Monday, July 22, 2024

तू, तुम्ही वगैरे..

जर्मन भाषेत 'तू' आणि 'तुम्ही' (आदरार्थी एकवचन) वेगळी सर्वनामं आहेत. इंग्रजी You सारखं सरसकट एकच सगळ्यांसाठी वापरलं जात नाही. मराठीत आहे तसंच जर्मन भाषेत पण सर्वनामा प्रमाणे क्रियापद चालवलं जातं, म्हणजे तू आलीस/आलास आणि तुम्ही आलात असं. त्यात एकवचन, अनेकवचन याप्रमाणे पण बदल होतात. तसंच तुझे आणि तुमचे, तुला आणि तुम्हाला असे सगळे शब्द कुणाला संबोधून बोलतो आहोत त्याप्रमाणे बदलतात. जर्मन भाषा शिकताना अगदी सुरुवातीलाच जर्मन संस्कृतीत या आदरार्थी ' तुम्ही ' शब्दाला फार महत्त्व दिलं जातं हे सांगितलं जातं. त्यामुळे अनोळखी लोकांशी बोलताना, तुम्ही म्हणजेच Sie वापरायला हवं हे डोक्यात पक्कं बसतं. तसंही क्रियापदाच ते रूप वापरणं सोपं असतं, हे पथ्यावर पडतं हेही एक. पण कारण काहीही असो, मी नेहमीच कुणाशीही बोलताना तुम्ही, तुमचे असंच बोलायचे, Sie म्हणूनच उल्लेख करायचे. यावरून एकदा एक गंमत पण झाली होती, इथे येऊन महिनाभर झाला असेल, भाषा शिकत होते अजून, रस्त्यावर अचानक कुणीतरी दोन शाळकरी, ७-८ वर्षांची मुलं आम्हाला काहीतरी विचारत होती, तर मी त्यांना पण ' तुम्ही ' म्हणून संबोधत होते. ते माझ्या कडे असे जरा वेगळे का बघत आहेत, यात मला भाषा मोडकी तोडकीच येणे या पेक्षा, हेमाझं इतक्या लहान मुलांना असं तुम्ही म्हणणं हे कारण असेल, असं मला नंतर वाटलं होतं. 

तर असो, नोकरी मिळाली तेव्हाही सुरुवात Sie ने झाली तरी लवकरच बरेच जण Sie वरून du म्हणजेच तू वर आले. सुरुवातीला तसं काही लोक स्वतःहून सांगायचे, त्यासाठी एक क्रियापद आहे duzen म्हणून..म्हणजे एकेरी संबोधन असं. यात कुणाचं वय, पोस्ट याचा संबंध काही प्रमाणात होता, पण अगदी कमी. बहुतांशी टीम मधल्या लोकांसोबत, कोणत्याही वयोगटाचे असतील तरी एकेरीनेच बोलणं व्हायचं. काही बॉस, वेगळ्या डिपार्टमेंट मधले अनोळखी लोक यांच्याशी Sie म्हणून बोललं जायचं. काही वेळा कस्टमर सोबत पण बरेच दिवस काम करून mutually एकेरी संबोधणे हे व्हायचं. बाहेर कुठेही गेलो तरी Sie म्हणूनच आम्ही लोकांशी बोलायचो आणि इतरही लोक आमच्याशी तसेच बोलायचे. रेस्टॉरंट, दुकानदार, सरकारी कार्यालयं सगळी कडे तुम्ही म्हणूनच बोलणं व्हायचं. 

