उन्हाळ्याची (इथे ऑगस्ट मध्ये असणारी) सुट्टी संपली त्यालाही महिना होऊन गेला तसा. पुन्हा शाळा, डबे, दप्तर भरणे असं सगळं सुरु झालं. तश्या वर्षभर सारख्या कोणत्या ना कोणत्या सुट्ट्या होत्याच, तरीही सलग सहा आठवड्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सगळ्यात मोठ्या आणि नंतर पुढच्या इयत्तेची सुरुवात यामुळे जास्त स्पेशल वाटतात. यावेळी त्याच दरम्यान आई बाबा इथे आले होते, त्यामुळे सृजनच्या या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आजी आजोबांसोबत अजूनच छान घालवता आल्या. आई बाबा परत बुलढाण्यात पोचले, दोन महिन्याच्या वेगळ्या रुटीन मधून ते आणि आम्ही सगळेच बाहेर आलो. तेव्हापासून लिहून ठेवलेल्या काही नोंदी पूर्ण करायला आजचा मुहूर्त लागला.
गेल्या अनेक वर्षात करोनाचा अपवाद सोडला तर बहुतांशी वेळा आई बाबा वर्षातून एकदा इथे येतात. पहिल्यांदा आले तेव्हा तर पहिलाच विमान प्रवास होता, खूप धाकधूक होती. सगळं नवीन म्हणून उत्सुकता असली तरी लहान लहान गोष्टी माहीत नाही आपल्याला यातून थोडी भीती मनात होती आणि मला पण काळजी वाटायची. सृजनच्या जन्मापासून आता नियमित येणं सुरु झालं. सृजनच्या सुट्ट्यांच्या दरम्यान हा प्लॅन केला की आम्हालाही सोयीचं होतं आणि त्यांनाही इथलं उन्हाळ्यातलं हवामान मानवतं. एखादे वेळी हिवाळ्यात पण प्लॅन झालाच, पण तेव्हाच अनुभव बघता आता उन्हाळाच ठीक आहे हे अजूनच जाणवलं. आता त्यांना इथल्या घरात पूर्वीचा नवखेपणा वाटत नाही. बाहेर या देशाच्या असणाऱ्या पद्धती, आम्ही राहतो ते गाव, आमचं घर हे सगळं सवयीचं झालं आहे. आम्ही घर बदललं, तरी एकूण इथे गॅस ऐवजी असणारा Induction ते टॉयलेट बाथरूम मधल्या वेगळ्या सिस्टीम हे सगळं त्यांना माहिती झालं आहे. त्यामुळे ते सहज सगळं जमवून घेतात.
त्यांचं दोघांचंही रुटीन इथे पूर्ण बदलतं. सकाळी लवकर उगवणारा सूर्य ते रात्री दहा पर्यंत त्याचं अस्तित्व हे आता त्यांनाही सवयीचं झालं आहे. त्यामुळे ओघानेच जास्त वेळ पण मिळतो असं वाटतं. आधी आम्ही राहत होतो त्या ठिकाणचे अनेक रस्ते बाबानी शोधून काढले होते. शिस्तबद्द चालणारी बाहेरची दिसणारी कामं त्यांना आवडतात. कचऱ्याचे ट्रक येऊन तो कसा नेतात, मोठ्या कचरा पेट्या ठरलेल्या दिवशी आणि कचऱ्याच्या प्रकारा नुसार बाहेर नेऊन ठेवलेल्या असतात हे बघणं, इथल्या सफाई कर्मचाऱ्यांकडे किती विविध उपकरणं असतात आणि त्यामुळे त्यांना किती फायदा होत असेल, स्वच्छता हे सगळं निरीक्षण त्यांचं सुरु असतं. बाहेर अत्यंत कमी प्रदूषण आणि पायी फिरण्यासाठी खूप चांगल्या सोयी यामुळे ते त्यांना खूप आवडतं. लोकांच्या बागा, त्यातली फुलं आणि सजावटी, पक्षी हे सगळं ते दोघं भरभरून अनुभवतात. आता फोन मुळे फोटो काढणं सोयीचं झालं आहे त्यामुळे फोटोही काढून नेतात आणि मग नंतर मित्रांना दाखवतात. इथल्या दुकानात दिसणाऱ्या विविध गोष्टी बघायला त्यांना आवडतं. कोणत्याही पर्यटन स्थळी जाण्यापेक्षा, त्यांचा मुख्य कल हा इथे सहज अनुभवता येतील अश्या दैनंदिन व्यवहारातल्या नवीन गोष्टी शोधण्या कडे असतो. दुकानात भाषेचा प्रश्न येतो त्यामुळे सहसा मी सोबत जाते, मलाही त्यांना एकेक वस्तू दाखवता येतात. आई आणि बाबांना घेऊन जायची काही दुकानं वेगळी असतात, म्हणजे घरबांधणी, हार्डवेअर अशी काही दुकानं बघण्यात बाबा रमतात. आईला काही आर्ट आणि क्राफ्ट दुकानं आवडतात. काही दुकानं जसं झाडांच्या नर्सरीज, सुपरमार्केट्स, फर्निचर यात दोघांनाही रस असल्यामुळे तिथे दोघांनाही घेऊन जाणं होतं.
