Sunday, August 10, 2025

हायडेलबर्ग

हायडेलबर्ग Heidelberg 

जर्मनीत Neckar (नेकर) नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं एक गाव. Heide म्हणजे कुराण किंवा तत्सम भाग आणि Berg म्हणजे डोंगर. डोंगर आणि त्या डोंगराच्या मधल्या जागेत असलेली वस्ती असं हे गाव. इथल्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक. 

हे युनिव्हर्सिटी टाऊन असल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत. त्यामुळे या गावाला एक तरुण व्हाइब आहे.इथे एक प्रसिद्ध Castle आहे, नदीवरचा एक पूल प्रसिद्ध आहे. आणि नदीच्या दोन्ही बाजूला जे डोंगर आहेत, तिथे अनेक जागा आहेत. हायकिंग साठी जाता येतील अशा अनेक वाटा आहेत. एका डोंगरात वर सुरेख amphitheatre आहे. या डोंगरात घनदाट उंच वनराई आहे. डोंगरात सुद्धा बहुतांशी ठिकाणी गाडीने जाण्यासाठी पण उत्तम रस्ते आहेत. तिथे वर गाडी लावून मग पायी जाणे हाही पर्याय आहे. वर आलो की खाली दिसणारं गाव, नदी आणि आजुबाजूचा परिसर हेही दृश्य अनुभवण्यासारख आहे. गावात अनेक जुन्या इमारती आहेत. अनेक प्रसिद्ध लोक या शहरात वास्तव्यास होते. 

जर्मनीत आल्यानंतर पहिली दोन तीन वर्ष आम्ही अनेक वेळा Heidelberg ला जायचो. इथल्या old Street वरून दगडी रस्त्याने चालत पुढे नदीकिनारी जाऊन बसायचो. रस्त्यात अनेक वादक दिसायचे. प्रसिद्ध गाव असल्यामुळे वेगळी रेस्टॉरंट्स दिसायची. विकेंड असेल तर या डोंगरातले लहान ट्रेक करायचो. गावातल्या गल्ल्या पालथ्या घालायचो. सुरेख lamppost, चर्च, जुन्या इमारती, त्याचा इतिहास,  अधून मधून कानावर पडणारी मराठी आणि हिंदी भाषा हे सगळं आवडायचं. 

हल्ली इथे जाणं कमी झालं. नवीन जागा शोधल्या तश्या काही जुन्या भेटी कमी झाल्या. त्यामुळे गेलो तरी कामासाठी जाऊन परत असं होतं. काल अनेक महिन्यांनी, कदाचित वर्षांनी इथे पूर्ण वरपर्यंत जायचं असं ठरवून गेलो. या Castle च्या अजून बरंच वर आलो की एक जागा आहे Königsstuhl. Castle कडे जाण्यासाठी एक ट्रेन आहे, तीच अजून वरपर्यंत येते. पण इथे थेट गाडी घेऊन सुद्धा येता येतं. हा पूर्ण घाटाचा रस्ता आहे, दोन्ही बाजूनी झाडी, मध्येच काही बुरुज बांधलेले दिसतात. काही घरं दिसतात. काय किमती असतील या घरांच्या आता असा विचार चमकून जातो. ;) 

अनेक लोक, त्यातही अनेक मध्यमवयीन, वयस्कर असे सगळे सायकलने चढत वर येताना दिसतात. त्यांचा फिटनेस पाहून कमाल वाटते. परवा सूर्यास्ताच्या तासभर आधी पोचलो. बाहेर जिथे सूर्य अंगावर येत होता, तिथे शेजारच्या झाडीत मस्त सावली होती. त्या गार सावलीतल्या पायवाटेने थोडं फिरून आलो तेव्हा सूर्य बराच खाली गेला होता. अनेक जण येऊन बसत होते. आपापल्या चटया घेऊन लोक सूर्यास्ताची वाट बघत बसले होते. हिरव्यागार डोंगरात रंगीत ठिपके दिसावे तसे हे लोक दिसत होते. वर बसायला काही बाक होते, काही दगड होते. एक हॉटेल आणि रेस्टॉरंट होतं, ती इमारत अतिशय देखणी होती. 

