Sunday, January 14, 2024

अनिवासी भारतीयांना विचारले जाणारे प्रश्न - भाग १ - स्वयंपाक

स्वयंपाक जमतो का तुला? घर सगळं manage होतं का? काय काय मिळतं तिकडे? चालेल ना इकडचं जेवण, की पिझ्झा बर्गर ची सवय झाली आता फक्त? काय करते जेवायला? पोळी भाजी वगैरे करते का? हे आणि असे अनेक प्रश्न हे वधुपरीक्षेचे नसून, अनिवासी भारतीयांना विचारले जाणारे प्रश्न असतात. यातले बहुतांशी प्रश्न कुतूहलातून आलेले असले, तरी काही टक्के प्रश्नांचा सूर वेगळा जाणवतो. कधी ते "मला" जमतं का अश्या पूर्वग्रहातून येऊ शकतात. कधी ते बघू काय काय करू शकतात आजकालच्या मुली? (मी खरंतर ती वयोमर्यादा पार केली आहे आधीच तरी) अश्या विचारातून येतात. कधी परदेशात जाऊन खाण्याच्या सगळ्या सवयी बदलतात अश्या विचारातून येतात. कधी परदेशातल्या कुणा पाहुण्यांच्या अनुभवातून येतात किंवा अजून काही. अर्थात अनेकांना मनापासून फक्त इकडे काय मिळतं, स्वयंपाक करायला वेळ manage कसा करायचा इत्यादी प्रश्न असतात जे अगदीच खरे असतात. तर अश्या विविध प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं या लेखातून मिळवीत अशी अपेक्षा आहे..

खरंतर या सगळ्याला एक ठराविक असं उत्तर नाही. भारतात सुद्धा, प्रत्येक घरात कसा, किती, किती वेळा स्वयंपाक केला जातो, कोण करतं हे बदलतं, तसंच अनिवासी भारतीयांकडे सुद्धा, प्रत्येकाच्या घरी बनणारा स्वयंपाक वेगळा असतो. "व्हेन इन रोम बी रोमन" म्हणत अभारतीय पदार्थच करणारे आणि खाणारे असतात, काही फक्त भारतीयच योग्य म्हणत बाकीच्यांना बाजूला सारतात. पण मोठा एक गट, हा मुख्यत्वे भारतीय स्वयंपाक आणि त्याला स्थानिक, आंतरराष्ट्रीय संस्कृतींची जोड अश्या प्रकारे दोन्हीचा मेळ साधणारा असतो. त्यामुळे त्यांच्या स्वयंपक घरात भारतीय आणि अभारतीय दोन्ही प्रकारचे पदार्थ रांधले जातात. 

जर्मनी बद्दल बोलायचं झालं, तर कोणत्याही सुपर मार्केट मध्ये कांदे, बटाटे, टोमॅटो, कांद्याची पात, रंगीत सिमला मिरच्या, लसूण, आलं, लिंबू, वांगी, पालक, बीट, मुळा, गाजर, फुलकोबी, पानकोबी, नवलकोल, कांद्याची पात, एक दोन प्रकारच्या शेंगा आणि काही सलाड हमखास मिळतात. मश्रुम, ब्रोकोली, झुकिनी याही भाज्यांची इथे येऊन ओळख होते. ऋतुमानाप्रमाणे लाल भोपळा, ऍस्परॅगस याही भाज्या मिळतात. याशिवाय फ्रोझन सेक्शन मध्ये पालक, मटार, लाल भोपळा, मिश्र भाज्या हे प्रकारही मिळतात. त्याशिवाय भारतीय ग्रोसरीच्या दुकानात दुधी, कारली, भेंडी, पडवळ, कधीतरी मेथी, गवार, दोडकी, लहान वांगी या भाज्या दिसतात. भारतीय दुकान मात्र बरेच वेळा जरा दूर असू शकतात, त्यामुळे रोजच्या भाज्यांसाठी स्थानिक सुपरमार्केट जास्त सोयीची असतात. 

