Saturday, December 22, 2012

मी आशा...

रोजच्या पेपर मधील स्त्री भ्रूण हत्या काय किंवा बलात्कार काय, अश्याच मन विषण्ण करणाऱ्या घटनांप्रमाणेच, अशीच एक बातमी लोकप्रभा मधील खालच्या लिंक वर वाचण्यात आली. हे वाचताना पुढे वाचू की नको, अजून काय आता वाईट असेल, असे वाटून अंगावर काटा येत होता. पण फक्त वाचताना असं होतंय तर मग ज्यांनी हे सगळं सहन केलंय किंवा करताहेत, त्या सगळ्या स्त्रियांच्या आयुष्याची कल्पना सुद्धा करवत नाही. पण या सगळ्यात सुद्धा, त्या बातमीतील एक गोष्ट स्त्रीत्वाची आणि माणुसकीची आशा जिवंत ठेवणारी वाटली.

http://www.lokprabha.com/20121221/cover.htm (साभार लोकसत्ता / लोकप्रभा)

"......मी आशा. कोलकात्यातून इथे मुंबईत आले आहे. मला माझी तीन मुलं आहेत. शिवाय एक मूल मला कचरापेटीत सापडलं. तेही मी माझ्याकडेच ठेवून घेतल. शिवाय माझी म्हातारी आई आहे. या सगळय़ांचं पोट भरण्यासाठी मी स्वतहून या व्यवसायात आले आहे. आणि मग सहा महिने सुधारगृहात खितपत पडले होते. तिकडे माझी चार मुलं, माझी आई कशी जगत असतील असा घोर माझ्या जीवाला दर क्षणाला पडला होता. आता सुटका झाल्यामुळे परत चालले आहे आणि या असल्या मुंबईत परत चुकूनही येणार नाही....."

एखादा सेलिब्रेटी, मग तो खेळाडू असो, औद्योगिक क्षेत्रातील अब्जाधीश असो किंवा मग बॉलीवूड मधील कुणी व्यक्ती, यांनी कुठल्या NGO ला भेट दिली की दुसऱ्या क्षणी त्यांचा फोटो सगळीकडे असतो. कदाचित या बातम्या केवळ सेलिब्रेटींच्या  म्हणून पुढे येतात. पण स्वतःची ३ मुले असताना, आणि रोजच्या पोट भरण्यासाठी जिच्याकडे पैसे नाहीत, अशा परिस्थितीत कचरापेटीत सापडलेलं दुसऱ्याचं मूल सुद्धा वाढवायची जबाबदारी जिने स्वीकारली, तिचं हे समाजकार्य बातम्यांमधे कधीच नाही येणार का? मूळ बातमीपेक्षा वेगळ्याच पद्धतीने, केवळ TRP च्यामागे पळणाऱ्या News Channel किंवा मिडिया वाल्यांना, या अशा खऱ्या माणसांसाठी  वेळ नसावा का? कचरापेटीत सापडलेलं मूल त्याला कुणी वाली नाही म्हणून २ तासात प्रसिद्धीच्या झोतात येऊ शकतं, त्याचे जन्मदाते किती वाईट आहेत यावर फार तर फार २ दिवस चर्चा होते आणि सगळं मागे पडतं. पण अशाच एखाद्या मुलाला आपलंसं करून घेणाऱ्या आशासारख्या व्यक्तीला मात्र पैशांसाठी पराकोटीच्या तडजोडीना सामोरं जावं लागतं. स्वतःच्या खडतर आयुष्यात ढीगभर प्रश्न असताना, मनाचा इतका मोठेपणा दाखवणारे विरळच.

या ब्लॉग च्या निमित्ताने आशा किंवा तिच्यासारख्याच अनेकांचं कार्य अगदी कमी स्वरुपात का असेना, लोकांपर्यंत पोचवता आलं तरी तिच्या कार्याचा खरा सन्मान होईल. तेव्हा आशा सारख्या अनेकांच्या या समाजसेवेला, उदारतेला, माणुसकीला, स्त्रीत्वाला आणि ममत्वाला मनापासून सलाम!!!!

1 comment:

  1. तसं पाहता जगात अनेक चांगल्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. तथाकथित बातम्या देणाऱ्या वाहिन्या त्याकडे लक्ष देत नाहीत कारण म्हणावा तितका थरार त्या बातमी कडे नसतो.

    पण तरीही असा काहीसा वाचनात आल की माणुसकीवरचा उडत चाललेला विश्वास पुन्हा दृढ व्हायला मदत होते खरी.

    ReplyDelete