अगदी दोन आठवड्यां पूर्वी सृजन सोबत "हात मोडला" हे पुस्तक वाचलं. यशचा हात मोडला आणि मग प्लास्टर लागलं वगैरे अशी गोष्ट. तेव्हाच सृजनला मी माझ्या खऱ्या खुऱ्या घडलेल्या हात मोडण्याची गोष्ट पुन्हा एकदा सांगितली. पूर्वीच्या बायकांकडे बाळंतपणाच्या किस्से असतील, तसे माझ्याकडे हाडं मोडण्याचे आहेत. त्या कश्या हिच्या वेळी असे डोहाळे होते आणि याच्या वेळी अश्या कळा होत्या हे रंगवून सांगत असतील, तशी मी शाळेपासून ते दादर स्टेशन पर्यंत घडलेले किस्से सांगू शकते. अशी सरळ चालता चालता मी पडून ligament tear ओढवून घेऊ शकते. तर असो, पण या सगळ्यात अजून काही दिवसांनी "मोडता मोडता वाचलेलं बोट" अशी गोष्ट सृजन बाबत घडणार आहे हे काही ध्यानी मनी नव्हतं. पण मग आता, त्या पुस्तका प्रमाणे आईने आपली गोष्ट लिहावी असं सृजनला वाटलं. त्यामुळे तू माझ्या गोष्टीबद्दल पुस्तक लिही असं त्याचं म्हणणं होतं. (हे "तुम्ही इतक्या वेळा रिक्वेस्ट केलेली रेसिपी" सारखं खोटं वाटू शकेल पण नाही, खरंच आहे) मग पुस्तक नाही, पण मी ही गोष्ट ब्लॉग वर लिहिते असं त्याला कबूल केलं. त्याचीच ही गोष्ट -
तर जर्मनी नावाच्या देशात, होकेनहाईम नावाचं एक गाव आहे. तिथे सात वर्षांचा सृजन त्याच्या आई बाबांसोबत राहतो. त्याच्या घराच्या मागेच M नावाची त्याच्याच वर्गातली एक मुलगी राहते. ती, तिची बहीण A आणि तिच्या शेजारची J and J नावाची दोन जुळी मुलं हे सगळे मिळून फुटबॉल, लपाछपी काय काय खेळत असतात. त्यांच्याच सोबत बरेच वेळा सृजन पण जातो. थंडी कमी झाली की, हे सगळे जण एकमेकांकडे जाऊन, सगळ्यांना जमवून घराच्या जवळपास खेळतात, कधी नुसतेच भटकतात. तसेच ते मागच्या रविवारी भेटले, थोडा वेळ खेळले आणि मग आपापल्या घरी परत गेले.
आता या जुळ्या मुलांना पुन्हा घरी कंटाळा आला, ते पुन्हा सृजनला बोलवायला आले आणि सोबत खेळायला घेऊन गेले. समोरच मोठ्या मुलांची शाळा आहे, त्याच्या आवारात हे सगळे खेळत होते. तिथे एका मोठ्या मुलांच्या ग्रुपने, यांना एक बॉल खेळायला दिला. त्या बॉल सोबत सृजन आणि त्याचे मित्र खेळत होते, तेव्हा नेमका तो बॉल एकदा सृजनच्या बोटाला लागला. तो किंचित रडला आणि पुन्हा खेळायला लागला. आई बाबा अधून मधून जाऊन बघत होते, तेव्हा त्याबद्दल काही बोलला नाही. शेवटी आठ वाजले तेव्हा सृजन चे आईबाबा जाऊन सगळ्यांना घरी घेऊन / पिटाळून आले. आता जरा बोटाची तक्रार वाढली, पण दुसऱ्या दिवशी वाटेल बरं असं आई बाबा आणि सृजन सगळ्यांनाच वाटलं.
मग सकाळ झाली, आणि सृजनने माझं बोट दुखतंय, शाळेत नाही जाता येणार असा पांघरुणात असतानाच सुर लावला. आई बघायला गेली, तर बोट खरोखर सुजलेले दिसत होतं. खूप मोठं नसावं, पण अगदीच घरी बरं होईल असं पण नाही, हे लक्षात आलं. मग शाळेत लगेच कळवून डॉकटर कडे फोन करायला सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे तिथे लाईन बिझी होती. शेवटी एकदाचा फोन उचलून दुपारची वेळ मिळाली. लगेच आईने अर्धा दिवस सुट्टी टाकली. हाताला मलम लावून दे, भरवून दे असे सृजनचे लाड सुरू झाले.
