सँडविच म्हणजे व्हाईट ब्रेड, बटर, हिरवी चटणी, उकडलेला बटाटा, टोमॅटो, चाट मसाला, चीज अश्या पद्धतीचं stuffing असं एक सर्वसाधारण चित्र डोळ्यासमोर येतं. दुसरा प्रकार म्हणजे गरम सँडविच किंवा ग्रिल्ड सँडविच, फार पूर्वी ते गॅस वर चालेल असं हॅण्डल असलेलं सँडविच मेकर असायचं, त्यात गरम केलेले सँडविच कधीतरी दुपारच्या वेळी खायला मिळणे, हे अप्रूप होतं. रोज पोळी भाजी वरण भात असं जेवण असणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांसाठी, हे असं सँडविच ही चैनीची बाब होती. यातल्या गार किंवा गरम या कोणत्याही प्रकारात Stuffing मधले पदार्थ ज्या त्या घरातल्यांच्या आवडीनुसार बदलत असतील, रेस्टॉरंट मध्येही त्यांच्या आपापल्या पाककृती आणि नावं वेगळी असतील, त्यात ब्राऊन ब्रेड ते avacado असे असंख्य बदल होत गेलेत, तरी मूळ गाभा हा राहतो. (हल्लीच्या काळात स्ट्रीट फूड म्हणून मिळणारे सँडविच मी फक्त व्हिडिओ मधून पाहिले आहेत, त्यात दिसणारे दहा प्रकारचे सॉस, चीजचा मारा हे मी यात धरलेलं नाही)
या अश्या सँडविच प्रकारांची ओळख असलेल्या मला, नंतर युके मध्ये असताना चीज आणि कांदा असं stuffing असलेलं सँडविच मिळायचं, ते आवडीचं होतं. पण बाकी काही खूप व्हरायटी तेव्हा दिसली नाही. तेव्हा अर्थात मीही खूप explore केलं नसेल. मग जर्मनीत आल्यावर इथल्या बेकरीज बद्दल ऐकून होते, पण त्या बेकरी मध्ये आपल्या डोक्यातल्या सँडविच सारखे प्रकार कुठे मिळतच नाहीत हे लक्षात आलं. इथल्या असंख्य अशा ब्रेड प्रकारांमध्ये, आपल्या सवयीच्या मऊ लोफ ब्रेडला काहीही भाव नाही, ते स्थानिकांमध्ये अगदीच average समजले जातात हे समजलं तेव्हा हे कोणतं वेगळं जग आहे असं वाटलं होतं. 😉
सुरुवातीला एकदा जेव्हा सुमेध चल ब्रेकफास्ट करायला आज बेकरीत जाऊ म्हणाला (ज्याला आता डेट म्हणतात, हे असे शब्द आमच्या शब्दकोशात नव्हते तेव्हा 😂) तर तिथे गेल्यावर कडक ब्रेड खाताना माझ्या दातांनी असहकार दर्शवला होता. 😂 कसंबसं ते खाऊन झाल्यावर जर्मनीची आणि आपली कुंडली काही जुळणार नाही असं वाटलं होतं. 😆 त्यानंतर बाहेर फिरताना बाकी काही पर्याय नसेल तर बेकरीत जाऊन Croissant किंवा केक असेच, दातांना सुरक्षित (आणि पर्यायाने माझ्या मनालाही) प्रकारच मी निवडायचे. पण प्रत्येक वेळी काही त्याने पोट भरत नाही, शिवाय सारखं गोड किती खाणार अशा अनेक कारणांनी वेगवेगळे पदार्थ try करायला लागले. आमच्या ऑफिस मधल्या कॅन्टीन पेक्षा, हे बेकरीतले काही प्रकार जास्त बरे वाटायला लागले. हे इतकेही दातांना त्रासदायक नाहीत हे समजायला वेळ गेला, आणि मग काही ब्रेडचे प्रकार, त्यापासून बनवलेले अजून काही प्रकार आवडायला लागले.
हे फोटोत दिसतं ते आहे belegte Brötchen, भाषांतर केलं तर ते सँडविच असंच आहे. माझ्या डोक्यात असणाऱ्या सँडविच सोबत अजिबातच न जुळणारा असा हा पदार्थ, आता अधून मधून मी खाऊ शकते. कडक ब्रेड, त्यात मिओनिज सारखं कोणतं तरी सॉस, काकडी, लाल सिमला मिरची, सॅलड पानं आणि अंडं असं साधारण हे प्रकरण आहे.
समाधानासाठी यात कार्ब असतात, जरा भाज्या आणि अंडं यामुळे पोटभरीचा प्रकार होतो. यात मांसाहारी लोकांसाठी अजून बरेच प्रकार असतात, पण मसाले चटण्या असा प्रकार फार नसतो. प्रत्येक बेकरीत याची व्हर्जन वेगळी दिसू शकतात.
बाकी आपले घरी पोळ्या पराठे पोहे हे सगळं असतंच. अजूनही घरी एखाद्या वेळी सँडविच खावं वाटलं तर भारतीय व्हर्जनचीच, चटण्या भाज्या घालून होतात. पण चवबदल म्हणून हेही प्रकार आवडतात. बाहेर कुठे गेल्यानंतर आता पूर्वीसारखं अडत नाही. मऊ लुसलुशीत ब्रेड पासून केलेली सँडविच ते belegte Brötchen हा प्रवास आठवून आता मजा वाटते. #जर्मन_वर्मन म्हणत, जर्मन खाद्यसंस्कृती सोबतही गट्टी जमायला लागते.
मधुरा देशपांडे शेंबेकर
१२-१०-२०२५
No comments:
Post a Comment