हा अनुभव मागच्या महिन्यात कधीतरी आठवला म्हणून लिहून ठेवला होता, आज फेसबुक वरच्या एका पोस्ट निमित्ताने पुन्हा आठवलं म्हणून पूर्ण केला.
डिजिटल आवरा आवरी हा एक नवीन प्रकार आहे जो अधून मधून आवश्यक आहे. फोन वर येणारे हजारो कुणाचे(ही) वाढदिवस ते श्रद्धान्जलीचे संदेश, प्रत्येक सणवारी येणाऱ्या शुभेच्छा, मोठमोठे लेख असे बरेच. हे एकदा बघून वाचून नंतर डिलीट करणे हे एक कामच असतं. तर असं च काही करताना मग एकेक नंबर दिसतात..आणि त्या त्या संभाषणाचा इतिहास आठवतो.
ही गोष्ट असेल २०१९ मधली. आम्ही ज्या ठिकाणी राहायचो तिथे सृजन च्या Kindergarten मध्ये सुरुवातीला तो एकटाच भारतीय मुलगा होता. आमच्या आजूबाजूला तेव्हा कुणीही भारतीय नव्हते. मग एक दोन वेळा भारतीय चेहऱ्याची एक मुलगी दिसली. नवीनच होती, बुजलेली, तिला भाषा येत नव्हती. तिच्या आई बाबांची भेट झाली नव्हती. ती वेगळ्या ग्रुप मध्ये होती, पण तिथल्या लोकांना वाटायचं की सृजन तिला आपलासा वाटेल, ते दोघे बोलू शकतील, म्हणून ते अधून मधून तिला सृजनच्या ग्रुप मध्ये घेऊन यायचे. भारतात इतक्या वेगवेगळ्या भाषा आहेत हे मला कधीकधी इथल्या टीव्ही वरून ओरडून सांगावं वाटतं, त्यामुळे भाषा हा मुद्दा काही मदत करणारा नव्हता. चेहरा वाटू शकतो सारखा, पण सृजन सुद्धा तीनच वर्षाचा होता, एवढं त्यालाही समजत नव्हतं. एकदा घराजवळच्या पार्क मध्ये तिची आई दिसली, मी हसून हॅलो करण्याचा प्रयत्न केला पण समोरून काही रिस्पॉन्स आला नाही. ठीक आहे, असेल, जाऊदे म्हणून मी सोडून दिलं. मग सृजनला सोडताना वगैरे एक दोन वेळा तिचा बाबा दिसला, त्याने निदान हॅलो केलं पण सकाळच्या वेळी मुलांना वेळेत आत सोडणे या गडबडीत काही बोलणं झालं नाही. तेव्हा बाबा आले होते इथे, त्यांची एकदा त्या लहान मुलीच्या बाबा सोबत पार्क मध्ये जुजबी कुठून आलात वगैरे ओळख झाली. सृजनला जेव्हा पार्क मध्ये खेळायला घेऊन जायचो संध्याकाळी तिथेही ती मुलगी आणि तिची आई किंवा बाबा दिसायचे, तो फक्त हसून ओळख दाखवायचा, ती मात्र कधीच काही बोलायची नाही. सहसा आम्ही स्वतःहून जाऊन बोलतो, त्यामुळे मी एक दिवस स्वतःहून ओळख करवून घेतली. तेवढंच, भेटलो तरी हाय पलीकडे संभाषण गेलं नाही. त्या मुलीची आई पार्क मध्ये येणाऱ्या दुसऱ्या दोन तीन बायकांशी (ज्या मूळ पाकिस्तानी आहेत) हिंदीत बोलत असायची. पण मी काही बोलले तर जेवढ्यास तेवढं उत्तर. मग पुढे भेटू घरी वगैरे विषय झालेच नाहीत, नाहीतर आम्ही स्वतःहून भेटू म्हणून नक्कीच पुढाकार घ्यायचा प्रयत्न करतो.
मग आमच्या सुट्ट्या,भारत वाऱ्या झाल्या आणि lockdown आलं. पायी फिरायला जाणं allowed होतं इथे, तेव्हा अनेक दिवसांनी ती आई भेटली, प्रेग्नंट होती. त्यादिवशी जरा बोलली. सध्या आई बाबा येऊ शकणार नाहीत तिचे, म्हणजे सोपं नाही, त्यामुळे मी काळजीने सांगितलं तिला माझा नंबर दिला, कधी मदत लागली तर सांग मला नक्की असं सांगितलं. पुन्हा दोन तीन महिने गेले, आणि अचानक एक दिवस मी दुपारी तीन वाजता ऑफिसचे काम संपवत होते तेव्हा तिच्या नवऱ्याने फोन केला की मी इथे हॉस्पिटल मध्ये आहे. बाळ होईलच आता कधीही. तर आज आमच्या मुलीला घेऊन याल का तुमच्या घरी Kindergarten मधून.
