Sunday, April 28, 2024

निवांत


एका लहान, म्हणजे अगदी ८-९ हजार लोकवस्तीच्या गावातली ही मध्यवर्ती जागा. गावातल्या मुख्य सरकारी ऑफिसच्या शेजारची. छान उंच ही दोन झाडं आणि त्यांचा पार. मागे जे कपाट दिसतं आहे त्यात पुस्तकं आहेत, ते आहे खुलं वाचनालय, म्हणजे तिथून तुम्हाला पुस्तक आवडलं तर घेऊन जा आणि पुन्हा परत आणून ठेवाल हे अध्याहृत. तिथेच शेजारी एक बाक, तिथेही पुस्तक वाचत बसता येईल, त्या शेजारी कचरा पेटी. फोटोत दिसत नाही पण त्या पलीकडे सायकल स्टँड. त्या बाकावर बसून समोर पाहिलं तर सध्या गुलाबी रंगांचे तुरे असणारी भरपूर झाडं, त्या पलीकडे कोपऱ्यात आलेली रानफुलं, तिथेच समोर एक कॅफे आणि आइस्क्रीमचे दुकान. थोडीशी वर्दळ असूनही तशी शांतता. पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, वारा आणि मधूनच काही गाड्यांचे असे सगळे आवाज तिथे असतात. चर्च मधून ठराविक वेळा टोले ऐकू येतात. रविवारी सुट्टीचा आनंद घेत सायकलने फिरणारी लहान मोठी मंडळी इथे थोडा वेळ येतात. कुणी पायी येतात. आइस्क्रीम खाऊन किंवा कॉफी घेऊन पुन्हा घरी परततात. वेळ असेल तर पुस्तक वाचत बसू शकतात, किंवा नुसत्याच गप्पा मारत बसू शकतात. 

कोणत्याही मोठ्या पर्यटन स्थळांच्या यादीत नसलेल्या अश्या जागा आजूबाजूला दिसत राहतात. "निवांत" हा शब्द जीवंत करणाऱ्या ❤️

मधुरा देशपांडे - शेंबेकर 
२७-०४-२४

No comments:

Post a Comment