Sunday, February 25, 2024

बुलढाणा - भाग १

मैत्रीण नावाच्या एका मराठी संस्थळावर "आपला जिल्हा" नावाने एक उपक्रम होता, त्यात मी बुलढाणा जिल्ह्याबद्दल थोडक्यात लिहिलं होतं. महाराष्ट्रात सुद्धा तेव्हढा परिचित नसलेला हा पूर्ण भाग. काल एक फेसबुक पोस्ट वाचून पुन्हा हा लेख आठवला. मूळ लेख खूप मोठा आहे, त्यामुळे इथे एकेक भागात पोस्ट करेन. 

बुलढाण्या बद्दल लिहायचं हा विचार करतानाच कधी लिहायला सुरूवात करेन आणि मग काय काय लिहावे याचे अनेक इमले मी मनातल्या मनात बांधले होते. बुलढाणा आणि आसपासच्या लोकांना यात सगळं ओळखीचं वाटेल, पण लेख जास्त बाहेरच्या लोकांना एका वेगळ्या गावाची ओळख व्हावी, माहिती मिळावी अश्या दृष्टिकोनातून लिहिला आहे.  माझ्या गावाची, जिल्ह्याची ही थोडक्यात ओळख. इतिहास, भूगोल, दळणवळण, सामाजिक संस्कृती, खाद्यसंस्कृती, पर्यटन, प्रसिद्ध जागा लोक असे जनरल मुद्दे आणि माझ्या मनातलं, आठवणीतलं बुलढाणा आणि ओघाने कदाचित त्या बद्दलच्या गप्पा. 

अगदी वरवर ओळख म्हणजे, गजानन महाराजांचे शेगाव, उल्कापाताने झालेले लोणार सरोवर, जिजाबाईंचे माहेर सिंदखेडराजा, थंड हवेचे ठिकाण या ठळक गोष्टी. मी शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर पडले, तेव्हापासून 'तू कुठली?' हा प्रश्न आला की मी बुलढाणा सांगायचे. मग बरेच वेळा समोरच्या चेहर्‍यावर प्रश्नार्थक भाव असायचे. "हां आहे कुठेतरी ऐकलेलं, असेल एखादं गाव, बापरे तिकडे खूप गरम असतं ना, कुठे आहे हे बुलढाणा? " यातले एक किंवा अनेक प्रश्न यायचे. कधी कुतूहल, कधी आश्चर्य, कधी एवढ्या दुरून आली म्हणून कौतुकही. मग मी या वरच्यापैकी काहीतरी ओळख सांगायचे.

आणि जर कुणाचे नातलग बुलढाणा किंवा जवळपासचे असतीलच, तर त्यांच्याशी बोलताना मात्र हमखास कॉमन ओळखी निघायच्याच, कारण लहान गाव. त्यामुळे ओळख निघायचीच काहीतरी.
शिवाय जवळपास्चं कुणी भेटलं तर 'प्रॉपर बुलढाणा का?' असा प्रश्नही यायचा. त्यामागे कारण असं की अनेक जण आजूबाजूच्या खेड्यातून इथे शिक्षण, नोकरी निमित्ताने यायचे, ते इतरत्र बुलढाणा अशी ओळख सांगत असले तरी मुळ बुलढाणा वासीयांना ते त्यांचं अजून कुठलंतरी लहान गाव पण सांगू शकायचे, माहीत असेल म्हणून. (जसं आम्ही भारताबाहेर मुख्य महाराष्ट्र अशी ओळख सांगतो, मग कुणाला किती माहिती असेल त्याप्रमाणे मग अजून सविस्तर सांगितलं जातं, नाहीतर तेवढंच पुरतं. असो मूळ मुद्द्याकडे जाते.

हे बुलढाणा जिल्ह्यातले तालुके -

  • चिखली
  • मेहकर
  • लोणार
  • खामगाव
  • शेगांव
  • मलकापूर
  • नांदुरा
  • जळगाव जामोद
  • मोताळा
  • संग्रामपूर
  • देऊळगाव राजा
  • सिंदखेड राजा

यातल्या काहींबद्दल अजून सविस्तर पुढे लिहीनच. पण आधी या मुख्य गावाबद्दल.

मूळ तसं हे भिल्लठाणा. मग ते पुढे बुलढाणा झालं, बुलडाणा झालं. मध्यंतरी मात्र ते "बुलढाणा"च आहे असं शासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे याबद्दल ऐकलं. हा नावांबाबतचा गोंधळ नेमका काय हे मलाही माहीत नाही. मी नेहमी बुलढाणा ऐकतच मोठी झाले. त्यामुळे स्पेलिंग पण तसेच केले. माझ्या लहानपणी पण आठवतं त्याप्रमाणे काही एस टी बसेस वर बुलडाणा असायचं, काहींवर बुलढाणा. जुन्या सरकारी नोंदीत बर्‍याच ठिकाणी बुलडाणा आहे, पण काही बुलढाणा सुद्धा आहे. माझ्याकडून अजूनही उल्लेख बुलढाणाच होतो आणि ते कायमस्वरूपी तसंच राहील. 