'सर /मॅडम' असं इथे ऑफिस मध्ये वापरात नाही. शाळेत बाईना Frau (बाई /स्त्री) अमुक तमुक म्हटलं जातं, आणि सरांना Herr (श्री/ मिस्टर) अमुक तमुक असं. हेच साधारण कुठल्याही औपचारिक संभाषणात पाळलं जातं.पण बास्केटबॉल किंवा कराटे शिकवणाऱ्या शिक्षकांना मुलं नावानेच हाक मारतात. सृजनचे मित्र मला मधुरा म्हणूनच हाक मारतात हेही सुरुवातीला वेगळं वाटायचं. त्याच्या शिक्षिका मात्र फ्राऊ शेंबेकर असंच म्हणतात. एका माझ्याच वयाच्या शेजरणीने मला अहो जाहो केलं, तीही बाहेरून इथे आलेली, मग मीच तिला आपण एकेरीत बोलू असं म्हणाले. आता ओळख झाल्यावर सहसा एकेरीत बोलणं जमायला लागलं आहे. पण हेच शेजारच्या आजी सोबत नेहमीच आदरार्थी बोलणं होतं, तिचं वय बघता तेच योग्य वाटतं. 

पण मागच्या तीन चार वर्षात या सगळ्यात बराच बदल जाणवायला लागला. ऑनलाईन शॉपिंग करताना येणारे इमेल्स एकेरीवर आले. मोठमोठ्या दुकानांनी तोच कित्ता गिरवला. आम्हाला जे शिकवलं गेलं होतं, जे आम्ही वापरत होतो ते असं बदलताना वेगळं वाटलं. मागच्या वर्षी तर जॉब सर्च करत असताना सुद्धा, काही ठिकाणी ईमेल मध्येच एकेरी संबोधण्यात आलं, मुलाखतीत पण तसं सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं. हे सगळं इंग्रजी मध्ये सरसकट you म्हणून काही वाटत नाही, तरी अनोळखी लोकांशी जर्मन मध्ये असं बोलणं हे पचायला वेळ लागला. हल्ली कुठेही बाहेर गेलो तर समोरच्याने एकेरीत बोलणं वाढलं आहे असं दिसतं. परवा एका रेस्टॉरंट मध्ये ऑर्डर घेताना तिथला मुलगा, आमच्याशी एकेरीत बोलत होता तेव्हा हे पुन्हा एकदा जाणवलं. क्षणभर आपलं वय इतकं कमी वाटतं की काय असा विचार करून मी सुखावलेच, पण सृजन सोबत होता आणि पांढरे केस पण आठवले, त्यामुळे याचा वयाशी संबंध नसून हे आता कॉमन होत आहे हे लक्षात आलं. 

एरवी इंग्रजीत काम असेल तिथे कुणी मॅडम म्हणून सुरुवात केली तर मीच मॅडम म्हणू नका असं सांगते. त्यामुळे कुणी सुरुवातीलाच आम्हाला अरे कारे केल्याने मला काही अपमान वागैरे वाटत नाही, पण ते ऐकायला वेगळं वाटतं. आता अर्थात मी पूर्वी सारखं लहान मुलांना तुम्ही म्हणून फसगत करून घेत नाही. पण कुठलेही अनोळखी लोक, वयाने मोठे लोक, कस्टमर यापैकी कुणाशीही बोलताना चुकून ही एकेरीत बोलू शकत नाही. भाषेत व्याकरणाच्या चुका होऊन कधीतरी होत असेल, पण तेवढंच. 

इंजिनियरिंग नंतर कॉर्पोरेट नोकरी सुरू झाली, तेव्हा मोठ्यांना नावाने बोलणं हेही रुळायला वेळ लागला होता, मग सवयीचं झालं. बारा वर्षात जर्मनीतले असे अनेक बदल दिसले आणि अजून बरेच दिसतील, तेही अंगवळणी पडतील. पण एखाद्या वेळी 'आमच्या काळात ' टाईप गळे काढावे वाटले, तर आम्हीही त्यात ही उदाहरणे देऊ शकू. पांढरे केस मिरवत 'पूर्वीचं जर्मनी राहिलं नाही मुळीच' असं म्हणत त्यावर हसून घेऊ.

मधुरा देशपांडे - शेंबेकर 





No comments:

Post a Comment