Thursday, November 30, 2023

२०२३ - पहिला हिमवर्षाव

आज सकाळी सृजनला शाळेत सोडायला निघाले, तेव्हाच एक दोन थेंब पडल्याचे जाणवले. ' पुन्हा पाऊस की काय ' असं म्हणे पर्यंत हा बर्फ आहे ही जाणीव झाली आणि ' बर्फ!! ' , असं म्हणत आमचा दिवसभराचा पूर्ण मूड सेट झाला. मी पुन्हा घरात जाऊन सृजनचा रेनकोट घेऊन आले. या वर्षीचा पहिला भुरभुर स्नो, बरोब्बर आम्ही चालत जात असताना तेवढ्या वेळात सुरू झाला, कापसा सारखा वगैरे टिपिकल विशेषण देता येतील असा...मोजून चार मिनिट पडला, पुढच्या दोन तीन मिनिटात वितळला सुद्धा..पण तो पहिला स्नो अनुभवता आल्याचं फिलिंग फार भारी होतं :) 

आमच्या भागात नसला तरी जर्मनीत इतरत्र बर्फ पडायला आधीच सुरुवात झाली होती. घरी येऊन चहा घेऊन ऑफिसचे काम करत बसले आणि थोड्या वेळाने बाहेर पाहिलं तर भरपूर बर्फ पडायला सुरुवात झाली होती. There is something magical about the first snowfall हे वाक्य कितीही cliche असलं तरी खरं आहे. शाळेत हा स्नो बघून सृजन आणि सगळी मुलं किती खुश झाली असतील हे दृश्य डोळ्यासमोर आलं.  आमच्या बिल्डिंग समोर पण एक शाळा आहे, फोटो काढू म्हणून मी खिडकी उघडली तर तिथून मुलांचा चांगलाच आवाज येत होता, सगळे ओरडत होते. ख्रिसमसची तयारी म्हणून कागदी स्नो man तिथल्या खिडक्यांवर चिकटवले आहेत, त्याच्याच पुढे पडणारा बर्फ दिसत होता. पक्षी उडत घरट्या कडे जाताना दिसले. गेल्या अनेक आठवड्यात अक्षरशः सतत पाऊस पडल्या नंतर, आजचा हा स्नो बघून, ती सगळी मरगळ आपसूक निघून गेली. 

ऑफिस मीटिंग मध्ये हवामान या प्रश्नावर 'आला बरं का आमच्या कडे पण स्नो' असं सांगून मी कामाच्या आधी ते अपडेट देईन हे सगळं डोक्यात आलं, तेव्हाच लख्ख ऊन पडलं. हळूहळू बर्फ वितळला, गवतावर असलेला पांढरा रंग जाऊन त्याची जागा टपोऱ्या पाण्याच्या थेंबानी घेतली आणि मग तीही अदृश्य झाली. पण सूर्यप्रकाशाचा अगदीच दुष्काळ होता, त्यामुळे ते ऊनही तेवढंच छान वाटलं. आज शाळेतून आल्यावर लगेच सृजन त्याला दिसलेल्या स्नो बद्दल  उत्साहाने वर्णन करून सांगितलं. 

आता पुन्हा बर्फाचा मागमूस नाही, पण अधून मधून बर्फ पडत राहील अशी रोज आशा असेल, मग जास्त झाला तर त्यातून पाय घसरून पडायची भीती वाटेल, गाडीवर पडलेला बर्फ काढताना नकोसं होईल. भरपूर बर्फ झाला की फोटो तेवढे पुरेसे असतात. पण पहिला स्नो बघून जे अप्रूप वाटतं, त्याचा जो आनंद होतो तो खास असतो, त्यामुळे त्याबद्दल पुन्हा नव्याने लिहावं वाटतं...

No comments:

Post a Comment