दर वेळी आई बाबा आले की ते आमची काही कामं वाटून घेतात. दुसऱ्याच
दिवशी आई स्वयंपाकघराचा पूर्ण ताबा घेते, बाबा त्यांची इतर काही कामं ठरवून
घेतात. त्या दरम्यान आम्ही वर्षभराची पेंडिंग राहिलेली कामं पूर्ण करणे ते
वर्षभराचा भरपूर आराम करून घेणे यावर लक्ष देतो. किंबहुना ते येण्यापूर्वीचे काही दिवस आम्ही प्रत्येक कामात आई बाबा आले की करू असंच म्हणत असतो. रोजचं सगळं खाण्याचं आई बघून घेते त्यामुळे आम्हाला फक्त डिमांड सांगायच्या असतात. इथे विळी मिळत नाही म्हणून आईने खास एक विळी इथे आणून ठेवली आहे. अधून मधून आई बाबांच्या आवडीचं काही मीही त्यांना करून खाऊ घालते, आई साठी
पाणी पुरी आणि बाबांसाठी छोले असे पदार्थ दर वेळी ठरवून केले जातात. कधी खास पिझ्झा ट्राय करायला सांगतो, या बाबतीत आईला पटकन बाकीचे प्रकार आवडतात त्यामुळे आता ती पण पिझ्झा एकदा कर घरी असं सांगते. इथे ठराविकच भारतीय रेस्टॉरंट्स असल्या मुळे तेही आता आई बाबाना माहिती झाले आहेत, तिथे जाऊन आईला भजे खायचे असतात तर बाबाना मँगो लस्सी, त्यामुळे ठरवून एखाद्या वेळी मग बाहेर जेवायला जाणं होतं. घरातली स्वच्छतेची आणि बागेतली बरीच कामं बाबा बघून घेतात. त्यांना आवड आहे आणि वेळ पण जातो, मग खिडक्यांच्या काचा पुसायच्या किंवा घरात काही नवीन फर्निचर आणलं तर ते असेंबल करायचं, झाडांची माती बदलायची, नवीन रोपं लावायची हे ते करत असतात.
सृजन लहान होता तेव्हा त्याला फिरवून आणणे आणि त्याच्या झोपेच्या वेळा वगैरे बघून ते दोघं बाकी दिवस प्लॅन करायचे. आता सृजन मोठा होतो आहे तसे खेळ आता बदलले आणि त्याच्या सोबतच्या गप्पांच स्वरूप पण बदललं. आता तो बाहेर तर त्यांचा दुभाष्या म्हणून काम करू शकतो. त्याचं किंडरगार्टेन आणि आता शाळा घराजवळ असल्यामुळे अधून मधून घ्यायला जाणे किंवा सोडायला जाणे हेही आई बाबांवर सोपवता येतं. यावेळी बाबांनी त्याला घड्याळात
वेळ कशी बघायची हे शिकवलं. आता त्याला पत्ते खेळता येतात त्यामुळे बाबा
त्याला नवीन गेम शिकवत होते. एरवी आईला पत्ते खेळायला अजिबात आवडत नाही, पण
सृजन साठी ती तेही करायची. मी हे दर वेळी मग बोलून दाखवायचे. तोही त्याचे गेम आई बाबांना समजावून सांगून
त्यांना खेळायला लावायचा. आजोबांसोबत सृजनची मस्ती, मग मधूनच भांडणं आणि
पुन्हा प्रचंड प्रेमात येऊन
मिठ्या असं सगळं असायचं. दोघेही आपापल्या मतांवर आणि अमुक एखादी गोष्ट अशीच
करायला हवी यावर ठाम असतात, मग "आजोबा
तुम्ही इकडे यायचं
नाही" असं सांगून पुन्हा थोड्या वेळाने "आजोबा आंघोळ घालून द्या, कपडे आणून
द्या" असे लाड पण पुरवून घ्यायचा. आजोबा सृजनची सायकल चालवायचे. आई अश्या
वेळी सतत कश्याला म्हणते पण सृजनला आजोबाना लहान सायकल वर बसलेलं बघून खूप
मजा येते. बाबांना सध्या मोठमोठे पझल्स लावायचा छंद लागला आहे. इथे त्यात
भरपूर
व्हरायटी मिळते म्हणून मी त्यांना ते आणून देते. मग ते पूर्ण लावायचे असतात
