आंघोळ या प्रकाराचा अनेकांना खूप कंटाळा असतो. पण रोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्याशिवाय मी घराबाहेर पडू शकत नाही. घरून काम करते तरीही आंघोळ करूनच मी सुरुवात करते. 😂 काम तर नंतर, सकाळचा चहा, सृजनचा डबा या सगळ्याच्या आधी आंघोळ करून मगच मी स्वयंपाक घरात येते. यात कुणाची जबरदस्ती नाही, दडपण नाही, केवळ मला बरं वाटतं म्हणून. कितीही थंडी असू देत किंवा ऊन असू देत, एक सकाळी आंघोळ झाल्याशिवाय मला फ्रेश वाटत नाही. 😁 विशेष असं असतं की अंघोळ केल्यानंतर एक बेसिक तयारी त्या व्यतिरिक्त खूप मेकअप, हेअर स्टाईल असे कोणतेही प्रकार मला करायचे नसतात, तो माझा पिंड नाही, पण ती रोजची सकाळची आंघोळ खूप महत्त्वाची आहे. अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा मी उशिरा जरी उठले, तरी उठून मग निवांत बघू करू अंघोळ, असं माझं होतच नाही. मी अस्वस्थ होते उशीर झाला तर. त्यावरून बरेचदा मला घरचे चिडवतात आणि अर्थातच मी त्यांना चिडवते की तुम्हाला असं कसं आंघोळ करावी वाटत नाही 😉
आणि मग एखादा दिवस अनपेक्षित घटना घेऊन येतो. मी एका कामासाठी बाहेरगावी होते आणि सकाळी ठेचकाळून पडले. मग आधी प्लास्टर, नंतरच्या आठवड्यात ऑपरेशन आणि दवाखान्यात राहणे या सगळ्या प्रकरणात दोन आठवडे अंघोळ करणं शक्य नव्हतं. माझ्यासाठी ही शिक्षाच होती, जी मी काहीही कुरकुर न करता स्वीकारली. Sponging वर मॅनेज करत होते. ज्या दिवशी मी हॉस्पिटल मधून निघणार होते त्या दिवशी तिथल्या एका नर्सने मला सांगितलं, की हे जे प्लास्टर आहे माझ्या मोठ्या जखमेवर लावलेलं, खरं तर ते वॉटरप्रूफ आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला अंघोळ सुद्धा करता येईल. हे ऐकल्यानंतर माझा चेहरा इतका खुलला की त्या दोघीही माझ्याकडे बघूनच हसायला लागल्या. 😂
त्यांनी कितीही सांगितलं की ते वॉटरप्रूफ आहे, तरी मी शक्यतो पाणी त्या जखमीला न लागू देता, घरी आल्यानंतर मी अंघोळ करू शकते आहे. त्याशिवाय केसांची पण अवस्था झाली होती. त्यामुळे घरी आल्यावर लगेच दुसऱ्याच दिवशी, मी पहिले जाऊन केस कापून आले, मुख्य त्यांच्याकडून केस धुवून घेता आले. हात पूर्ण बरा व्हायला काही महिने लागतील, तोपर्यंत या लहान लहान गोष्टींनी छान वाटतं आहे.
आज सकाळी आठ वाजताच फिजिओथेरपीची appointment होती, त्याच्यामुळे तिकडे जाण्याच्या आधी मी छान आंघोळ करून बाहेर पडले. एरवी मी स्वतःचे फोटो काढायला अजिबात उत्सुक नसते. पण आज सकाळी चक्क मी स्वतः म्हणाले नवऱ्याला की माझा एक फोटो काढ. थंडी खूप आहे, त्यामुळे जॅकेटला पर्याय नाही, ते एका हातात नुसतं अडकवून, टोपी घालून, बाहेरच्या फ्रेश हवेने आणि अंघोळीने 😂 आनंदलेला चेहरा 😊
No comments:
Post a Comment