Friday, May 30, 2025

जर्मनीतलं वास्तव्य - कचरा विल्हेवाट आणि वर्गीकरण

जर्मनीत आल्यानंतर कचरा वर्गीकरण हा किती मोठा विषय आहे हे समजत गेलं. सुरुवातीलाच जर्मन भाषा शिकताना पण हा विषय पुस्तकात येतो आणि प्रत्यक्ष अनुभवातून अधिकाधिक माहिती मिळत जाते. त्यातून आपण या वर्गीकरणाबाबत जागरूक होत जातो आणि सरावाने वर्गीकरण हा इथल्या दैनंदिन आयुष्यातला अविभाज्य भाग होतो. त्याबद्दल आजची ही पोस्ट - या सगळ्या पद्धती प्रत्येक राज्यात / शहरात थोड्या वेगळ्या आहेत, पण बहुतांशी सगळं जर्मनीभर कॉमन आहे. आम्ही राहतो तिथल्या अनुभवांवर आधारित हा लेख आहे. 

रोजचा स्वयंपाकघरातला कचरा, बाथरूम मधला कचरा, खोके कागद हा कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या, झाडांची पानं/फांद्या हा कचरा असा किती प्रकारचा कचरा रोज तयार होतो. शिवाय काही महिने/वर्ष गेले की वापरलेले जुने कपडे, बूट ते जुन्या किंवा तुटलेल्या घरातल्या मोठ्या वस्तू, बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू या सगळ्यांची विल्हेवाट कशी लावायची हे सगळे प्रश्न पडायला लागतात. आणि विविध मार्गांनी उत्तरं मिळत जातात. 

रोजचा कचरा - ओला आणि कोरडा यापेक्षा यात सविस्तर वर्गीकरण केलं जातं. अपार्टमेंट / घर भाड्याने घेताना घरमालकाकडून ही माहिती दिली जाते. बहुतांशी ठिकाणी बिल्डिंगच्या बाहेर कचऱ्याची जागा असते. तिथे जैविक कचरा, कागद/प्लास्टिक कचरा आणि इतर म्हणजे ओला कचरा यासाठी वेगवेगळ्या रंगाचे कंटेनर असतात. त्या भागातल्या कचरा वाहून नेणाऱ्या ऑफिसचे आठवड्यातून एक किंवा १५ दिवसातून एक असे प्रत्येक कचऱ्यासाठीचे वेगळे दिवस असतात, त्या दिवशी हे कंटेनर त्या ट्रक मध्ये रिकामे करून कचरा नेला जातो. तसं कॅलेंडर प्रत्येक रहिवाश्याना वर्षाच्या सुरुवातीला मिळतं किंवा ऑनलाईन असतं. त्या दिवशी ठरलेले कचऱ्याचे कंटेनर बाहेर काढून ठेवणे हे काम सोसायटीचे काय नियम आहेत त्याप्रमाणे ठरतं, बहुतांशी ठिकाणी सोसायटीने नेमलेले लोक असतात, काही वेळा आळीपाळीने लोक स्वतःच ही जबाबदारी उचलतात. तुमचं स्वतःचं घर असेल तर हे काम स्वतःच करावं लागतं. 

काही ठिकाणी कागद / प्लास्टिक वेगळे करावे लागतात, काही ठिकाणी दोन्ही एकत्र, त्यासोबत मेटलच्या लहान वस्तू (बरण्यांची झाकणं, खराब झालेला तवा इत्यादी) थोडक्यात रिसायकल होऊ शकतील अश्या वस्तू,अन्नपदार्थ आणतो त्या पिशव्या, शॅम्पू बॉटल ते अजून प्लास्टिकचं सगळंच. ऍल्युमिनियम पण यातच येतं. खरेदीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्याचा वापर इथे कमी/नगण्य आहे, दुकानातून उठसुठ प्लास्टिक पिशव्या घेता येत नाहीत. स्वतःची कापडी पिशवी किंवा टिकाऊ प्लास्टिक पिशव्या ज्या अनेक वर्ष वापरता येतात अश्या घेऊनच खरेदीला जायचं. नाहीतर तिथे दुकानांतून कागदी/कापडी पिशव्या 'विकत' घ्यायच्या हे सवयीचं झालेलं आहे. कचरा फेकण्यासाठी, कचरापेटीला लावायला म्हणून दुकानांमध्ये विविध आकारातल्या वेगळ्या पिशव्या मिळतात, त्या घेतल्या जातात. 