अश्या वेळी नाही म्हणण्याचा विचार पण आला नाही. किंडरगार्टेन मध्ये फोन करून सांगा फक्त एवढं सांगितलं. मी तिला घेऊन आले. ती बुजली, नुसती शांत बसून होती. स्वाभाविक होतं, पहिल्यांदाच येत होती आणि तेही आई बाबांशिवाय. सृजनसाठी सुद्धा अचानक तिचं येणं नवीन होतं, पण त्याने तिला खेळणी दिली, हळूहळू दोघं मोकळे झाले, खेळायला लागले. मी तिला जास्तीत जास्त कम्फर्टेबल वाटावं असा प्रयत्न करत होते, पण तिला जागा नवीन च होती. मला तिच्या खाण्याच्या सवयी माहीत नव्हत्या..मी जे काही विचारायचे ते ती नाहीच म्हणायची. दोन तास झाले मग त्याचा फोन आला, आम्ही तिला घेऊन दवाखान्यात येऊ शकतो असं मी सांगितलं, तेव्हा करोना मुळे तशी परवानगीच नाही असं समजलं. तो रात्री आठ नंतर आला, तोवर मीच काळजीने बाळंतीण आहे म्हणून पोळ्या वरण भात असा डबा केला. त्यांनी मागितला नव्हता पण परक्या देशात या परिस्थितीतून जात असताना निदान हा आधार आपण देऊ शकतो असं वाटलं. मग शनिवारच आला, पुन्हा ही मुलगी सकाळी दहा पासून दिवसभर आमच्या कडे आली. तिसऱ्या दिवशी आम्हाला बाहेर जायचं होतं, त्यामुळे शक्य नव्हतं, पुन्हा चौथ्या दिवशी पूर्ण दिवस ती आमच्या कडे आली. ऑफिसच्या कामाचा बाऊ करणे मी शक्य तेवढा टाळते, पण तेव्हा खरंच काम संपत नव्हतं, डेडलाईन होत्या आणि मी विकेंडला काम करत होते. तरीही ते कारण न देता मी आणि सुमेध दोघांनी मिळून चार दिवस तिला पूर्ण सांभाळलं. एकदा त्याच्याशी बोलताना तो म्हणाला की त्यांना आधीपासून माहीत होतं, हॉस्पिटल मध्ये सध्याच्या नियमांप्रमाणे फक्त बाळाच्या बाबांना जाता येईल, तेही थोडा वेळ. आम्हाला हे आधीच माहीत असतं, त्या मुलीला सुद्धा तसा अंदाज देऊन ठेवला असता, आधी एकदा कदाचित तिला घरी घेऊन आलो असतो, या सगळ्याची त्या लहान चार वर्षाच्या मुलीला मदत झाली असती. ती इतकी बुजली नसती. अर्थात हे आम्हाला वाटलं, त्यांना तसं काहीच वाटत नव्हतं. आणि म्हणे ते पार्क मध्ये भेटतात ते कुटुंब शेजारीच आहे, त्यांच्याकडे गेली असती, उलट त्यांनी मात्र चारही दिवस यांना काही ना काही कारणं देऊन टाळलं, आणि आम्ही वेळ निभावून दिली. हे सगळं झाल्यानंतर पुढे कधीही त्या आईकडून साधा थँक यु असा मेसेज सुद्धा आला नाही. बाळाला भेटायला जाणे वगैरे नाहीच. सृजन नंतर बरेचदा ती पुन्हा कधी खेळायला येईल आपल्या कडे असं विचारायचा, आधी आली मग आता पण कधीतरी येईल थोडा वेळ असं त्याला वाटायचं, तिच्या भावाबद्दल पण तो विचारायचा पण संवाद पुढे गेलेच नाहीत. एक अनुभव म्हणून आम्ही सोडून दिलं.