दुपारी आई आणि सृजन दवाखान्यात गेले. तासभर वाट पाहिल्यावर शेवटी डॉक्टर भेटली, मग एक्स रे झाला. मग अजून अर्धा तास वाट बघून आत गेलो. तिथे कॉम्प्युटर वर आपल्या बोटाचा एक्स रे बघून सृजन ने आ वासला होता. काय ममा, हे माझं बोट इतकं लांब कसं दिसतं यात? असा प्रश्न त्याला पडला. "हाड तुटलेलं नाही पण थोडक्यात निभावलं आहे" असं सांगून बोटाला पट्टी बांधून मिळाली. तीन आठवडे फुटबॉल, बास्केटबॉल बंद अशी ताकीद मिळाली. तरी शाळेत जाऊन निदान बसू शकतोस, असं मात्र डॉकटरने आवर्जून सांगितलं. मग आईने वर्गशिक्षिका बाईना ईमेल करून सगळं सांगितलं.
दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर सगळ्या मित्र मैत्रिणींनी काय झालं, कसं लागलं याची चौकशी केली. बाईनी पण त्याचे मित्र त्याला काही लागलं तर मदत करतील, करत आहेत असं उत्तरात लिहिलं.
आता सृजनला चमचा हातात धरता येत नव्हता, त्यामुळे आई किंवा बाबाने जेवण भरवलं. दात घासायला जमत नव्हते त्यासाठी आई मदतीला आली. हाताला प्लास्टिक पिशवी बांधून सृजन ने आंघोळ केली, त्या सगळ्या प्रकाराची त्याला फारच गंमत वाटली. लिहायला नीट जमत नव्हतं, त्यामुळे शाळेचा गृहपाठ आणि लिखाण नंतर करण्यासाठी परवानगी मिळाली. एक दिवसाचा तर अभ्यास नाही केलास तरी चालेल असं त्या म्हणाल्या, हे त्यांचं म्हणणं सृजनने फार मनावर घेतलं. पण त्याच्या आईने मात्र तोही अभ्यास आपण रविवारी पूर्ण करूच असं पक्कं ठरवलं.
दोनच दिवसात हळूहळू त्याला लिहायला सुद्धा पुन्हा जमायला लागलं. मित्रांसोबत प्ले डेट ठरलेल्या तश्याच ठेवल्या गेल्या. एकूणच अंगी बाणेदारपणा असल्यामुळे, सृजनने जमेल तेवढ्या गोष्टी एकट्याने करायला सुरुवात केली . अक्षर जरा बिघडलं असलं तरी तो अभ्यास पण करायला लागला. सूज पण कमी झाली.
दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांनी बांधलेली पट्टी आपोआप निघाली. मग डॉक्टरच्या सूचनेनुसार आईने दुसरी पट्टी बांधून दिली. आता तीन आठवडे ती ठेवायची असं डॉकटर म्हणाली होती आणि डॉक्टर सांगतात ते ऐकायचं असतं, असं सृजननेच आईला समजावलं. आणि तरी "आज मी हात खिशात घातले आणि थोडा फुटबॉल खेळलो, बोटाला नाही काही होणार जॅकेट मध्ये हात होते तर" अश्या पळवाटा स्वतःच काढल्या. आणि बोटाची पट्टी मिरवत तो पुन्हा नेहमी सारखा दंगा मस्ती बडबड करत खेळायला लागला.
संपली गोष्ट :)
चार - आठ दिवसात सगळं नीट होईल असं वाटतं आहे. पण तोवर बोट दुखावल्यामुळे वाट्याला आलेलं जास्तीचं प्रेम, लाड सृजनने मनापासून एन्जॉय केले आहेत. त्यातूनच जन्माला आलेली ही "न मोडलेल्या बोटाची गोष्ट" खास त्याच्याच आग्रहास्तव :)
No comments:
Post a Comment