Monday, June 15, 2026

आठवणी १४-०३-२०२६

 आठवणी 

आम्ही पूर्वी ज्या गावात राहायचो तिथलं हे ट्रेन स्टेशन. आता इथून दोन स्टेशन पलीकडे (किंवा अलीकडे, पण त्याही आधी जिथे राहायचो ते धरलं तर पलीकडे असा हिशोब 😁) राहतो.  अजिबात गजबज नसलेलं हे स्टेशन. कमी गर्दी असलेली अशी बरीच स्टेशन असतात, पण त्यात स्वतःचा चार्म असलेली मोजकी असतात. हे स्टेशन त्यापैकी एक, सगळी रचना सगळीकडे सारखीच असली तरी थोडं वेगळं असं. एकूण तीन प्लॅटफॉर्म, तिथून दोनच मुख्य ट्रेन जातात आणि काही तिथून फक्त पास होतात. 


मला ट्रेनने जाण्याची वेळ तशी कमी येते. सध्या ऑपरेशन नंतर अजून गाडी पुन्हा चालवायला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे आज बस ट्रेन असा प्रवास करून नवीन चष्मा घ्यायला आले आणि इथल्या आठवणीत रमले. 


सृजन लहान होता तेव्हा आम्ही इथे कित्येक वेळा यायचो. फक्त ट्रेन बघायला. 😁 त्याच्यासोबत कधी मी, कधी सुमेध किंवा कधी दोघंही. Kindergarten झालं की तो टेन किंवा टलेन (ट्रेन) असं म्हणून हट्ट करायचा. तिथली केअर टेकर पण विचारायची, आता ट्रेन बघायला जाणार का म्हणून 😉 

मग सृजनला त्याच्या स्ट्रोलर मध्ये बसवून आम्ही चालत दहा मिनिटात इथे यायचो. सगळ्या गाड्या मोजायचो. ही ICE (fast), ही S-Bahn (जवळच्या अंतरावर जाणारी), ही मालगाडी, ही लाल रंगाची, ही पांढऱ्या रंगाची ट्रेन याबद्दल बोलायचो. काही वेळा फक्त इंजिन दिसायचं एक, त्याची फार गंमत वाटायची. मालगाडीवर नव्या कोऱ्या कार रचलेल्या आहेत हेही विशेष वाटायचं. फास्ट ट्रेन इथे का थांबत नाही, ही ट्रेन कुठे जाते अशी बालसुलभ आणि बोबड्या भाषेतली प्रश्नोत्तरं, अधून मधून दिसणारी कबुतरं, त्यांच्याशी गप्पा, ट्रेन थांबली की येणारी जाणारी माणसं हे बघत बराच वेळ गेला की आम्ही "आता जायचं का घरी परत?" असं विचारायचो. मग त्यावर सृजन "अज्यून दोन" असं म्हणायचा. त्या आग्रहाला बळी पडून आम्हीही अजून ट्रेनची वाट बघायचो. मी काही वेळा तेवढ्या वेळात आईला फोन करायचे, आमच्याही गप्पा व्हायच्या. कधी त्या दोन ट्रेन यायच्याच नाही, मी शेवटी वैतागून अरे स्वयंपाक कधी करू आता ट्रेन पुरे असं म्हणून त्याला परत घेऊन निघायचे. 


हळूहळू त्याची ही क्रेझ कमी होत गेली. आता त्याला बदल म्हणून कधीतरी ट्रेन किंवा बसने जावं वाटतं, पण तिथे अर्धा पाऊण तास नुसतं ट्रेन बघत बसायचं असं सांगितलं, तर आता त्याला ती शिक्षा वाटेल 😜 तेही बरोबरच आहे, आम्हीही आता तेवढ्या उत्साहाने रोज येणार नाही. अधून मधून ही ट्रेन घेऊन फक्त त्या आठवणी काढत राहू 😊 




मधुरा देशपांडे-शेंबेकर 

१४-०३-२०२६



No comments:

Post a Comment