एक कॉमन अनुभव म्हणजे भारतातल्या कुणासाठी जर्मनीत राहणाऱ्या कुणाचं स्थळ येतं. मग चौकशी साठी फोन येतात, आम्ही मुलाला ओळखत नसलो तरी एकूण इकडे जीवनमान कसं आहे, किती पगार असेल, त्यात होईल का, व्हिसाचे प्रश्न, नोकरीच्या संधी, भाषा वगैरे अनेक शंका असतात. या फोन साठी आम्ही एकेक दोन दोन तास काढून सगळी माहिती दिली आणि नंतर पुढे काय झालं, ठरलं लग्न तर ते कळवणे तर नाहीच, जरी लग्न ठरलं नाही तरी तेही नाही, पण पलीकडून पुढे वर्ष दोन चार वर्ष संभाषणच होत नाही.
भारतातून येणारे विद्यार्थी अनेक असतात. मी स्वतः पुण्यात हॉस्टेलला होते तेव्हा तिथे माझ्या दादा वहिनी काका काकू यांची घरं होती, मी हक्काने त्यांच्याकडे जायचे आणि तेही माझ्यासाठी कायम मदतीला होते हा मानसिक आधार खूप मोठा होता. सुमेध पण विद्यार्थी म्हणून इकडे आला तेव्हा अशीच काहींनी मदत केली. हे सगळं आठवून इथेही नवीन कुणी आलं की यांना मदत करायला हवी हे आम्हाला आपसूकच वाटायचं, वाटतं. मग इथल्या युनिव्हर्सिटी शोधायला मदत, फोन आणि ईमेल वरून सगळी माहिती देणे, एखाद्या गावातली ओळख शोधून देणे हे आम्ही अनेक वेळा केलं आहे. कित्येकांना मग घरी जेवायला बोलावलं आहे. त्यांना सुरुवातीला इथे बँकेत खातं काढण्याची मदत, त्यांना कुठे कोणतं सामान मिळतं याची माहिती देणं, त्यासाठी सोबत जाणं, सार्वजनिक वाहतुकीची माहिती समजावून सांगणं, सोबत जेवायला जाणं अश्या अनेक गोष्टी आम्ही करायचो. यांच्यातले काही जण संपर्कात राहायचे, पण अनेक जण मात्र नंतर आपला काय संबंध असे वागायचे. सतत आम्हाला कसे आहात असं विचारा अशी अजिबात अपेक्षा नसते, पण एखादा अपडेट व्हॉट्सअप मेसेज मार्फत देणे एवढं अवघड सुद्धा नसतं. आणि कधीतरी आमच्याही अडचणी असू शकतात, एकदा तर सृजन खरंच आजारी होता, तरी आम्ही फोन वरून मदत केली. पण प्रत्यक्ष जाऊ शकलो नाही की जेवायला बोलावू शकलो नाही. नंतर जेव्हा जमलं तेव्हा भेटलो, सोबत जेवण केलं आणि बँकेच्या प्रश्नांचं निरसन, कुठे सामान मिळेल सगळं दाखवलं. पण घरी बोलावणं शक्य नव्हतं, तर त्यावरून अप्रत्यक्ष नाराजीचा सूर आम्हाला जाणवला, आणि वाईट वाटलं.
आता जेव्हा आम्ही स्वतःच्या घरात शिफ्ट झालो, तेव्हा मग पुन्हा त्या विषयाबाबत प्रश्नांचे फोन हा वेगळा अध्याय सुरु झाला. नवीन देशातली सगळी माहिती मिळवणे, इथे घर घेणे हे सगळं बरंचमोठं काम असतं, हे आम्ही पण अनुभवलं होतं. आम्ही सुद्धा आमच्या इथल्या अनुभवी मित्र मैत्रिणींना काही अडलं तर विचारायचो. पण स्वतः सुद्धा आम्ही भरपूर शोधायचो, माहिती मिळवायचो. आम्हालाही कुणी माहिती विचारली तर आम्ही ती द्यायचोच, देतो. पण काही अनुभव असे होते की घराच्या कागदपत्रांवरच्या अगदी प्रत्येक शब्दाशब्दासाठी काहींचे फोन आले, हे काय करू, ते काय करू, हे काय असतं, किचन कसं केलं असे अनेक. यातल्या अनेक कॉमन प्रश्नांना आम्ही उत्तरं द्यायचो, देतो. पण आम्ही कधीतरी गडबडीत असू शकतो, आम्हाला कामं असू शकतात याची शून्य जाणीव असलेले काही जण बघितले की त्रास व्हायचा. आणि यांचा संपर्क पण फक्त या प्रश्नांपुरताच. बरं बरेचदा लोक आम्ही काय करू हे तुम्हीच सांगा म्हणतात, तुमच्या टॉयलेट मध्ये कोणत्या कंपनीचं सीट निवडायचं हे आम्ही कोण सांगणार???? आम्ही फक्त माहिती देऊ शकतो, आमची आमच्या निर्णयांमागची कारण मीमांसा सांगू शकतो, आमच्या चुका तुम्ही करू नका हे सांगू शकतो, पण त्यांचे निर्णय आम्ही घेऊ शकत नाही हे मग त्यांना सांगावं लागायचं.
