गौरी गणपतीचे कार्यक्रम, गेट टुगेदर, बेत याबद्दल ची ही पोस्ट
दोन वर्षांपासून भारताबाहेर अर्थात जर्मनीमध्ये आमच्या घरच्या महालक्ष्मी आल्या. मला धार्मिक कार्यक्रम, उपवास, व्रतवैकल्य यात खूप रस नाही. त्यातून केवळ पूर्वापार चालत आलं म्हणून असंच हवं तसंच हवं असे कोणते नियम आम्हाला दोघांनाही आवडत नाहीत. पण भरपूर माणसं एकत्र जमवून सणांच्या निमित्तानं होणारं सेलिब्रेशन मनापासून आवडतं. सणांशिवाय सुद्धा आमचं घर नेहमीच आमच्या जवळच्या लोकांनी भरलेलं असतं, त्यात हे अजून एक निमित्त, त्यामुळे आमच्या परीने जे शक्य आहे ते आम्ही मनोभावे करतो. त्यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाचा स्वयंपाक आणि इतरही व्यवस्थापन आणि ते परदेशात याबद्दलची ही पोस्ट -
इथे सहसा तुम्हाला कोणतीच बाहेरून मिळणारी मदत उपलब्ध नसते, याचा विचार कोणताही कार्यक्रम ठरवताना महत्वाचा असतो. सण सुद्धा त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे एकूणच काळानुसार, इथल्या हवामानानुसार, सोयीनुसार काही बदल करावे लागतील ते करायचे असं आम्ही सुरुवातीलाच ठरवलं. खरंतर एक ठराविक साचेबद्ध पद्धत राहणार नाही, स्थळ काळ वेळ आणि अनुभव यातून गरज पडतील तसे बदल करायचे हे ठरवलं आणि श्रीगणेशा केला. एकत्र सगळे मिळून जेव्हा गणपतीची आरती म्हणतो, ते वातावरण मनापासून आवडतं. हे सगळं आम्ही हे परदेशात बघा कसं करतो याचा दिखावा म्हणून करत नाही, पण आपल्या कुटुंबाच्या जुन्या आठवणी धरून ठेवणारी, आणि तरी काळानुसार बदलत जाणारी एक परंपरा म्हणून आम्ही याकडे बघतो आणि ते जपतो.
आमच्याकडच्या उभ्याच्या गौरी आहेत, ज्येष्ठा कनिष्ठा आणि एक बाळ. सुरुवातीला फक्त मुखवटे इथे आणले. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीचा मुख्य प्रश्न होता. इकडे तिकडे बघून विचारून माहिती शोधली. त्यासाठी मीठ आणि कॉर्न फ्लोअर वापरून प्ले डो तयार केला आणि मग काही व्हिडीओ बघून नवऱ्याने मूर्ती घडवली. बारीक सारीक चुका असतील पण आम्ही मनापासून केली त्यामुळे आम्हाला आवडली, शिवाय इको फ्रेंडली असल्यामुळे नंतर घरी बदलतीतच विसर्जन करून ते पाणी झाडांना दिलं. डेकोरेशन घरीच उपलब्ध साहित्यातून करतो.
गौरी पूजनाच्या दिवशी सकाळी फक्त आम्ही घरचे
४-५ जण असतो - पुरणपोळी, वरण भात, पोळी, उकडलेल्या बटाट्याची भाजी, कटाची
आमटी, खोबऱ्याची चटणी आणि अजून एखादी भाजी. कुणीच एकदम खूप खाऊ शकत नाही
त्यामुळे साधं, आमच्या आवडीचं असं बेताचं करतो. त्याचा काही ताण घेत नाही.
पुरण आदल्या दिवशीच करून ठेवतो. इथल्या स्वयंपाकघरात मुख्य वावर माझा
असल्यामुळे, माझा वाटा जास्त असला तरी तेवढाच हातभार घरातल्या सगळ्यांचाच,
स्त्री पुरुष असा कोणताही फरक न ठेवता सगळ्यांचा सहभाग असतो. स्वच्छ अंघोळी
करून याशिवाय बाकी सोवळं वगैरे काहीही नियम नसतात. पूजा झाल्यावर सगळे
एकत्रच जेवतो.