या इथे उपलब्ध असणाऱ्या भाज्या, भारतीय दुकानात मिळणाऱ्या भाज्या, डाळी, तांदूळ, कडधान्य, कणिक आणि भारतीय दुकानात मिळणारे बेसिक मसाले यावर रोजचा भारतीय, मराठी स्वयंपाक करता येणं सहज शक्य असतं. काही जण गरज म्हणून स्वयंपाक करतात तर काही आवड म्हणून. इथे येऊन भारतीय चव अजूनच हवीहवीशी वाटते म्हणून काही जण शिकतात. मुळात उत्साह असेल तर आपोआप प्रयोग पण केले जातात. एखादा पदार्थ मिळत नसेल तरी त्याला पर्यायी घटक पदार्थ शोधून मग त्यातून नवीन पदार्थांची निर्मिती होते.  बटाट्याचे सुद्धा चार प्रकार आणि कांद्याचे पण अनेक प्रकार मिळतात. मग पाव भाजी साठी कोणता बटाटा आणि काचऱ्या करायला कोणता बटाटा हे हळूहळू समजतं.

माझ्या पुरतं बोलायचं झालं तर रोजचा स्वयंपाक प्रामुख्याने भारतीय होतो. सगळं रोज सकाळ संध्याकाळ जमलं नाही, तरी दिवसभरात पोळी भाजी किंवा वरण भात हे प्रकार होतातच. विविध प्रकारच्या उसळी, वरणाचे प्रकार होतात. पराठे, धिरडी, थालीपीठ हेही केले जातात. उपवास करत नाही पण आवडते म्हणून साबुदाण्याची खिचडी होते. आम्ही दोघंही चहा प्रेमी असल्यामुळे सकाळी आलं घातलेला चहा होतोच होतो, पोहे उपमा, उकरपेंडी हेही पदार्थ नाश्त्याला होतात. खिचडी, पापड, कढी, वरण फळं, फोडणीची पोळी, तिखट मिठाच्या पुऱ्या, शेवभाजी हेही बेत केले जातात. उन्हाळ्यात चाट पार्टी केली जाते. दर काही आठवड्यांनी बटर पासून तूप तयार करून ठेवणे हे आवर्जून केलं जातं. ठराविक सणांच्या दिवशी ठराविक पदार्थ करायला जमेल अस नाही, पण अधून मधून प्रयत्न नक्कीच केला जातो. होळीला पुरणपोळी झाली नाही तरी, सृजनने फर्माईश केली म्हणून मी त्याला केव्हाही पुरणपोळी करून खाऊ घालू शकते. मागच्याच आठवड्यात एकच दिवशी पुरणपोळी ते मेथीचे लाडू या रेंज मधला स्वयंपाक घरात झाला. याशिवाय पास्ता, ब्रेड आणि सूप, सँडविच असे प्रकार पण आठवड्यातून एकदा होतात. ऑफिस मधलं schedule कसं आहे, हवामान कसं आहे, ग्रोसरी काय मिळाली आहे यावर पण काही गोष्टी अवलंबून असतात. भारतीय दुकानात जाणं झालं आणि भाज्या मिळाल्या तर त्या पहिले केल्या जातात. जमेल तेव्हा आठवड्याचा बेत आधीच ठरवून, काही तयारी रविवारीच करून ठेवली जाते. इथे सगळी कामं घरीच करायची असतात, त्याला अनुसरून सोपे आणि पटकन होणारे पदार्थ त्या त्या वेळी केले जातात. याशिवाय लाडू, वड्या, श्रीखंड, खिरी हे गोड पदार्थ पण केले जातात. बेकिंग आवडायला लागल्या पासून आठवड्यातून एकदा हमखास केक केला जातो. त्यात पण शक्य तेवढे पौष्टिक घटक पदार्थ घेऊन प्रयोग केले जातात. 