बाहेर एक आईसक्रीमची गाडी होती. तिथे आईसक्रीम घ्यायला गेलो. सृजनने चॉकलेट आणि मी कोकोनट फ्लेवर घेतला. तो माणूस जर्मन भाषेला सरावलेला नसावा, तो बोलला त्याचा अर्थ असा होता की आज १०किलो कोकोनट आईसक्रीम खा. मी का एवढे खाऊ हे मला समजेना. 😂 मग त्याच्या पुढच्या बोलण्यातून समजलं की आज अनेक जणांनी कोकोनट खाल्लं आणि त्यांना खूप आवडलं, मग पुन्हा मागून घेतलं. त्याचा खूप खप झाला. सुरुवातीला भाषा तेवढी येत नव्हती तेव्हा आमचे पण भाषेचे अनेक किस्से झाले आहेत. त्यामुळे त्याच्या बोलण्याचे अर्थ लावण्याची गंमत वाटली. 😁 आईसक्रीम खायला येऊन तिथल्या दगडांवर बसलो. ते खाऊन खरंच सुमेध पुन्हा कोकोनट फ्लेवर घ्यायला गेला आणि त्याच्या बोलण्याला दुजोरा मिळाला. 😁 

मागे एक मुलगी बसली होती, बहुधा पहिल्या डेट वर आली होती आणि मोठमोठ्याने इंग्रजीत बोलत होती. मूळ रोमेनिया मधून आलेली आणि जर्मनीत एका अमेरिकन कंपनी साठी काम करते हे तिच्या बोलण्यातून समजलं. सतत अमेरिकन लोक कसे वाईट आहेत याबद्दल बोलत होती. तिला तिच्या जॉब मध्ये पोझिशन किती महत्त्वाची आहे, आधीच्या कंपनीमध्ये cleints Kind of Steal करून तिला तिचा बिसनेस वाढवून लाइफ सेट करायचं होतं असं काय काय सांगत होती. 😯 तो मुलगा काहीच बोलत नव्हता. 😜 तिची बोलण्याची पद्धत आणि दर काही वेळाने त्याच शब्दाचं गुऱ्हाळ ऐकत माझं फुकट मनोरंजन झालं. काही बाबतीत तिच्यासारखी असणारी ओळखीतली मंडळी आठवली. 

सूर्य खाली कलत गेला तसं खालचं दृश्य अजून स्पष्ट आणि सुरेख दिसायला लागलं. मधूनच वरुन विमान जाताना दिसायचं. तो सगळा सोहळा बघत अनेक जण बसले होते. काही शांत होते, काही बोलत होते. प्रत्येकाच्या मनात काय विचार असतील इथे? काही जणांसाठी नेहमीची जागा असेल, तरी प्रत्येक वेळी आकाशात वेगळे रंग दिसत असतील. काहींना या डोंगरातल्या जागांची पुन्हा ओढ वाटत असेल. इथे परत यायला हवं असं वाटत असेल. मी या विषयावरच्या कविता आठवत होते. गुगल केल्यावर नेमक्या कोणत्या ते आठवलं. बरेच फोटो घेतले. 

सूर्य अजून खाली गेला तसे हळूहळू एकेक जण उठून परतीच्या रस्त्याला लागले. दिवसभराचा सगळा शीण त्या तासाभरात निघून गेला. अंधार व्हायच्या आत निघूया म्हणून आम्हीही निघालो. आणि अगदी तेव्हाच, ते तिथलं हॉटेल, सूर्यास्त आणि ती जागा हा सगळा मूड एकत्र पकडता यावा अशी फ्रेम फोटोत पकडता आली. 

मधुरा देशपांडे शेंबेकर 
१०-०८-२०२५

#जर्मन_वर्मन #जर्मनीतीलवास्तव्य



No comments:

Post a Comment