संध्याकाळी येणारी बहुतांश मंडळी ही बरीच लांबून येतात, सकाळी सगळ्यांचे ऑफिस शाळा असतात, त्यामुळे संध्याकाळी आमंत्रण देऊन पूर्ण जेवणाचाच बेत ठरवला जातो. जेवणाचा बेत हा उत्तम आणि पोटभरीचा हवा आणि आपल्याला समाधान मिळावं, पण सगळं घरीच करायचं असल्यामुळे कमी कष्टातही व्हायला हवं या विचारातून मी पहिल्या वर्षी आम्ही बेत ठरवला होत.
त्याची आधी तयारी म्हणून -
- येणाऱ्या लोकांना आधी आमंत्रण दिलं असेल तरी दोन दिवस आधी एकदा मी रिमाइंडर पाठवते, म्हणजे वेळेवर कुणी कॅन्सल होणार असतील तर आपल्याला समजतं आणि त्याप्रमाणे प्लॅन करता येतात (लोक स्वतःहून सांगायचे विसरतात असा अनुभव)
- किती लोक आहेत त्याप्रमाणे प्रत्येक पदार्थासाठी लागणाऱ्या सामानाची यादी करून ते सगळं घरात आधीच आणून ठेवणे. मुख्य भारतीय दुकानातून जे आणायचं असेल ते, कारण ते दुकान जवळ नाही.
- घरात पुरेश्या ताटल्या, वाट्या, पेले आहेत का हे बघून ठेवणे. आता बऱ्याच वर्षात राहून सामान वाढलं आहे, त्यामुळे पुरेसं होतं, शिवाय एका मैत्रिणीकडून अश्या वेळी काही जास्तीच्या प्लेट्स आणून ठेवते. माझा कल शक्यतोवर डिस्पोजेबल वस्तू न वापरण्यावर असतो, पण गरज पडली आणि सोयीचं असेल तर तेही वापरते.
- काचेचे पेले आहेत त्यावर ग्लास मार्किंग पेन वापरून सगळ्या येणाऱ्यांची नावं
लिहून ठेवणे, म्हणजे मिक्स होत नाहीत. (डिस्पोजेबल ग्लास असतील तरी सुद्धा हेच)
- सगळं सर्व्ह करण्यासाठी कोणती भांडी घ्यावी लागतील याचा विचार करून, जे गरम करावं लागतं त्यासाठी वेगळी भांडी ठेवणे इत्यादी. हे सगळं बेत कसा आहे त्याप्रमाणे बदलेल.
- घराची स्वच्छता, बाथरूम मध्ये नवीन टॉवेल ठेवणे, हॅन्ड वॉश भरून ठेवणे इत्यादी
तर हा पहिल्या वर्षी ठरवलेला बेत - एकूण २४ लोक होते.
पोळ्या,
वरण, भात, गाजर+ओलं खोबरं अशी कोशिंबीर, मटार निमोना, फुलकोबी + बटाटा भाजी
आणि प्रसादाचा शिरा.
हे ठरवताना असा विचार केला -
- चिराचिरी हा भाग दोन्ही भाज्यांत नसावा, एक काहीतरी सोपं असावं म्हणून, फ्रोझन मटार मिळतात ते वापरून मटार निमोना हा झटपट प्रकार केला. (उत्तर भारतात प्रसाद म्हणून करतात त्याची रेसिपी वाचली होती)
- कोशिंबीरीसाठी गाजर किसायचे होते ते फूड प्रोसेसर वर केलं. फ्रोझन ओलं खोबरं मिळतं, ते काम कमी असतं. एका श्रीलंकन पदार्थ मिळणाऱ्या
ठिकाणी हा प्रकार खाल्ला होता, वरून जिरे, कढीपत्ता अशी फोडणी होती, त्याप्रमाणे हा प्रकार केला)
- फुलकोबी
+ बटाटा चिरून साधीच फोडणी दिली. कांदा लसूण मी अश्या वेळी वापरत
नाही, एक तर एरवीही घरात खूप वाटण वापरून केलेल्या भाज्या होत नाहीत, पण
इथे ज्या भाज्या सहज उपलब्ध आहेत त्यात कांदा एरवी बरेचदा पुरवठ्याला
वापरला जातो, गेट
टुगेदर असतील तेव्हा सोयीचं म्हणून ब्रेड आणि इतर वन डिश मील, चाट असे
प्रकार कॉमन होतात, म्हणून मग या एका दिवसासाठी साध्याच, कांदा लसूण
नसलेल्या भाज्या करण्यावर भर असतो. (जोवर हे सहज जमतं आहे तोवर ठीक आहे,
पण एखादे वेळी नाही जमलं तरी तेव्हा ते समजून घेऊ)
- वरण भरपूर सकाळीच करून ठेवलं होतं.
