताना न्यायचे आणि तोच आता कधी कधी सृजन पण आणतो" हेही मी तिला सांगितलं. "आमच्या कडे भारतात ताटल्या, वाट्या, पेले, साठवणीचे डबे, शाळेचे डबे, याशिवाय सुद्धा अनेक स्वयंपाकघरातल्या गोष्टींमध्ये प्रामुख्याने स्टील होतं, आहे. आता त्याआधी तांबे, पितळ पण होते, पण माझ्या लहानपणापासून तरी स्टीलची भांडीच बघितली आहेत. मधल्या काळात प्लास्टिकची लाट आली, आणि आता ती हळूहळू ओसरून पुन्हा काच आणि स्टील येतं आहे सगळीकडे" अशा आमच्या गप्पा झाल्या. ती म्हणाली की 'हो, आता गेल्या काही वर्षात आमच्या कडे पण स्टीलच्या वापराबाबत लोक पुन्हा विचार करत आहेत, दुकानात स्टीलचे लंच बॉक्स दिसत आहेत, प्लास्टिक कमी करण्यासाठी जे काही प्रयत्न चालू आहेत, करायला हवेत त्यात स्टीलचा वापर हा तसा सोपा उपाय आहे' हे ती पण सांगत होती. परदेशात राहताना भारतीय म्हणजे मग बॉलिवूड, कपडे, एखादा सण, आपली खाद्यसंस्कृती, गरीबी, भाषा याबद्दलचे प्रश्न आम्हाला अनेकदा विचारले जातात. या पलीकडे जाऊन असा एखादा वेगळा विषय माझ्या आठवणीत पहिल्यांदाच घडला. त्यामुळे असेल किंवा एकूणच भांडी, डबे याबाबत असणारा प्रचंड जिव्हाळा असेल, हा विषय डोक्यात राहिला. 

घरी येऊन मग स्वयंपाकघरात असणारे स्टीलचे चहा साखरेचे डबे, परतायचे अनेक चमचे, डाव, भातवाढणी, उलथनं किंवा सराटा, झारा, किसण्या, चाळण्या, मोठी स्टीलची ताटं, लहान ताटल्या, पेले अशा एकाहून एक गोष्टी बघून एकदम श्रीमंत असल्यासारखं वाटलं. त्यातही भारतातून आणलेल्या आणि इथे सहज न मिळणाऱ्या वस्तू बघून अजूनच छान वाटलं. आईच्या साड्या, दागिने यापेक्षाही आईचे डबे ढापण्यात मला अतीव आनंद मिळतो. नुसते ढापण्या पेक्षा आईची खास वस्तू आपल्या कडे आहे ही भावना जास्त आवडते. पिढ्यानपिढ्या पुढे जाणारा वारसा म्हणून दागिने, साड्या, चांदीची भांडी यासोबतच या अगदी लहान सहान गोष्टी पण मला तेवढ्याच तोलामोलाच्या वाटतात. त्यात आई पण अशा वस्तू आवडीने खरेदी करत राहते, तिच्या कडे बरेच वेगळे आणि वैविध्यपूर्ण प्रकार असतात. असेच हे काही डबे जे कधीतरी सृजन नेतो ते माझ्याकडे आलेत. 

सुरुवातीला इथे येताना फार काही भांडी आणली नव्हती. फार सामान वाढवू नये म्हणून नवीन सामान पण मोजकंच घेतलं होतं. त्यात प्लास्टिकच तेव्हा सोयीचं होतं. जेवायला सिरॅमिक प्लेट्स सहज चालवून घेण्यासारख्या होत्या. बाकी बऱ्याच वस्तू काचेच्या होत्या आणि त्यातही काही अडचण वाटत नव्हती. पण आमटी किंवा वरणाचा डाव मात्र नव्हता. सूप साठी मिळणारा भला मोठा डाव आणला तरी त्याच्याशी गट्टी जमेना. माझ्या पहिल्या भारत वारी वेळी यादीत हा डाव अगदी पहिल्या क्रमांकावर होता. मग उलथनं, परतायला चमचे हेही त्यात आले. मसाल्याच्या डब्यासाठी अगदी लहान चमचे पण खास आठवणीने आणले.

