इंजिनियर्स डे
१५ सप्टेंबर २००३ - हॉस्टेल वरचा पहिला दिवस, इंजिनियरिंग ऍडमिशन झाली आणि योगायोग असा की या दिवशी मी हॉस्टेल कॅम्पस मध्ये पाऊल ठेवलं. घरापासून दूर अशी पहिली रात्र आणि दुसऱ्या दिवशी पासून कॉलेज.
इंजिनियरिंग म्हणजे नेमकं काय हे तेव्हा माहीत नव्हतं. पण सायन्स आवडतं, चांगले मार्क्स मिळत होते, वैद्यकीय शिक्षणात आपल्याला काहीही आवड नाही हे आठवीत असताना अगदी पक्कं समजलं होतं, त्यामुळे मग चांगली नोकरी, भविष्य या दृष्टीने इंजिनियरिंग हाच पर्याय तेव्हा माहीत होता आणि त्याच दिशेने मग पूर्ण प्रयत्न करून कॉलेज सुरू झालं. Instrumentation and Control म्हणजेच उपकरणीकरण आणि नियंत्रण अश्या शाखेत. चार वर्ष, सुरुवातीचा होमसिकनेस, धडपड असं होत हळूहळू या शिक्षणाला, पुण्याला सरावत गेले आणि डिग्री घेऊन बाहेर पडले.
योगायोगाने नोकरी पण त्याच शाखेशी निगडीत असलेली मिळाली. तरीही आपण शिकलो त्यातून काय काय इथे आता कामाला येईल, कसं असेल कामाचं स्वरूप असे प्रश्न सुरुवातीला होते. तिथेही हळूहळू सरावत गेले, काही वेळा आपल्या शिक्षणाचा काहीही संबंध येत नाही असं वाटायचं, पण बरेचदा जुने संदर्भ आठवायचे, काही वेळा ते नीट आठवायचे, काही वेळा 'अरे तेव्हा काहीतरी होतं असं' एवढं vague, जरा अभ्यास तेव्हा करायला हवा होता असं व्हायचं. वर्षागणिक हा अभ्यास आठवणे हे पूर्ण मागे गेलं, रोजचं काम सवयीचं झालं. जर्मनीत येऊन पण काम पुन्हा आधीच्याच कामा सारखं होतं. फक्त सगळं जर्मन भाषेत.
इथे येऊन शॉप फ्लोअर वर पण काही कामं केली तेव्हा आधीची theory इथे practically जास्त समजली. पण कामाच्या स्वरूपात जे बदल झाले त्यामुळे पुन्हा काही वेळा इंजिनियरिंग मधले दिवस आठवले, अरे ते हे इथे असं वापरायचं असतं असेही अनुभव मिळाले. प्रत्यक्षात एका प्लांट वर जाऊन, तिथली कंट्रोल रूम, तिथून चालणारं काम पहिल्यांदा पाहिलं, तिथे स्वतः काम केलं. अवाढव्य अश्या त्या केमिकल फॅक्टरी मध्ये काम करताना, आपण कॉलेज मध्ये असताना इंडस्ट्रिअल व्हिजीट म्हणून जे काही गेलो, ते तेव्हा गंभीरतेने ते घेतलं नाही असं वाटलं, त्या आमच्या ट्रिप जास्त होत्या 😂
विविध सेन्सर्स, P & ID, signals, control systems, different types of drawings, norms, data sheets studies, पहिल्या वर्षी ग्राफिक्स मध्ये शिकलेले टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू drawings, measuring standards असे बरेच instrumentation आणि engineering बेसिक सुद्धा गेल्या काही वर्षात नेहमी वापरले जातात. मधल्या काळात नोकरी बदलली तेव्हा काही गोष्टींपासून पूर्ण दूर गेले, तर काही बाबतीत अजून जास्त सविस्तर संबंध आला. योगायोगाने सुमेध पण पूर्ण याच क्षेत्रात असल्या मुळे गेली अनेक वर्ष घरी पण कामाच्या काही चर्चा झाल्या तर त्यात पुन्हा हेच सगळं येतं. 😜
इंजिनिअर असून पूर्ण वेगळ्याच क्षेत्रात काम करणाऱ्यां बद्दल बऱ्याच पोस्ट या दिवशी दिसतात, त्यावरून विनोद केले जातात. प्रत्येकाचा आपापला प्रवास असतो, प्रत्येकाची आवड नावड, त्या त्या वेळी मिळालेली संधी, पैसे, प्रायोरिटी अश्या विविध कारणांनी तर कधी नाईलाज म्हणूनही अनेक जण पुढे विविध क्षेत्रात जातात, त्याचं सोनं करतात, त्यात काही चुकीचे नाही. पण काही प्रमाणात ठरवून, तर काही योगायोग यामुळे आजही डिग्री घेऊन १५ वर्ष झाली तरी, आमच्या शाखेशी निगडीत असलेल्या क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत, त्यात आम्ही आहोत याचा अभिमान आहे. त्यातून जर्मनी सारख्या engineering पंढरी मध्ये कामाची संधी मिळाली आहे. कामाच्या काही happy phases असतात तर काही sad phases, हे बहुतांशी सगळी कडेच होत असेल. काही काम आव्हानात्मक असतं, काही समाधान देतं, काही वेळा सगळं रटाळ वाटतं आणि कंटाळा येतो, पण हे सोडून वेगळ्या क्षेत्रात गेलो नाही याची खंत वाटत नाही. उलट यातच अजून जास्त करायला किती काय आहे, आपण अगदीच लहान भाग बघतो आहोत, यात अजून सविस्तर शिकायचं आहे, त्यातल्याच वेगवेगळ्या प्रांतात काम करून बघायचं आहे असं वाटतं. इंजिनिअरिंग शिक्षण सुरुवात करताना जी अवस्था होती, त्यावरून आता हे थोडं समजलं आहे, पण तरी अजून खूप समजून घ्यायचं आहे असं वाटतं. त्यामुळे happy engineers Day !!
मधुरा देशपांडे - शेंबेकर
१५-०९-२०२४
No comments:
Post a Comment