Sunday, March 24, 2024

आठवणीतलं Bruschetta



दिवसभर ऑफिस काम, मीटिंग करून दमल्या नंतर, बाहेर छान हवामान आहे म्हणून बाहेर पडलो. वसंत ऋतूची नुकतीच सुरुवात झाली आहे. योगायोगाने शुक्रवारी थंडी अगदीच कमी होती. त्यामुळे बाहेर असलेल्या एका आवडत्या प्ले एरिया मध्ये सृजनला खेळायला घेऊन गेलो. तासभर मनसोक्त खेळल्या नंतर, मग आता बाहेरच जेवून जाऊया असा विचार केला. कुठे जायचं? हा नेहमीचा प्रश्न पण सगळ्यांच्या समंतीनी पटकन सुटला. तिथे काही फोन करायची गरज नाही, शुक्रवार असून ही जागा मिळते हे माहिती होतं. हे आम्ही पूर्वी राहायचो ते गाव. त्यामुळे गाडी कुठे पार्क करता येईल हे माहीत होतं. गाडी पार्क करून पायी निघालो. काही ओळखीची दुकानं दिसली, काही बदल झालेले दिसले. ते सगळं बघत रेस्टॉरंट पर्यंत पोचलो.
पहिल्यांदा त्या रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो ते ऑफिस टीम सोबत, तिथे तेव्हा मेक्सिकन फूड मिळायचं. तिथे खलबत्त्यात सर्व्ह केलं गेलेलं Guacamole दिसायला आणि चवीला उत्तम होतं. त्या नंतर एकदा पुन्हा ऑफिस टीम सोबतच गेलो होतो, सृजन आठ - दहा महिन्यांचा असेल. मेन्यू पूर्ण बदललेला होता. मी पुन्हा Guacamole मिळेल या अपेक्षेने गेले होते, वेगळे सगळे पदार्थ बघून त्यातून एक ठरवला, पुन्हा एकदा चव तेवढीच उत्तम होती. पण ते सर्व्ह करणारे काका मात्र, यावेळी खडूस या शब्दाला जागणारे वाटले होते. ते मूळचे स्पॅनिश, आमची एक मैत्रीण त्यांच्याशी स्पॅनिश मधून बोलत असूनही, त्यांचा चेहरा, हावभाव आणि बोलणं सगळ्यांनाच जरा खटकलं होतं. ती मैत्रीण तर 'इथे नको आता यायला' यावर ठाम होती. त्या नंतर खरंच, मधली बरीच वर्ष मग तिथे गेलोच नाही.

त्यांनतर दीड वर्षापूर्वी कधीतरी एकदा मी आणि सुमेध असेच सहज तिथे गेलो, तेव्हा पुन्हा एकदा मेन्यू बदललेला दिसला. याही वेळी सर्व्हिस अतिशय हळू होती, ते काका अजूनही मनमोकळे बोलत नव्हते, पण अगदी लक्षच देत नाही असं ही झालं नाही. जे काही मागवलं ते सगळं आवडलं. तिथला ambience छान आहे, खूप गर्दी नसते त्यामुळे अचानक गेलो तरी जागा मिळते या जमेच्या बाजू होत्या.

त्या नंतर काल असेच तिथे गेलो, अपेक्षे प्रमाणे खूप गर्दी नव्हती, काही टेबल भरलेले होते तर काही रिकामे होते. यावेळी काका जरासे नीट बोलले, आत टेबल दाखवलं आणि दुसरी कडे गेले.

आम्ही मेन्यू कार्ड बघितल्यावर नेहमीचाच धक्का बसला, मेन्यू थोडा जुना थोडा नवीन. आपण काही ठरवून यायलाच नको अश्या ठिकाणी असं वाटलं. अगदी निवांत सगळं बघत, चर्चा करत आमचं काय घ्यायचं हे ठरलं, तरी काका काही येईनात. शेवटी बराच वेळ झाल्यावर ऑर्डर घेऊन गेले. हे एक इथे कॉमन आहे की हेच काका मालक आणि तेच सर्व्हिस पण देणारे. इथे क्वचित मॅनेजर, वेटर असे वेगवेगळे लोक असतात, बहुतांशी एक किंवा दोन जण पूर्ण सर्व्हिस बघत असतात.