- चार-पाच दिवस आधीच रोज थोड्या जास्त पोळ्या करून त्या डीप फ्रिज करून ठेवल्या होत्या, वेळेवर गरम करून घेतल्या.
पहिल्या वर्षी कार्यक्रम छान झाला, काही अंदाज साफ चुकले तर काही अगदी परफेक्ट जमले.
त्यानंतरच्या वर्षी एक दिवस रात्री स्थानिक जर्मन लोक आणि दुसऱ्या दिवशी मराठी, भारतीय लोक असे दोन दिवस लोकांना बोलावलं होतं. तेव्हा रात्री इथल्या लोकांना चालेल असा केलेला बेत - पुरी, मटार उसळ, टोमॅटो राईस आणि शिरा. कमी लोक होते त्यामुळे पुरया करणं शक्य होतं. दाण्याचं कूट आणि सुकं खोबरं असं वाटण मटार उसळी साठी आधीच करून ठेवता येतं)
सकाळी आमच्या घरातल्यांपुरता पुरणपोळी, कटाची आमटी, पंचामृत, बटाट्याची भाजी आणि वरण भात असा बेत होता. आम्हालाच पुरण पोळ्या आवडतात, पंचामृत आवडतं आणि एरवी हे पदार्थ केले जात नाहीत, त्यामुळे हे आम्ही स्वत:साठीच करतो. :)
संध्याकाळी
जेव्हा २०-२२ लोक होते तेव्हा केलेला बेत - मटार बटाटा भाजी, सुंदल,
गाजराचं लोणचं, वरण भात, काकडीची कोशिंबीर आणि शेवयांची
खीर. आधी वेळ मिळाला नाही
म्हणून पोळ्या विकत आणल्या होत्या, त्या वेळेवर फक्त गरम करून वाढल्या.
हा
बेत ठरवताना - छोले टिन मधले मिळतात ते वापरून सुंदल केले म्हणजे यात
भाज्या चिरणे/कापणे होत नाही. गाजराचं लोणचं चार दिवस आधीच करून ठेवलं
होतं. काकडीची कोशिंबीर एका मैत्रिणीने आणली. बाकी मग उर्वरित पदार्थ पटकन
झाले.
नंतर सगळा बेत एका वहीत लिहून ठेवते, म्हणजे दर वर्षी तेच पदार्थ रिपीट होणार
नाहीत हे बघता येतं. विकेंड आहे की वीकडे, येणाऱ्या लोकांना अजून कुठे
त्याच दिवशी जायचं आहे की फक्त आमच्या कडे येणार आहेत याप्रमाणे सुद्धा
काही गोष्टी बदलू शकतात. दोन वर्षात ज्या
गोष्टी लक्षात आल्या, म्हणजे येणाऱ्या लोकांच्या आवडी प्रमाणे अंदाज घेता
येतो की कोणती भाजी जास्त लागेल, त्याप्रमाणे मग काही बदल करता येतील हे
लक्षात आलं. शिवाय येणारे बरेच लोक प्रसाद म्हणून गोड काहीतरी घेऊन येतात,
खूप फळं किंवा गोड नंतर कसे संपवायचे ते समजत नाही, त्यामुळे अगदी जवळच्या
काही कुटुंबाना आता तुम्ही यातलं काहीही न आणता एखादा जेवणातलाच पदार्थ
करून आणलात सगळ्यांसाठी तरी चालेल, किंवा आधीच मदतीला आलात तर चालेल असं
विचारलं, मग कोशिंबीर किंवा गोड त्यांनी आणलं.
इथे अनेक जण यातल्या बऱ्याच गोष्टी करत असतील. मी फक्त परदेशात करतानाचा अनुभव, काय बेत करता येईल, काय सोपं करता येईल अश्या दृष्टीने म्हणून हे लिहून काढलं. दर वर्षी त्यात नवीन काहीतरी शिकायला मिळतं, नवीन कल्पना सुचतात त्या पुढच्या वर्षी अमलात आणू असा विचार केला जातो आणि पुन्हा आतुरतेने महालक्ष्म्यांची वाट पाहिली जाते.
फोटो तसे कमी आहेत, यावर्षी आठवणीने पदार्थांचे फोटो काढायचे हे ठरवलं आहे.
No comments:
Post a Comment