मध्यंतरी एक भारतीय मुलगा खूप आजारी आहे म्हणून त्याच्या गावातल्या अनेक इतर भारतीय लोकांनी, विशेष करून विद्यार्थांनी सुद्धा त्याला हर प्रकारे मदत केली. यात त्याला हव्या त्या वस्तू आणून देणे, त्याची पथ्य सांभाळून त्याच्या आवडीचे पदार्थ करून नेऊन देणे आणि हे सगळं करोना काळात. पण त्या मुलाने आणि त्याच्या घरच्यांनी मात्र मदतीची जाणीव सोडाच, त्याचे हट्ट अधिकाधिक पुरवायला (बटाटा घालूनच पोहे, मराठीच पुस्तकं हवीत, त्यात पण विनोदीच हवीत, राजमा चावलच पाहिजे) या लोकांना भाग पाडलं, त्यांची मदत गृहीत धरली आणि त्यात काय एवढं असा attitude होता. अश्या वेळी स्वतःच्या शिक्षण नोकरीत बिझी असून हे करणाऱ्या या बाकीच्यांना किती त्रास झाला असेल.
प्रसंग बदलले तरी एकूण हे असे अजून बरेच किस्से लिहिण्यासारखे आहेत, काही विस्मरणात गेलेत तर काहींबद्दल आता उगाळायला सुद्धा नको वाटतं. अजूनही मदत करायचीच नाही असं होत नाही, फक्त कधी, कुठे, कुणाला आणि किती प्रमाणात याचे हिशोब मांडले जातात.
सगळेच असे असतात असं नाही, पण या काही अनुभवांमुळे जेव्हा कुणी साड भावाचा मावस पुतण्या जर्मनीत येतोय, आलाय, म्हणून संपर्क साधतात, तेव्हा आमच्या कडून 'काही वेळा' मात्र त्यांना रिस्पॉन्स मिळत नाही. आम्ही बोट दिलं म्हणून हात पकडणारे भेटले की मग स्वतःहून पुढाकार घेऊन कुणाला मदत करणे हे फक्त आपल्या जवळच्या लोकांसाठीच राखीव ठेवलं जातं. मुळात यातल्या प्रत्येकाशी अगदी गाढ मैत्री होणार नसतेच, काहींशी सूर जुळतात काहींशी नाही असं होणारच, आमची सुद्धा तशी अपेक्षा नसते, ओळख आणि मैत्री वेगळे आहेत, पण निदान ही ओळख तरी ठेवावी, तशी इच्छा तरी असावी असं वाटतं. किमान ज्या कामासाठी संपर्क केला तेवढ्या पुरती तरी जाणीव असावी, त्याचा एखादा अपडेट काम झाल्यावर तरी मिळावा हे नक्कीच वाटतं. काहींकडून चुकून राहत असेलही, पण बेनिफिट ऑफ डाउट सगळ्यांना देता येत नाही.
जुजबी ओळख मैत्रीत बदलली असे अनेक चांगले अनुभव सुद्धा येतात. जिथे नाती दोन्ही बाजूंनी विणली गेली ती मंडळी म्हणजे इथले आमचे कुटुंबीय झालेत. आम्ही सगळेच अडचणीच्या काळात एकमेकांचा आधार आहोत हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. अश्याच कोणत्या निमित्ताने नाममात्र ओळख झालेले काही जण फेसबुक किंवा इतर माध्यमातून भेटत राहतात, नेहमीचा संपर्क नसला तरी कुणी आवर्जून लेख वाचून एखादी प्रतिक्रिया देतात, कधी कुणी एखाद्या सणाला शुभेच्छा देतात, कुणी आमच्या दुःखाच्या काळात आवर्जून विचारपूस करतात, त्याच चांगल्या अनुभवांवर विश्वास ठेवून आम्ही राहतो, राहू.
No comments:
Post a Comment