जैविक कचरा म्हणजे मुख्य अन्नपदार्थ, भाज्यांची सालं, लॉन मधलं कापलेलं गवत ते झाडांची सुकलेली पानं यासाठी एक कंटेनर असतो. यासाठी प्लास्टिक पिशव्या वापरायला परवानगी नसते. याशिवाय Restmüll कंटेनर असतात. Rest म्हणजे उर्वरित आणि müll म्हणजे कचरा असा त्याचा अर्थ. यात मग स्वयंपाकघरातला कचरा, डायपर/सॅनिटरी नॅपकिन ते अजून घरात निघणारा जनरल कचरा जो आकाराने लहान आहे असं सगळं यात येतं. 

याशिवाय एक असतं ग्लास कंटेनर. घरात असणाऱ्या जॅम पासून ते बीअर पर्यंतच्या बाटल्या किंवा काचेची फुटकी भांडी, वाट्या हे सगळं फेकण्यासाठी बिल्डिंग मध्ये एक कंटेनर असतो. तो नसेल तरी बऱ्याच सार्वजनिक ठिकाणी कंटेनर ठेवलेले असतात, तिथे तर काचेच्या रंगाप्रमाणे वेगवेगळे कंटेनर असतात आणि त्यात जाऊन काचेच्या वस्तू फेकता येतात. (काचेचा आवाज होतो त्यामुळे हे फेकण्यासाठी ठराविक वेळा असतात, शांतताप्रिय जर्मन लोकांना यावेळी हे आवाज चालत नाहीत) 

प्लास्टिक बाटल्यांचा कचरा मात्र इथे  खूप असतो. कारण जरी पाणी पिण्यायोग्य असलं तरी स्थानिकांचा कल bottled water, त्यातही गॅस वाल्या पाण्याकडे आहे. बरेच लोक काचेच्या बाटल्या वापरतात, पण प्लास्टिकही खूप असतात. तर या सगळ्या बाटल्यांवर एक चिन्ह असतं, त्याचा अर्थ या कचऱ्यात फेकायच्या नाही, सुपरमार्केट मध्ये परत द्यायच्या. या बाटलीची मूळ किंमत जर १ युरो असेल तर आपल्याला विकत घेताना १ युरो २५ सेंट द्यावे लागतात आणि बाटली त्या मशीन मध्ये परत दिली की ते २५ सेंट परत मिळतात. यातून रिसायकलिंग साठी वर्गीकरण आधीच होऊन पुढचे काम सोपे होते. 

जुने कपडे, शूज, चादरी, पांघरुणं जे चांगले आहेत पण आता जुने झालेत, तुम्हाला नको आहेत तर ते टाकण्यासाठी काही दुकानांच्या जवळ, काही चौकात खास कंटेनर ठेवलेले असतात. पिशवीत बांधून ते तिथे टाकायचे, दर काही दिवसांनी सामाजिक सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या संस्था/सरकारी कार्यालयं यांच्यातर्फे ते सगळं पुढे नेऊन ते गरीब लोकांसाठी वापरले जातात. अगदीच फाटके कपडे असतील तर ते मात्र इथे देणं अपेक्षित नाही, ते आधी सांगितलेल्या उर्वरित कचऱ्यात टाकायचे असतात. 

बऱ्याच दुकानात जुने लॅम्प, संपलेल्या बॅटरी/सेल फेकण्यासाठी जागा असते. काही दुकानात गाडीचं ऑइल, घरातलं किंवा रेस्टॉरंट मधलं तळणीचं उरलेलं तेल फेकण्यासाठी सोय असते. औषधांची एक्स्पायरी डेट निघून गेली असेल तर औषधांच्या दुकानात नेऊन देता येतात, नाहीतर ते वर उल्लेख केलेल्या रेस्ट कचऱ्यात फेकता येतात. ख्रिसमस ट्री घेऊन जाण्यासाठी वेगळी चर्चची गाडी येते. 

घरातलं जुनं फर्निचर, लाकडी किंवा मेटलचं असेल किंवा सोफे, गाद्या अश्या आकाराने मोठ्या वस्तू जर द्यायच्या असतील तर त्यासाठी ठराविक दिवस असतात. पण ते घरासमोरून घेऊन जाणं अपेक्षित असेल तर आधी नोंदणी करावी लागते. वर्षातून दोन वेळा हा कचरा फुकट नेला जातो, आदल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी सगळं नेऊन ठेवायचं मग ते नेलं जातं. त्यातही इलेक्ट्रिक वस्तू आणि इतर वेगळ्या ठेवणे अपेक्षित असतं. काही वेळा त्या आधीच काही चांगलं फर्निचर असेल तर ते गरजू लोक किंवा सेकंड हॅन्ड वस्तूंचे दुकानदार उचलून घेऊन जातात. 