एका बाजूने मध्य प्रदेश, एकीकडे मराठवाडा, एकीकडे खान्देश आणि आमचा हा जिल्हा विदर्भात. त्यामुळे सगळ्यावरच या वेगवेगळ्या प्रदेशांचा प्रभाव दिसतो.

अजून सविस्तर बघायचं झालं तर बुलढाणा आहे डोंगरावर, उंचावर. घाट चढून यावा लागतो. हा तसा मोठा घाट नाही, पण तरी लहानपणी एस टी ने प्रवास करताना भीती वाटायची. आणि वर आलो की थंड हवा जाणवायची, आमच्यासाठी बुलढाणा आल्याची ही खरी खूण. इतर विदर्भात सगळीकडे उन्हाळ्यात कुलर लागायचे पूर्वीपासून. आमच्याकडे गच्चीत इतकी स्वच्छ आणि सुंदर हवा, कुलर आता हल्ली आलेत. आणि शिवाय खूप छान चांदण्या दिसायच्या. म्हणजे इतर गावाहून उन्हाळ्यात आलेल्या नातेवाईकांना त्याचं जास्त अप्रूप असायचं.

चिखलीकडून बुलढाण्यात आलं की लागतो तो चिखली रोड, जयस्तंभ चौकापर्यंत आणि तिथून पुढे मलकापूर रोड म्हणजे मलकापूर कडे जाणारा. एकाच रस्त्याची दोन बाजूंची नावं. चिखली रोड लाच एक फाटा फुटतो तो खामगाव रोड. एक सर्क्युलर रोड पण, जो चिखली रोड कडून पुढे सागवान आणि धाड नावाच्या गावाकडे जातो, म्हणून पुढे सागवन रोड, बस स्टँड कडून एका बाजूला जाणारा धाड रोड किंवा अजिंठा रोड. आणि या सगळ्याच्या आजूबाजूला मग बाकी सगळ्या वाड्या, गल्ल्या, नगरं, कॉलन्या. जुनं गाव, चैतन्यवाडी, बाजारलाईन, सराफ गल्ली, कारंजा चौक (जिथला कारंजा मी क्वचितच बघितला आहे), सुवर्ण नगर, बस स्टँड, स्टेट बँक चौक अशी काही ठळक परिसरांची नावं. (धाड कडे जाणारा रस्ता अगदी पूर्वीपासून खराब, तर आमची शेजारची आजी होती, आईने माझ्या वेण्या घालताना भांग नीट नसेल, तर आजी म्हणायची काय धाड सिल्लोड रस्त्यासारखा भांग पाडला आहे) 

चिखलीकडून येताना लहानसा घाट. येळगाव धरण लागतं आधी. इथे आमची वर्षासहल जायची. आणि तिथेच एक भगीरथ खत कारखाना होता, जो आता बंद पडला. पण एकमेव इंडस्ट्री होती ती आमच्या इथली ती. शहराचा पाणी पुरवठा याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून. अजूनही आहे, पण पाण्याचा दुषकाळ तसाही आहेच, आता घरोघरी बोअरवेल आल्या आहेत. या चिखली रोड वर आहे एक देवीचं मंदिर आणि त्याच्या समोर राणीचा बगिचा. बाग नाही, बगिच्याच. आणि तिथेच समोर संगम तलाव. तिथेच शेजारी डी. एड. आणि बी. एड कॉलेज. आणि जिजामाता कॉलेज. हे मंदिर म्हणजे पूर्वी गावाची वेस होती. तिथपर्यंत वाघ यायचे नेहमीच असं ऐकलं होतं. इथून पुढे काहीच नव्हतं, आता अक्खं एक नवबुलढाणा झालं आहे मंदिरापलीकडे. या बगिच्यात आत शिरल्यावर सगळी फॉरेस्ट ऑफिसर वगैरे लोकांची क्वार्टर्स आणि मग पुढे बाग. तिथे लहान मुलांसाठी खेळायला जागा, तिकडे जाऊन कच्चा चिवडा खाणे हे पिकनिक. आम्ही हे खास बघायला जायचो जेव्हा कुणीतरी बाहेरगावाहून पाहुणे यायचे तेव्हा. इथेही प्राणी होते म्हणे पूर्वी, पण ते मला आठवत नाही. संगम तलावात पोहायला शिकलेल्या काही पिढ्या होत्या, पण काही दुरदैवी मृत्यूंमुळे नंतर हे बंद झालं, आता मुळात तिथे पाणीच नसतं फार. समुद्रापासून फार दूरवर असल्यामुळे आम्हाला एस टी तून दिसणार्‍या या तलावाचं आणि त्या येळगाव धरणाच्या दुरून दिसणार्‍या पाण्याचं पण अप्रुप होतं. आणि मलकापूर रोड हून खाली दिसणारं नळगंगा धरण. आणि या पूर्ण चिखली रोड वर दोन्ही बाजूंनी कडुनिंबाची झाडं होती. हा राज्य महामार्ग, त्यामुळे ट्रक्सची वाहतूक असायची बरीच. रस्ता रुंदीकरणात ही सगळी झाडं कापली तेव्हा जीव फार खालीवर झाला होता माझा. आता हा मोठा झालेला रस्ताही लहान पडतो इतकी वाहतूक वाढली आहे.