आता लहान मुलांबद्दल (इथेच जन्माला येऊन वाढलेल्या मुलांबद्दल) - सरसकट त्यांना फक्त इथलंच जेवण आवडतं, असेही लोक असतात. पण बहुतांशी पालक मुलांना आपलं भारतीय अन्न हेच प्राथमिक आणि सोबतीला इतर काही अश्या पद्धतीने वाढवणारे असतात. . रोज पूर्ण वेगळं जेवण शाळेत असेल तर, प्रत्येक मुलाच्या काही आवडी निवडी असू शकतात. जसं सृजनला काही गोष्टी आवडत नाहीत, पण त्या भारतीय आहेत म्हणून आवडत नाही असं नसून, तो केवळ व्यक्ती म्हणून त्याच्या नावडीचा भाग असतो. त्याला इथल्याही सगळ्या गोष्टी आवडत नाहीत. शिवाय लहान असताना तर फेजेस सुरु असतात, आवड नावड बदलत असते. तरीही काही वेळा, शाळेत ठराविक भारतीय पदार्थ न नेण्याकडे भारतीय मुलांचा कल असतो, आणि त्यात मला काही चूक पण वाटत नाही. काही गोष्टी आपण शाळेचे नियम म्हणून ऐकायचो, तसे हे नियम नसले तरी सतत वेगळं दिसत राहण्याचा मुलांना ताण पण येऊ शकतो. ज्यांना शाळेत जेवण मिळतं, नर्सरीत मिळतं त्यांना त्याही पदार्थांची सवय होते. मोठी होत जातात तसं वयानुसार आपोआप गोष्टी त्यांना हाताळता येतात, त्याप्रमाणे मग बदल सुद्धा होऊ शकतात. आपले पदार्थ इथल्या लोकांना पण ओळखीचे होतात, त्या देवाण घेवाणि मधून नवीन पदार्थ इथल्या लोकांपर्यंत पोचतात. पण तोपर्यंत वेळ लागू शकतो.

इथे जे अनेक भारतीय भेटतात, त्यात प्रत्येकाचं स्वयंपाकाचं नातं वेगळं असतं. अजूनही कित्येक पुरुषांना एकटे राहत असले की साधं सँडविच सुद्धा करून घ्यायचं नसतं. ते मग रोज बाहेरच्या जेवणावर निभावून नेतात. बायको आली की मात्र मग पूर्ण डबा मिळावा अशी अपेक्षा असते. यात स्वयंपाक पेक्षा, आळस, कंटाळा आणि जबाबदारीच नको अशी मानसिकता असते. पण अनेक मुलं इथे एकटे राहत असताना, त्या संधीचा फायदा घेऊन स्वयंपाक शिकतात, नवीन प्रयोग करतात, आवडीने इतरांना जेवू घालतात. हे वेगळं लिहिलं कारण मुलींच्या बाबतीत बहुतांशी स्वयंपाक येणे किंवा येत नसेल तरी शिकणे हे गृहीत धरलेलं असतं. अपवाद असतातच आणि तशी उदाहरणे आजूबाजूला सुद्धा दिसतात. त्याशिवाय प्रत्येक व्यक्तीचा उत्साह वेगळा. म्हणजे रोज कुणाकडे काय स्वयंपाक होतो हे ही वेगळं असू शकतं. पण वर लिहिलं आहे तो पॅटर्न कॉमन दिसू शकतो. फॅमिली असतील तर मुलांच्या शाळा, त्यांचे डबे याप्रमाणे बदल होतात. ऑफिस कॅन्टीन मध्ये काय मिळतं त्याप्रमाणे सकाळचे जेवण बाहेर झालं, तरी रात्री बहुतेक जण भारतीय आणि घरचं जेवण प्रीफ्रर करतात. उत्साहाने अनेकांना जेवायला बोलवणारे असतात. त्यातून ओळखी होतात. मग मैत्री झाली की अमुक मैत्रिणीच्या हातचे मोदक, एकीच्या हातचा पुलाव, कुणाच्या हातचा चहा, कुणाकडे केक अश्या प्रत्येकीच्या हातखंडा पदार्थांची ओळख होते, त्या आठवणी तयार होतात. कुणाच्या घरचं गणपतीचं जेवण, कुणाकडचे दिवाळी फराळ असं लक्षात राहतं. 

दुसरं टोक म्हणजे, भेटून ओळख होऊन सुद्धा, एकतर्फीच जेवण किंवा चहा कॉफी आमंत्रण होतात, ते दुसऱ्या बाजूकडून सोयीस्कर नेहमीच टाळले जाते.  किमान चहा ला या असं सुद्धा काहींच्या तोंडातून येत नाही. प्रत्येक जण मुद्दाम करत नाही, पण असे लोक अधून मधून नक्कीच भेटतात. असे अनुभव भारतात सुद्धा येऊ शकतात, पण इथे तुमचं सामाजिक जीवन हे पूर्णपणे या अश्या ओळखीवर असल्यामुळे, ते ठळक पणे जाणवतं. अनुभवातून अर्थातच आपण शहाणे होतो आणि पुढे जातो. 