आता हे सगळं जातं कुठे - आधी तर जवळच्या भागातल्या कचरा डेपो मध्ये. तिथे वर्गीकरण अजून सखोल होऊन मग रिसायकल साठी कचरा त्या कारखान्यात जातो. कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाते तिथे पाठवला जातो. सेकंड हॅन्ड दुकानदार, विविध संस्था हे सगळे या ऑफिस सोबत संलग्न असू शकतात, आणि तेही या सगळ्यात हातभार लावतात.  या कचरा डेपोच्या ठराविक वेळात आपण स्वतः तिथे जाऊन कचरा फेकता येतो. तिथे प्रचंड मोठे कंटेनर असतात. वरच्या सगळ्या प्रकारातला कचरा तिथे देता येतो, रोजचा कचरा द्यायला कुणी तिथे जात नाही, पण फर्निचर, इलेक्ट्रिक सामान, बॅटरी, खूप मोठे खोके जे घरच्या कंटेनर मध्ये बसत नाहीत, या सगळ्यासाठी तिथे जाणे हाही पर्याय असतो. काही प्रकारच्या कचऱ्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतात, जसं गाड्यांचे जुने टायर - टायर ठराविक वर्षांनी बदलायचे असतात, गाड्यांचे जे वार्षिक चेकिंग होतं त्यात जर टायर योग्य वाटले नाही तर ते बदलण्याला पर्याय नसतो. याशिवाय दवाखाने, शाळा, ऑफिसेस यांच्यासाठी काही गोष्टी बदलतात, पण तो या लेखाचा विषय नाही. 

क्वचित हेही ऐकलं आहे की चुकीच्या वस्तू कचऱ्यात फेकल्या तर घरी दंड भरण्याबद्दल पत्र येतं. उदाहरण म्हणून जर प्लास्टिक, कागद याच पिशवीत बॅटरी टाकल्या, हे योग्य नाही कारण बॅटरी म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू. त्याच पिशवीत घरी आलेली काही पत्रं तुम्ही टाकली असतील तर त्यावरून ते ट्रेस करू शकतात. (पत्र म्हणजे विविध कार्यालयातून जसं बँक, इन्कम टॅक्स इत्यादी ठिकाणाहून येणारी, हे सगळे व्यवहार इथे पत्राने होतात)

हे सगळं साध्य कसं होतं - तर शाळेतल्या मुलांना पण लहानपणापासून वर्गीकरणाबद्दल शिकवलं जातं. जे शिकवलं जातं, तेच चित्र आजूबाजूला दिसत असल्यामुळे त्यांना आपसूक सवय होते. शाळांमधून या विषयावर प्रोजेक्ट केले जातात. प्रत्येक कंटेनर वर त्यात कोणता कचरा चालेल, कोणता चालणार नाही याची चित्र असतात. कचरा डेपो वाल्यांच्या वेबसाईट वर सगळी माहिती असते.  प्रत्येक घरमालकाला जवळच्या कचरा विल्हेवाट कार्यालयात नोंदणी करून कचऱ्याचे कंटेनर घ्यावे लागतात आणि वार्षिक फी भरावी लागते. हे सगळं avoid करण्यासाठी काही जुगाड करता येत नाहीत. बिल्डिंग असेल तर हे काम सोसायटी कडून केलं जातं, प्रत्येकाला फक्त सोसायटीकडून वार्षिक फी आकारली जाते. 

अर्थात म्हणून सगळे लोक सगळं ऐकतात असं नाही. हे सगळं असूनही काही जण कचरा फेकतात, विशेषतः काही तरुण मुलं स्वतःच्या धुंदीत असतात. अजूनही कित्येकांना या सगळ्या मागचं गांभीर्य समजत नाही. काही जण शेतात निर्जन जागी कचरा फेकतात, त्याबद्दलच्या पोस्ट अधून मधून दिसत राहतात. पण हे प्रमाण एकुणात कमी आहे.  लोक थोडे जागरूक असले तरी प्लास्टिक अजून कमी करण्याबद्दल बरंच काही करता येईल असं वाटतं. कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या ८-१५ दिवसातून एकदा येतात. इतर कचऱ्याबाबत प्रश्न येत नाही पण जैविक कचरा इतक्या दिवसात खराब होतो, त्यामुळे तो कुजतो, ते कंटेनर बुरशी येऊन खराब होतात, नाईलाजाने मग त्याऐवजी इतर कचऱ्यात ते टाकावं लागतं, त्याचा म्हणावा तेवढा वापर होत नाही. दिवसेंदिवस कचरा विल्हेवाट हा प्रश्न जगभर वाढत जाणार आहे. पण निदान त्या दृष्टीने बरीच योग्य पावलं इथे उचलली जातात. सरकारचे कठोर नियम, ते पाळले जातील अशी व्यवस्था, जागरूक नागरिक, विविध सामाजिक संस्था, रिसायकलिंग कारखाने, वीजनिर्मितीत होणार पुनर्वापर या सगळ्यामुळे परिसर आणि देश स्वच्छ राहतो. 

मधुरा देशपांडे - शेंबेकर

३०-०५-२०२५






No comments:

Post a Comment