खामगाव कडे जाताना घाट आणि जंगल. तिथे सागवानाची झाडं आहेत खूप. या जंगलाचं नाव बोथा. जे आता अभयारण्य पण आहे, तिथे वाघ, अस्वलं, हरणं, मोर असे अनेक प्राणी होते आणि अजूनही आहेत. साप, अजगर पण आहेत. पाण्याच्या प्रश्नामुळे तसं उजाड वाटतं बरेचदा. पण पावसाळ्यात हिरवं होतं. सातपुडा पर्वतरांग सगळी. खामगाव रस्ता म्हणजे पुढे नागपूरकडे जाणारा. सकाळी साडे पाचची पहिली एस टी निघायची, तिने जाताना विशेषत। पावसाळ्यात, मोर मुख्य रस्त्यावर आलेले दिसायचे. ओळखीतल्या अनेकांनी वाघ पण बघितले आहेत. आणि अस्वलं तर नेहमीच यायची पाण्याच्या शोधात बुलढाण्यात. आम्ही नवीन घर बांधत होतो तेव्हा पण बघितले आहेत. अगदी रिसेंटली दोन वर्षांपूर्वी जून मध्ये पण दिसलेलं आमच्या घरा जवळच.

मलकापूर रोड म्हणजे जरा अजून मोठा मुख्य घाट. तिकडे एक मारुतीचं मंदिर आहे, जे कोणत्यातरी तिथल्या अपघातानंतर बांधलं गेलं. तरी त्या रस्त्याने भीती वाटायची, खूप मोठा घाट नसला तरी पण अरुंद रस्ता. पाहुणे आले की जाण्यासाठी अजून एक जागा म्हणजे हे मंदिर. फक्त तिथे जाण्यासाठी गाडी लागायची, आणि लहान गाडी तर परतताना वर चढायचीच नाही. आजूबाजूला खूप सुंदर सगळं दिसायचं, खालची सगळी लहान गावं, शेती, पावसाळ्यात हिरवे डोंगर असं दृष्य छान वाटायचं, तिथेही मोर दिसायचे बरेचदा. रात्रीच्या वेळी खालचे सगळे दिवे दिसायचे.

माझे आजोबा फार पुर्वी म्हणजे १९४० वगैरे साली पण एकदा बुलढाण्यात आले होते सुट्टीत त्यांच्या कुणा भावा कडे. तेव्हा आजोबा म्हणायचे की गाद्या उडून जायच्या पूर्ण इतका सोसाट्याचा वारा असायचा उन्हाळ्यात. मग इंग्रजांना त्यावेळी हे थंड हवेचं ठिकाण म्हणून आवडलं आणि ते जिल्ह्याचं ठिकाण झालं. नाहीतर तालुकाच राहिला असता कदाचित. एरवी जरा आडरस्त्याला असल्यामुळे बरीच सरकारी कार्यालयं, काही मोठ्या बँका हे मात्र बुलढाण्यात नाहीत. इतर अकोला, अमरावती पेक्षा खरंच तापमान बरंच कमी असतं. जॉनचा बंगला म्हणून एक घर प्रसिद्ध(?) आहे बुलढाण्यात, कुणा इंग्रजाचं. जिथे आता भूतांच्या अनेक कहाण्या रचल्या गेल्या आहेत. उत्तम हवामानामुळेच इथे टी बी हॉस्पिटल पण आहे. या हॉस्पिटलच्या आतला परिसर सुंदर आहे, निदान होता. आता कित्येक वर्षात गेलेलेच नाही.

आता पाहुण्यांना घेऊन जायला एक नवीन ठिकाण झालं आहे ते म्हणजे बालाजी मंदिर आणि डायनो पार्क. एक लहानसा amusement पार्क

अजिंठा तसं बुलढाण्याहून पण एक तासावरच, पण जिल्हा वेगळा. तरी आम्हालाही जवळचं आणि आपलं वाटतं.

हा झाला भूगोल.

अजून काही गप्पा पुढच्या भागात..

क्रमशः

No comments:

Post a Comment