भारतात, तरी इथे ते पूर्वतयारी करून ठेवतात आणि मग भारतात जाऊन लावतात. ते
पूर्ण झाले की त्याच्या फ्रेम्स करून कुणाला गिफ्ट देतात. आता दुकानात पझल दिसले की सृजन ते आजोबा लावतील म्हणून मला सांगतो. यावेळी आईने सृजनला रोज माझ्या लहानपणीच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्या मलाही कदाचित आठवत नसतील पण सृजनला माहीत आहेत असं आता तिचं म्हणणं आहे. आजी सोबत बऱ्याच Pinterest वरच्या कलाकृती करणे हेही सृजन आणि आजी दोघांचं आवडतं काम आहे. मी त्यांना फक्त सामान पुरवायचे, बाकी मग ते मिळून सुरुवात करायचे, मग सृजन नंतर आता आजी तू कर म्हणून बाजूला व्हायचा आणि मग आजी आजोबा मिळून ते करायचे. मग पुन्हा सृजन जॉईन व्हायचा आणि नवीन केलेल्या वस्तू ठेवायच्या कुठे हा प्रश्न माझ्यावर सोपवला जायचा. तरी त्याचे इतर काही गेम आजी हौसेने यावरून द्यायची. सुरुवातीला शाळा होती तेव्हा आजोबांसोबत गणिताचा अभ्यास पण चालायचा. बाबा मला शिकवायचे तेव्हाही मला त्यांची पद्धत वेगळी वाटायची. आता इथल्या अजून नवीन पद्धती आहेत. पण तरी जर्मन आणि इंग्रजी आणि मराठी अश्या भाषांमधून आकडे सेम असल्या मुळे त्यांचा काहीतरी संवाद सुरु असतो.
सृजन जेव्हा आई बाबांना काही बोलून गप्प करतो, तेव्हा माझ्यातल्या मुलीला फार भारी वाटतं. एरवी ऐकत नाही तुम्ही पण त्याने म्हटलं की बरोबर ऐकता, मी कधीच तुम्हाला त्रास दिला नाही, पण बरं आहे नातू आता नाचवतो तुम्हाला अधून मधून"असं म्हणायला मजा येते. शिवाय एरवी त्याला रागावू नको असं मला सांगणारी आई, एखाद्या वेळी का होइना त्यालाही 'माझ्या मुलीला त्रास नको रे देऊ' म्हणून सांगते तेव्हा तर जग जिंकल्याचा आनंद असतो.
आम्हाला सगळ्यांनाच आपापला वेळ पण आवडतो. त्यामुळे आई बाबा त्यांच्या वेळे नुसार वेगवेगळे फिरायला जायचे. मग संध्याकाळी पुन्हा एकत्र जायचे आणि अधून मधून आम्ही सगळेही जायचो. एक बाई रोज सकाळी आईला बघायची आणि हसायची. तिनेही एक दिवस आईला थांबवून भारतातून आलात का विचारलं. भाजीवाल्याचा किस्सा लिहिला होताच वेगळ्या लेखात. मागच्या वेळी तर आई बाबा फिरायला गेले, तेव्हा माझ्या इथल्या एका मैत्रिणीने चेहऱ्यावरून अंदाज केला की हे मधुराचे आई बाबा आहेत आणि त्यांच्याशी इंग्रजीतून बोलली, मग घरी आल्यावर मला समजलं. परक्या वाटणाऱ्या गावात असं आपल्याला कुणी ओळखतं याचा आनंद वेगळा असतो. त्यात जर सृजनही त्यांच्या सोबत गेला आणि कुणी त्याचे मित्र वगैरे दिसले, की त्याचे आजी आजोबा असावेत हे ते ओळखून कधी आई बाबांना हॅलो आणि थोडेफार त्यांच्याशी बोलायचे. यावर्षी तर आई बाबा इथे असतानाच मामा मामी युरोप ट्रिप वर होते. त्यामुळे आम्ही एक दिवस त्यांना घरी घेऊन आलो. दुसऱ्या दिवशी त्यांना पुढे जायचं होतं, पण तेवढ्या वेळात आई बाबांनीच त्यांना आमच्या गावात पायी जमेल तेवढं सृजनची शाळा ते लायब्ररी आणि कुठे कोणती फुलं आली आहेत ते सगळं दाखवून आणलं.
