Friday, June 20, 2025

इंस्टाग्राम वरचे vlogger प्रकार

विविध देशातल्या Vloggers चं इंस्टाग्राम वर सध्या पीक आलेलं आहे. त्यातला एखादा व्हिडीओ पाहिला की अजून दहा दिसतात, लोकेशन जर्मनी असल्यामुळे तेच जास्त दिसतात असं असेल पण, विशेषतः नवीन येणाऱ्या पिढीत यांचं प्रमाण खूप जास्त आहे. 

यात काही जण आहेत ज्यांचे खरंच चांगले कंटेंट आहेत, काहींकडून आम्हालाही नवीन माहिती मिळते. भाषेबद्दलचे काही आहेत, काही जण इथल्या खटकणाऱ्या बाबींवर पण उत्तम कन्टेन्ट करतात, त्यात विनोद असतो, कधी वैताग असतो पण रिलेटेबल असतं तेव्हा मजा येते. पण याचं प्रमाण कमी आहे. बहुतांशी प्रमाणात जे काही दिसतं ते बघताना जाणवलेले काही मुद्दे - 

यांची नावं - जर्मनी + देसी + मराठी/कन्नड/ + गावाचं नाव + स्वतःचं नाव किंवा आडनाव वगैरे यांचं कॉम्बिनेशन असतं. थोडक्यात नाव गाव देश यावर आधारित काहीतरी. (बाकी अनेक इतरदेशीय लोक सुद्धा यात आहेत पण लेखाचा विषय तो नाही) जो येतो तो हेच करतो की काय असं वाटतं इतक्या संख्येने हे दिसतात. सरसकट सगळ्यांना एका तराजूत ठेवायला नको, पण व्हिडिओ/ रील बाबतीत काही प्रकार प्रामुख्याने आढळतात ते असे - 

मी सकाळी उठले/उठलो, डोळे चोळत फोन हातात घेऊन त्यावर बघत बसले, दात घासले, मग उठून चहा ठेवला, मग अंघोळ केली (इथेही कॅमेरा असतो ) स्वयंपाक केला, मग तयार होऊन ऑफिसला गेले मग अजून काही, मग घरी येऊन स्वयंपाक केला, घरी भारतात फोन केला वगैरे. मग विकेंडला घरातली कामं केली, ग्रोसरी आणली आणि मग कुणालातरी भेटलो किंवा नवीन ठिकाण फिरलो आणि तिथले व्हिडीओ असं एकूण स्वरूप. 

एक तर सकाळी उठणे दात घासणे हे सगळं भारतात पण करूच ना आपण, त्यात एवढे व्हिडिओ काढण्यासारखं काय आहे 🤔 फोन आणि डेटा हातात आहेत तर रोजच्या दैनंदिन्या इतक्या जास्त प्रमाणात जगजाहीर रेकॉर्ड करायच्या का असा हे बघून प्रश्न पडतो.

एक प्रकार आहे प्रत्येक दुकानात मिळणाऱ्या वस्तू आणि त्यांची माहिती. हे इथे स्वस्त आहे, सुपरमार्केट मध्ये भारतीय काही मिळतं का, कोणती भाजी कशी वापरू शकतो असं सगळं. प्रथमदर्शनी हे खरंतर उपयोगी आहे, इथे भाषा वेगळी आहे त्यामुळे यातून अनेकांना फायदा होत असेल हे मान्य आहे. पण मग त्याचा इतका अतिरेक की बास, प्रत्येक दुकानातल्या वस्तूंची चिरफाड. एखादी गोष्ट किती भारी आहे,  एखादी किती वाईट आहे इतपत ठीक आहे, पण "मी" सांगतो तेच "बेस्ट" आहे, "मीच" हे सगळं सांगतो आहे बाकी कुणी सांगणार नाही असा आव कशाला?  

याशिवाय घर भाड्याने घेणे, विकत घेणे, बाळंतपण, मुलांचं संगोपन, बँकेचे व्यवहार, देशातले नियम याही विषयांवर माहितीपर व्हिडीओ असतात, पण त्यातही कित्येक वेळा अभ्यास करून सांगितलेली माहिती नसते. केवळ स्वानुभवावर आधारित जे असेल ते सरसकट सगळीकडे असेल असं होत नाही. काही नियम राज्यांप्रमाणे बदलतात, काही नियम शहरात वेगळे असतात, पण सांगताना हे आत्मविश्वासाने देशभर ते लागू करतात. 

आणि त्यातच अजून म्हणजे जर्मनीत "हे" करू नका, जर्मनीने मला "हे" शिकवले आणि वाचायचं कॅप्शन मध्ये. (कॅप्शन ऐवजी लेख वाचतील का कुणी? असो)हे तुम्ही मिस केलं तर किती प्रॉब्लेम होतील आणि पाहिलं तर किती आयुष्य तुमचं सोपं होईल असं धमाकेदार काहीतरी सांगायचं. बरं व्हिडीओ आणि माहितीतले मुद्दे यांचा परस्पर संबंध असेलच असं नाही हे ही विशेष आहे. 😂 व्हिडीओ अटेन्शन साठी आणि माहिती वेगळी असं सुद्धा होऊ शकतं. 