तर वाट बघून अगदी कंटाळलो, आम्ही आपले बेरजा वजाबाक्या, मराठी - जर्मन शब्दांचे गेम खेळत होतो. तोपर्यंत सृजनने 'आता यांना मायनस मिलियन स्टार रिव्ह्यू देऊ' असं ठरवलं होतं. फायनली एकेक करत सगळे पदार्थ आले. Kakao म्हणजे चॉकलेटच्या फळाच्या सुकलेल्या जाड सालीत सर्व्ह केलेला ब्रेड, एका प्लेट मध्ये बटाट्याचे काप, आम्ही एक भाताचा प्रकार मागवला होता तो आणि Bruschetta नाव असलेला, पण इतरत्र मिळणाऱ्या Bruschetta पेक्षा बराच वेगळा असा प्रकार हे सगळं आलं. ते बघून आपला विडा आठवावा असं ते सगळं रचून ठेवलेलं. (नॉर्मली ब्रुशेटा मध्ये ब्रेड वर टोमॅटो, ऑलिव्ह ऑइल, इटालियन हर्ब्ज असे घटक असतात)

भूक लागली होती, तरी फक्त त्याचा फोटो काढला आणि पहिला घास खाल्ल्या क्षणी, वाह, एक नंबर आहे हे असं वाटलं. चवी चवीने त्याचा आस्वाद घेतला. भात हा पूर्ण सरप्राइज एलिमेंट होता. नारळाच्या दुधात केलेला भात, त्यात भरपूर सुका मेवा आणि भाज्या. किंचित गोड, सटल चवीचा. चांगला होता, पण हे Bruschetta मुख्य आकर्षण ठरलं. उत्तम क्वालिटी ऑलिव्ह ऑईल मध्ये परतलेले वांग्याचे काप ब्रेड वर ठेवून, त्यावर सुकवलेले टोमॅटो आणि मिरची, त्यात काही मोजके मसाले, मीठ असा बेसिक ताम झाम फक्त, पण लक्षात राहील अशी चव.

एकीकडे स्पॅनिश म्युझिक सुरू होतं, आम्हाला अगदी कोपऱ्यातील जागा मिळाली होती, छान ते म्युझिक ऐकत पोटभर खाऊन झालं. काका नंतर आले तेव्हा इथे विचारतात तसे "und hat geschmeckt?," म्हणजे आवडलं का? असं म्हणाले. मी त्यांना म्हणाले की 'हो, सगळं छान होतं पण Bruschetta विशेष आवडलं.' आता काका छान हसले, ओके म्हणाले. तेव्हाच मी त्यांना बिल पण आणा असं सांगितलं. बिल घेऊन आले, तेव्हा "Bruschetta आवडलं म्हणाला तुम्ही ना, मस्त वाटलं" असं म्हणाले आणि मग आमच्या समोर दोन शॉट ग्लासेस आणि हेझलनट लिक्युर ठेवली आणि एन्जॉय म्हणाले. पैसे देऊन ते परत गेले तेव्हा, 'हे माझ्या कडून तुमच्या साठी, घ्या नक्की', असं पुन्हा सांगून परत गेले. गंमत म्हणजे आता ते पूर्णवेळ हसत होते. सृजनला पण एक लॉलीपॉप मिळालं, त्यामुळे त्याने आता मघाच्या मायनस मिलियन स्टार वरून पुन्हा प्लस मिलियन स्टार पर्यंत जायचं ठरवलं.

मनापासून कौतुक केल्याचं पोचलं असावं किंवा आता दोन तीन वेळा गेल्या मुळे चेहरा ओळखला असावा, काय कारण असेल माहीत नाही, पण आज ही सर्व्हिस स्लो असली तरी वेगळी होती. अजूनही, त्यांनी सर्व्हिस जास्त चांगली द्यायला हवी हे खरं आहे. पण इथे एरवी सुद्धा खूप फास्ट सर्व्हिस सवयीची नाही, यांची अजून हळू त्यात, असं म्हणून स्वतःची समजून घालू शकलो. पुरेसा वेळ हाताशी असेल तर एखाद्या वेळी जायला हरकत नाही असं आपसूक मनात आलं.

माझ्या डोळ्या समोर ते तेव्हाचे खरंच खूप रुक्ष, रूड वाटलेले ते काका आणि आजचे ते हसऱ्या चेहऱ्याचे, कौतुक ऐकून अजूनच खुश झालेले, आम्हाला complementry काहीतरी आणून देणारे काका हे दोन्ही आठवत होते. त्यांच्या मेन्यू कार्ड प्रमाणेच, हाही बदल छान होता. निदान ती सुरुवातीची आमच्या मनातली प्रतिमा त्या निमित्ताने बदलली होती.

पुन्हा पायी परत येताना छान सुंदर हवा होती. अश्याच अजून काही रेस्टॉरंट मधल्या लोकांशी जोडले जाण्याचे, अगत्याचे प्रसंग आठवले. त्या जुन्या ओळखीच्या रस्त्यांवर फिरताना, तिथल्या सगळ्या आठवणी डोक्यात रेंगाळत होत्या. त्यात हे रेस्टॉरंट, ते काका, तिथले पदार्थ आणि त्यातले चांगले बदल यांचीही नोंद झाली होती.

मधुरा देशपांडे - शेंबेकर
२४-३-२४

#जर्मनीतीलवास्तव्य


No comments:

Post a Comment