शक्यतोवर माझा कल हा इकडे मिळणाऱ्या वस्तू इकडेच घेण्यावर असतो. गेल्या काही वर्षात तर बरेच खाद्यपदार्थ इथे सहज मिळतात, त्यामुळे भारतातून येताना त्या गोष्टी टाळून, वजनात जमेल तसे इथे न मिळणारी अशी भांडी स्वयंपाकघरात येत गेली. खास म्हणून आधी वाट्यांची भर पडली. सहा वाट्या कमी पडतात म्हणून आता अजून सहा त्यात ऍड झाल्या. मग सृजन साठी म्हणून खणाची ताटली आली. पोळ्या ठेवायला डबा सुरुवातीला इथे घेतला प्लास्टिकचा, टप्पर वेअर पण वापरून झाला पण शेवटी स्टीलच्या डब्यांचा एक पूर्ण सेट इकडे आला. तो सेट एका मैत्रिणीने लग्नात दिला होता म्हणून जास्त जवळचा, अशीच इतरही काही भांडी ही कुणी दिलेली म्हणून जपलेली. चहा साखरेचे डबे रुखवतातले, त्यावर लग्नाची तारीख आणि आई बाबांकडून हे कोरलेलं नाव म्हणून आता इतक्या वर्षानंतर ते अजून जवळचे वाटतात. ते TEA, COFFEE वगैरे लिहिलेले डबे ऑनलाईन विंडो शॉपिंग वेळी कितीही आवडले, तरी या लहानश्या स्टीलच्या डब्यांची मजा त्यात नाही.

आता तर स्टीलची मोठी ताटं, लहान ताटल्या हेही सगळं आणलं आहे. यावर्षी महालक्ष्म्यांच्या जेवणाच्या वेळी ती स्टीलची ताटं चांदीइतकीच छान वाटत होती. पुरणपोळी, कटाची आमटी, पंचामृत, चटणी ,कोशिम्बीर, भाताची मूद हे सगळं रोजच्या वापरातल्या सिरॅमिक प्लेट्स मध्ये एव्हडं छान वाटलं नसतं. शाळेत नेता येतील असे लहान आकाराचे डबे पण सृजनच्या निमित्ताने वाढत गेले. बाहेर कुठेही जाताना त्याच्या पोळी किंवा पराठ्याचा डबा न्यायला हे स्टीलचे डबे अत्यंत सोयीचे वाटतात. ऍल्युमिनियम फॉईलचा कचरा तेवढाच कमी, शिवाय स्वच्छ करायला सोपे आणि बॅगेत सहज मावणारे म्हणून उत्तम. प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या प्रोसेसला याची आपोआप मदत झाली. आईने घेतलेल्या पाव भाजीच्या प्लेट्स तिने खास "तुला जमेल तेव्हा या घेऊन जा" म्हणून खास ठेवल्या आहेत. मी नक्की आणेन हे सांगूनही ती मला प्रत्येक वेळी याची आठवण करून देते, मग त्या शिवाय पण मला काय काय न्यायला आवडेल याची यादी पुन्हा माझ्या मनात तयार होते. आई प्रत्येक वेळी येताना काहीतरी खाऊ अशा एखाद्या डब्यात आणून मग हा राहू दे इथेच म्हणाली की ते सगळे माझे होतात. एकूणच या सगळ्याचा सोस असल्यामुळे क्रोकरी, काचेची भांडी, अजून काही वेगळे प्रकार या खरेदीसोबत हे भारतीय स्टीलचे प्रकारही घरात वाढत जातात. 

आता फक्त स्टीलचे पेले घरात नाहीत. पण कालच्या प्रसंगामुळे लगेच ते यादीत घ्यावे का असा विचार मनात आला. ऍमेझॉन इंडियाच्या वेबसाईट वर मग हा सगळा शोध घेताना, मेस मध्ये जे डबे मिळायचे एकावर एक बसणारे, ते ही दिसले. ते मात्र घेऊन उगाच नको त्या मेसच्या आठवणी म्हणून ते नुसतेच बघून बाजूला केले. 