बऱ्याच जणांची पार्टी असेल तर पाव भाजी, छोले, मिसळ, इडल्या, भाताचे विविध प्रकार यांना प्राधान्य दिलं जातं. आता बऱ्याच ठिकाणी अश्या पार्टी साठी बायका स्वयंपाकाची ऑर्डर घेतात, दिवाळीच्या फराळाची ऑर्डर घेतात. याशिवाय भारतीय Restaurants पण असतातच, जिथे मुख्य पंजाबी आणि इतर काही पदार्थ मिळू शकतात. 

भारतात मिळणाऱ्या भाज्यांची व्हरायटी इथे मिळत नाही, ही गोष्ट खरी आहे, त्यामुळे माझ्यासारख्या भाज्या आवडणार्यांना भारताची फार आठवण येते. काही जण भारतात भाज्या खायला नाक मुरडून, इथे येऊन मग त्या भाज्यांच्या आठवणीत गळे काढतात असं सुद्धा होतं. मांसाहारी लोकांना जरी बरेच प्रकार इथे मिळाले, तरी त्यात भारतीय चव Missing असते. माश्यांचे प्रकार इथे वेगळे मिळतात, त्यातही फ्रेश पेक्षा फ्रोजन मासे जास्त, त्यामुळे मासे आवडणाऱ्या लोकांना पण इथे मिळणाऱ्या प्रकारातूनच निवडावे लागतात. 

अर्थात इथे बरीच वर्ष राहून सवयी बदलतात, आता खूप तिखट तर्री वालं जेवण जात नाही. अगदी गोड म्हटलं तरी इथले केक खाऊन भारतातले काही केक, चॉकलेट हे प्रकार पण आता पूर्वी सारखे आवडत नाहीत. जसे पोहे खावेसे वाटतात, तसं बेकरी मधून क्रोसो किंवा मफिन पण खावासा वाटतो. इथले काही पदार्थ आवडणाऱ्या यादीत येतात. पण अजूनही पोळी आणि भाजी, वरण भात हे घरगुती जेवणच खरं समाधान देतं. कोणतेही स्विगी zomato इथे नसल्या मुळे, स्वतः करून आपल्या जिभेचे चोचले पुरवावे लागतात, त्या स्वावलंबनात एक वेगळा आनंद पण मिळतो. स्वयंपाकघराच्या Management बद्दल अनुभव वर्षागणिक वाढत जातो. नवरा बायको दोघांचा वाटा वेगळा असेल, भूमिका वेगळी असेल तरी स्वयंपाकघरात सहभाग असणे हे चित्र त्यातून जास्त दिसायला लागतं. मला गरम पोळी आणि तूप खूप आवडतं असं सृजन म्हणतो तेव्हा माझ्यातली आई सुखावते. शिरा करून दे हा त्याचा हट्ट बाबा पण पुरवतो. भारतात आलो की घरगुती खास पदार्थांची यादी तयार असते. त्या दिवसात पास्ता बिस्ता आठवत सुद्धा नाही. सृजन ला अधून मधून इथल्या काही पदार्थांची आठवण येते, पण ते मिळत नाहीत एवढं पुरे असतं. इथे परत आल्यावर तो मग ते पुन्हा एन्जॉय करतो. 

घराबाहेर राहून जसे धडे मिळतात तसे इथे देशाबाहेर राहून पण होतं, मिळेल त्यातून जुळवून घ्यायला जमतं. आईच्या हातचे पदार्थ आठवतात, पुण्यातली बाहेर खायला जायचो ती ठिकाणं, तिथल्या चवी आठवतात, ते होणारच. पण त्याच बरोबर इथे दोन खाद्यसंस्कृती एकत्र येऊन, आपल्या घरातल्या वेगळ्या आठवणी, चवी, पाककृती आपण नव्याने तयार करत जातो. 





No comments:

Post a Comment