एक प्रकार आहे "लाईफ ऍब्रॉड" या नावाखाली मग स्ट्रगल दाखवणारे रील. कष्ट आहेत हे मान्य आहे. ते आपल्याला  जगात कुठेही करावेच लागतील, करायला हवेत. इथे स्वच्छतेची परिमाणं वेगळी आहेत हे मान्य आहे, सुरुवातीला ते जड जाऊ शकतं. घरकामाला मदतनीस नाही हे खरं आहे. एखाद्या वेळी कंटाळा येईल, नकोसं होईल, सवय व्हायला वेळ लागेल पण कधीतरी स्वीकारायला हवं ना? घर रिकामं करताना त्याची एवढी स्वच्छता करावी लागते म्हणून अशी घरं घेऊ नका, अमुक प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट घ्या असं पाहिलं की आश्चर्य वाटतं. आपण जिथे राहिलो ते परत देताना स्वच्छ करून द्यायला हवं यात चुकीचं काय आहे असा प्रश्न पडला. 

आणि अजून एक म्हणजे त्यावरच्या लोकांच्या कमेंट्स - व्हिडिओ काय आणि तुम्ही विचारताय काय? असं ते वाचताना जाणवतं. 

कोणती युनिव्हर्सिटी बेस्ट आहे? एकतर असं एक काही बेस्ट असं नसतं, जे बेस्ट मध्ये जातील ते इथे विचारतील की अभ्यास करून स्वतः शोधतील 😉

पगार किती? मला जॉब मिळेल का? खर्च किती होतो? एकतर यातले अनेक प्रश्न सापेक्ष आहेत. स्वतः जरा शोधाशोध करून मग विचारणे वेगळं आहे, पण बऱ्याच जणांना सगळं रेडीमेड हवं आहे. गुगल किंवा एखाद्या वेबसाईट पेक्षा विश्वासार्ह माहिती नंतर लोकांकडून मिळू शकेल, पण आधी आपण आपले प्रयत्न करायला हवेत. (अर्थात हे आम्हीही अनुभवलं आहे, इकडे जॉब मिळवून दे हे काहींना अगदीच सोपं वाटतं. इकडे आल्यावर पण कित्येकांना "भाषा येत नाही" या नावाखाली सगळी माहिती दुसऱ्याकडून आयती हवी असते.) 

एकुणात सगळे जण थोड्याफार फरकाने तेच सांगतात, त्यात काहीतरी ड्रामाटिक कॅप्शन किंवा आभास निर्माण करतात. ट्रेंड फॉलो करण्याच्या नावाखाली नावीन्य कमी राहतं, एक विषय सुरू झाला की सगळे त्यावरच बोलतात. काही रील बघून हे झापड लावून आहेत असं वाटतं. परदेशात राहताना सगळं भारी मग सगळं वाईट (किंवा याच्या उलट आधी वाईट मग चांगलं) अश्या फेज मधून जाऊन चांगल्या वाईट गोष्टींचा आपल्या पुरता बॅलन्स शोधला जातो, स्वीकारला जातो आणि मग हळूहळू स्थिरता येते. ब्युरोक्रसी किती वाईट आणि लाईफस्टाईल किती छान याच्या मध्ये अनेक  गोष्टी आहेत. नवीन देशात स्मार्टफोन/ट्रान्स्लेटर सहज उपलब्ध नसताना आम्ही आणि अनेकांनी या वाटा स्वतः शोधल्या, त्यात धडपडलो पण हळूहळू जमत गेलं सगळं. त्यातूनच नियम, शिस्त, स्वच्छता, भाषा हे सगळं शिकत गेलो. मुळातच स्वतः हातपाय न हलवता काही मिळणार नाही हे माहीत होतं. याचा अर्थ लोकांनी नवीन सोयींचा आधार घेऊ नये असं नाही. अवश्य सोयी वापराव्यात, मदत घ्यावी (जी अनेकांना केली आहे) पण तारतम्य ठेवावं. सोशल मीडिया, Vlog विरोधात पण मी नाही. मी स्वतः मराठी आणि जर्मन दोन्ही भाषेतून त्यावर ऍक्टिव्ह आहे (जर्मन भाषेतून मी भारतीय पाककृती लिहिते) पण या माध्यमात ऍक्टिव्ह राहण्यासाठी किती सातत्याने कन्टेन्ट करावा लागतो याचा अंदाज आहे. मग त्याच्या नादात रोज उठून काहीतरी करायचं अश्या पद्धतीने काही जण कन्टेन्ट तयार करतात आणि मूळ उद्देश बाजूला राहतो. ( फेसबुक मला सतत इतक्या संख्येने हे करा, ते करा असं सांगत असतं, हा लेख त्यासाठी लिहिलेला नाही. 😜 ) 

लिखीत माध्यमाच्या मर्यादा मला मान्य आहेत. त्यामुळे साहजिकच लोकांची ओढ या दोन मिनिटांच्या व्हिडीओ कडे आहे. दोन्हींची तुलना पूर्ण वेगळी आहे. पण तरी या रील इतके वाचक आपल्या लिखाणाला मिळावे असं एखाद्या वेळी वाटतं. 😁 आणि सतत प्रत्येक ठिकाणी सारखे व्हिडिओ काढून यांना कंटाळा येत नाही का असाही प्रश्न पडतो. आता हे सगळं न बघण्याचा पर्याय आहेच, मध्यंतरी टायमर लावून इंस्टाग्रामचा वापर एकदम कमी केला होता, कधीतरी सुट्टीत ते बदललं आणि तेव्हा एकदम हे जास्त जाणवलं. आता पुन्हा आज टायमर लावला. अजून दहा वर्षांनी या सगळ्याच गोष्टी खूप बदललेल्या असतील, कदाचित हेही सगळं कालबाह्य वाटेल. तोवर "मी इंस्टाग्राम वर Blogger असते तर" हा निबंध कधीतरी लिहून काढावा असा विचार आहे 😁 

मधुरा देशपांडे शेंबेकर 

२०.०६.२०२५


No comments:

Post a Comment