सृजनच्या शाळेतल्या बाईंनी "इथे कुठे भारतीय दुकान आहे का जिथे हे मिळेल?" असेही विचारले. इथे भारतीय दुकानात काही वस्तू असतात पण असे डबे कधी पाहिले नाहीत. बाकीच्या दुकानांमध्ये स्टीलचे डबे आता दिसतात, मात्र अगदीच मोजक्याच प्रकारचे , त्यातही काही वैविध्य नाही. उत्तम स्टीलची भांडी, कुकर हे मी इकडेच घेतलेत, पण डबे वगैरे प्रकार अगदीच किरकोळ असतात.  त्याबाबतीत भारतातलं स्टील जास्त चांगलं असं वाटतं, आणि प्रकारही खूप. (त्यातही मला ठरलेल्या दोन तीन दुकानातलं जास्त पटतं कारण आजवर खराब झालेलं नाही, पण इतरही ठिकाणी चांगलं मिळतं) त्यामुळे मी भारतात जाईन तेव्हा तुमच्यासाठी नक्की आणेन हे तिला सांगितलं. मग त्या निमित्ताने 'स्टीलच्या भांड्यांचे' दुकान टाकावे काय इथे हा विचार मनात येऊन, आजवर अशाच मनात राहिलेल्या सतराशे साठ बिझनेस आयडिया मध्ये या सतराशे एकसष्टाव्या कल्पनेची भर पडली. स्टीलचा वापर सोपा, लहान मुलांना वापरायलाही सोयीचे, डिशवॉशर सेफ, वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट म्हणून अनेक पर्याय अशी भरपूर जाहिरात बाजी करता येईल. 

माहेरी 'देशपांडे बिछायत केंद्र' असं आम्ही सगळे गमतीने नेहमी म्हणायचो, कारण ताटं, वाट्या, पेले हे आमच्या घरून कुणा कुणा कडे नेहमीच दिली जायची, अर्थात पैसे न घेता. पण आता तीच परंपरा मी इकडे व्यवसाय म्हणून पुढे नेऊ शकते, भारतीय लोकांना कार्यक्रमा साठी मोठ्या प्रमाणात सामान लागतं तेव्हा किंवा इतरही कुठे देता येईल, ही सतराशे बासष्टावी कल्पना पण डोक्यात आली. भांड्यांच्या दुकानातच एका बाजूला "इथे भांडी भाड्यानेही मिळतील" अशी पाटी सुद्धा लावता येईल. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच, तसं प्रत्येक भांडणानंतर 'भांड्यांचे दुकान म्हटलं की हे होणारच' ही टेप वाजवता येईल.

तर स्वयंपाक घरातल्या प्रत्येक स्टील च्या वस्तू काल जास्तच प्रेमानेन्याहाळत असताना या सगळ्या आठवणी, माझ्या स्वयंपाकघरात हक्काची जागा मिळवलेल्या या अनेक वस्तू, त्यांच्या आठवणी, त्यांच्याशी निगडीत असलेल्या व्यक्ती आणि भावना आणि भविष्यातले काहीच्या काही खयाली पुलाव असे सगळे विचार करून झाले. 

आता सृजनच्या शाळेतल्या या बाईंशी या निमित्ताने वेगळे बंध जुळले असं म्हणता येईल. पुढच्या वर्षी त्याची शाळा बदलेल, पण हा प्रसंग आमच्या साठी तिच्या आठवणींशी कायम स्वरूपी जोडला जाईल. तिला भेट म्हणून डबा देताना त्यावर जर्मन मधून "सृजन कडून" असं कोरून दिलं नाही, तरी तिच्याही आठवणीत कदाचित आम्ही नेहमी साठी राहू. कुणी सांगावं, तिची मुलं, नातवंडं पुढे तो वापरतील आणि दोन देश, दोन व्यक्ती कळत नकळत पणे अशा पिढ्यान पिढ्या जोडल्या जात राहतील.

No comments:

Post a Comment