मृणालिनीची ऑक्टोबर मध्ये १ तारखेपासून तर ३१ पर्यंत रोज काहीतरी लिहून पोस्ट करायचं अशी पोस्ट दिसली, मी पण जॉईन होते म्हणाले पण शेवटी आज चार ऑक्टोबरला लिहायला सुरुवात केली.
जेव्हा जेव्हा 'दिसामाजी काहीतरी लिहावे..' ही ओळ आठवते, तेव्हा तेव्हा पहिले आठवतात ते माझे आजोबा, बळवंत श्रीकृष्ण देशपांडे. कारण माझ्या आठवणीतले आजोबा हे या ओळी अगदी सार्थ ठरवणारे होते.
ते वर्धेला राहायचे आणि आम्ही सुट्ट्यांमध्ये तिथे जायचो, तर आजोबांकडे त्यांची डायरी कायमस्वरूपी असायचीच आणि ते रोज ठरवून दैनंदिनी लिहायचेच. नंतर ते आमच्याकडे बुलढाण्याला राहायला आले आणि तेव्हाही या सगळ्या जुन्या डायऱ्या प्रवास करून आमच्या कडे आल्या. खरंतर कुणाची डायरी वाचू नये, पण त्यांची डायरी वाचलेली त्यांना चालायची, त्यात खाजगी असं काही नव्हतं, महत्वाच्या अनेक नोंदी मात्र असायच्या असायच्या. त्यांच्या डायरीत लिहिलेली "आज परसाकडे झाली नाही, त्यामुळे अस्वस्थ आहे" हे वाचून आम्ही खूप हसायचो. हे काय काहीही लिहायचं असतं का असं वाटायचं. पुढे त्यांना नव्वदीत कधीतरी झालेल्या तब्येतीच्या कुरबुरी, आमच्या पिढीत फार लवकर सुरु झाल्या आणि त्यांच्या अस्वस्थते मागची कारणं समजली. शिवाय या नोंदी डॉक्टरांसाठी किती उपयोगी ठरू शकतात याची त्यांना सुद्धा कल्पना नव्हती, तेवढी वेळ सुद्धा आली नाही पण अशी बरीच बारीक सारीक माहिती त्यांच्या थोड्या कंप असणाऱ्या हातानी ते लिहून ठेवायचे. मग त्यात आलेले पाहुणे, कुणी नातलग गेल्याची नोंद, कुणाच्या जन्माची नोंद, कुणाचं पत्र आलं का वगैरे अनेक गोष्टी असायच्या. माझा निकाल लागला की माझा नंबर आला हेही लिहायचे. आईने कधी काही खास त्यांच्या आवडीचा पदार्थ केला की 'नीलिमाने उकरपेंडी केली' असं लिहायचे. आणि मग रिकाम्या वेळात त्या जुन्या डायऱ्या वाचत पण बसायचे. कधी बोलताना काही संदर्भ आठवायला मग माझी ही डायरी घेऊन ये त्यात लिहिलेलं असेल हेही सांगायचे.
त्यांच्या लिहिण्यात खरंच खंड पडायचा नाही. नवीन वर्षी नवीन डायरी उत्साहाने ते घ्यायचे, आई बाबा पण त्यांना आवर्जून आणून द्यायचे. सहा फूट उंच, शिडशिडीत बांधा आणि त्यांचं रोज मोठमोठ्याने रामरक्षा म्हणणं, रोज जेवण झाल्यावर बाहेरच्या बंगई वर बसून पेरू खाणं या जश्या ठळक आठवणी आहेत, तेवढीच त्यांच्या कोणत्याही प्रवासात त्यांच्या सोबत असणारी त्यांची खास उशी, बाकी पण बरंच त्यांचं आवडतं सामान आणि त्यात न विसरता कायमस्वरूपी असणारी त्यांची डायरी आणि पेन हेही खास आठवणीत आहेत. त्यांच्या डायऱ्या आता नाहीत. मी शाळेत असताना त्या अश्या थोड्या थोड्या पाहिल्या आहेत, पण आता त्या वाचायला मिळाल्या असत्या तर किती छान वाटलं असतं असं वाटतं.
