Monday, September 22, 2025

शालेय पुस्तकं

सृजन अभ्यास करत होता. एक धडा वाचायचा होता. मी शेजारी बसून ऐकत होते. एक शब्द नीट कळला नाही म्हणून मी पुस्तक जरा माझ्याकडे सरकवलं, तर लागलीच "मी या पुस्तकाचा पहिला Besitzer (owner) आहे, असं वापरू नकोस" असं मला सांगून त्याने. वास्तविक मी नीटच बघत होते, एरवी हे मी किती वेळा बाकी ठिकाणी सांगत असेल 😂. पण इथे मुद्दा लक्षात घेण्यासारखा होता, कारण शाळेतली पुस्तकांची सिस्टिम अशी आहे की या सवयी लागल्या आहेत. 


नवीन शालेय वर्ष सुरू झालं की सगळी पुस्तकं शाळेकडून मिळतात. (सगळी विनामूल्य) ही पुस्तकं किमान तीन वर्ष वापरली जातील असं गृहीत धरून त्यावर User1, User2, User3 असा शाळेच्या नावासहीत शिक्का असतो. यातली काही पुस्तकं नवीन कोरी मिळतात, काही इतरांनी आदल्या वर्षी वापरलेली असू शकतात. फोटोत दिसतंय ते सृजनने पहिलं नाव लिहिलं आहे. वर्षाच्या शेवटी हे पुस्तक परत द्यायचं, मग शाळा ते या इयत्तेत नवीन आलेल्या मुलांना देईल आणि एकूण तीन वर्षात तीन मुलांकडून वापरलं जाईल. वर्षाच्या शेवटी जर पुस्तक खराब झालं असेल तर त्याचे पैसे, खरंतर दंड भरावा लागतो. पुस्तक किती खराब झालं आहे आणि तुम्हाला नवीन पुस्तक मिळालं आहे की  वापरलेलं त्यावरून दंडाची रक्कम ठरते. हे माहिती असल्यामुळे मुलं पुस्तकं जपून वापरतात. तिसऱ्या वर्षी पुस्तक मिळालं तर मुलं थोडी रिलॅक्स असतात, कारण बहुतांशी ती पुढे वापरली जात नाहीत 😁 किती वर्ष आणि किती दंड याबाबत प्रत्येक शाळांचे नियम थोडे वेगळे असू शकतात, पण तरी ही पद्धत बहुतांशी ठिकाणी दिसते. 


विविध दृष्टिकोनातून पाहिलं तर वस्तूंचा पुनर्वापर होतो, मुलांना जरा जबाबदारी शिकवली जाते त्यामुळे ही शाळेतली पद्धत मला आवडली आहे. ज्यांच्या घरात दोन तीन मुलं आहेत तिथे मोठ्यांना नवीन पुस्तकं आणि लहान बहीण भावांनी जुनी ताई दादांची पुस्तकं वापरायची यावरून भांडणही होत नाहीत 😉 आणि एकुलते एक असतील तरी त्यांना जुनी पुस्तकं वापरण्याची सवय लागते. 😁 


फक्त पालकांसाठी, मेरीही बिल्ली मुझेही म्याँव असं होत, नीट हाताळण्याच्या सूचना आम्हालाच ऐकाव्या लागतात, तेवढं चालवून घेता येतं. 😊 


No comments:

Post a Comment