अर्थात तरी त्यांना इथल्या काही नियमांचं, भाषेचं दडपण सुद्धा येतं. इथल्या वैद्यकीय कामात किती प्रचंड वेळ लागू शकतो, त्यात पुन्हा भाषा, यामुळे इथे डॉक्टर कडे जायची वेळ येऊ नये असं त्यांना वाटत असतं. त्यांची भीती रास्तही असते, पण आम्ही त्यांना धीर देत राहतो.
एक दीड महिना झाला की आई बाबांना तिकडे जाण्याचे वेध लागतात तसे तिथल्या त्यांच्या सगळ्या मित्र मंडळींना पण लागतात. अधून मधून फोन, व्हिडीओ कॉल करून बोलणं होत असतंच. पण प्रत्येक वेळी तिकडून आणि इकडून पण काउंट डाऊन होतोच, शेवटच्या आठवड्यात तर कधी येताय, लवकर या अश्या मेसेजेसचा रतीब लागतो. ते घरी जायच्या आधी मदतनीस बाई येऊन घर स्वच्छ करून जाते. शेजारी लक्ष ठेवून असतातच. जातील तेव्हा प्रवासातून गेल्यावर म्हणून कुणी स्नेही डबा पण आणून देतात. या वेळी ते इथे असतानाच बुलढाण्यातलं घर फोडायचा प्रयत्न झाला. एक दिवस सकाळी उठलो ते याच बातमीने. सुदैवाने काहीच चोरीला गेलं नाही पण तिथल्या शेजाऱ्यांनी तुम्ही निश्चिंत राहा सांगून इतर कामं करून घेतली.
निघण्याची वेळ येते तसं थोडं वाईट वाटतं, पण काय काय केलं एवढ्या दिवसात, किती छान वेळ सोबत मिळाला असंही वाटतं. एखाद्या वेळी कोणत्याही कारणाने भांडून पुन्हा एक होऊन झालं की मग हसू पण येतं. आता ट्रिप सार्थकी लागली असे विनोद पण करतो. काहीतरी करायचं राहून गेलं नेमकं अशीही काही गोष्टींची उजळणी होते. हे पुढच्या वेळी करू आता असं मग ठरवलं जातं. एकमेकांच्या आठवणी येतील या विचाराने हळवं वाटतं, तरी ते आपापल्या रोजच्या सरावलेल्या ठिकाणी जायला पण उत्सुक असतात. आम्हीही त्यांच्या सोबत राहून पुन्हा रुटीन सुरु करण्यासाठी फ्रेश झालेलो असतो. ते निघाले की काही दिवस घर खूप शांत शांत वाटतं, घरी आहेत तर मनात येईल तेव्हा बोलू असं न होता सगळं फोन वर बोलणं सुरु होतं. पण तेव्हा बोलण्यात येणारे सगळे संदर्भ त्यांनी प्रत्यक्ष बघून झाल्यामुळे ओळखीचे वाटतात. कोणती बिल्डिंग नवीन झाली, कुठे पानांचे रंग बदलले असं आता मी फोन वर सांगते, तेव्हा त्यांना ते माहिती असतं. झाडांची चौकशी करून ते नीट आहेत ना हे ते आवर्जून विचारतात. तिकडे चोर येऊन गेले ते सगळं एकदा चेक करा पुन्हा म्हणून सृजन त्यांना विचारत राहतो. आजी आजोबांसोबत उन्हाळ्याच्या सुट्ट्या या आमच्या वेळी जश्या होत्या, त्यापेक्षा आता खूप वेगळ्या असल्या तरी खूप सारख्याच वाटतात. काळ बदलला, देश बदलले तरी हे सगळं जमेल तेवढं जपून ठेवता येतं.







No comments:
Post a Comment