माझ्याकडे लेखनाचा आणि व्यक्त होण्याचा जो काही थोडा वारसा आहे तो आजोबांकडून आला आहे असं खूप वेळा वाटतं. आधी मी अनेक वेळा डायरी घेऊन लिहायला सुरुवात केली आहे, पण नव्याचे नऊ दिवसच उत्साह टिकायचा. नंतर डिजिटल लिहिण्याची सोय झाली, ब्लॉगच्या निमित्ताने मी बरीच लिहायला लागले. काही खाजगी नोंदी पण वेळ मिळेल तेव्हा माझ्या डिजिटल डायरीत लिहीत गेले. सृजनच्या जन्मा नंतर अश्या गोष्टी लिहून ठेवल्या, आता सहाच वर्षात त्या वाचताना त्याचे बोबडे शब्द, प्रश्न सगळं डोळ्यासमोर येतं, हे लिखाण पूर्ण स्वान्त सुखाय आहे, त्याला एखाद्या लेख किंवा कथेसारखे सुरुवात शेवट काही नाही, रँडम नोंदी फक्त. तो अजून मोठा झाला की त्या वाचून पुन्हा लहानपणच्या आठवणीत रमता येईल.
मैत्रिणींच्या अश्या एका संस्थळावर पण बऱ्याच जणी आपापले दिवस लिहितात, मी पण जमेल तेव्हा तिथे लिहिते. चार देशातून चार वेगळ्या प्रकारचं आयुष्य जगणाऱ्या सगळ्या जणींचे दिवस या लिखाणातून समोर येतात. हे काही ठरवून एखादा विषय घेऊन केलेलं लिखाण नसतं, पण त्यात आपोआप कोण भेटलं, काम कसं होतं, एखादी आनंदाची तर कधी दुःखाची बातमी, मनातली घालमेल असं शेअर होतं. कधीही न भेटलेल्या आम्ही, आभासी जगातून का असेना, या लिखाणातून एकमेकींना थोड्या ओळखायला लागतो.
अगदी दिसामाजी जमत नाही, तरी निदान जमेल तेव्हा काहीतरी लिहायला या गोष्टींनी स्फूर्ती मिळत राहते. हे ऑक्टोबर मध्ये लिहिण्याचं चॅलेंज त्यातलं एक, म्हणून त्याची सुरुवात करताना आजोबांची आठवण आली, त्या निमित्ताने आजोबांच्या लिखाणाची गोष्ट माझ्या ब्लॉग वर नोंदवली गेली. आणि त्यावरून जे काही मनात आलं ते लिहून या लिखाणाच्या मॅरेथॉन ची सुरुवात झाली. भेटूया पुढच्या लेखात.
गेल्या कित्येक दिवसांपासून, खरं तर वर्षांपासून मनात असलेल्या ब्लॉग लिहिण्याच्या विचाराला शेवटी मुहूर्त लागलाय, असं म्हणत लिहायला सुरुवात केली त्यालाही आता वर्ष झालीत. माझे जर्मनीतल्या वास्तव्यातले वेगवेगळे रोजचे येणारे अनुभव, प्रवास वर्णन, इथे भेटलेले लोक, इथलं मला दिसणारं समाज जीवन, जर्मनी व्यतिरिक्त पण इतरत्र दिसणाऱ्या गोष्टी, आठवणी हे माझ्या शब्दात ब्लॉग वर लिहिते
विरंगुळा म्हणून फावल्या वेळात केलेला लिखाणाचा हा केवळ एक प्रयत्न!
Tuesday, October 4, 2022
०४ ऑक्टोबर २२ - दिसामाजी काहीतरी लिहावे - आजोबा आणि डायरी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment