Wednesday, November 9, 2022

बाककला - केक बेकिंगच्या आठवणी आणि प्रयोग

 This article is published in Brawo Marathi Mandal Diwali Anka 2022

Link to read other articles is here - https://www.brawomarathimandal.de/ebooks/mihx/

माझ्या लहानपणी वाढदिवसाला केक करणे/विकत आणणे हे सवयीचं झालेलं नव्हतं. वाढदिवसाला गोड धोड आणि मग हळूहळू यात केकचा प्रवेश झाला. बाहेर कुठे विकत मिळायचे नाहीत, पण आईनी हौसेने वाळू घालून वापरायचा ओव्हन घेतला होता आणि त्यात केक करण्याचे तिचे प्रयोग पण चालू असायचे.

एका दिवाळीत कोल्हापूरला आत्या कडे सगळे जमलो असताना तिथे जवळच कुणीतरी आयसिंग शिकवते असे समजले. माझ्या दोन्ही आत्या आणि आई या प्रचंड उत्साही नणंद भावजयांनी लग्गेच तिथे जायचं ठरवलं, तिघींना तिथे जाण्यासाठी जास्त पैसे लागले असते. म्हणून मग एक आत्या तिथे जायची आणि जे शिकवलं ते सगळं रात्री परत घरी करून बाकी या दोघींना शिकवायची, असं करत करत तिघीही शिकल्या. आयसिंग साठी लागणारे नोझल्स वगैरे आईने कोल्हापूरहून घेतले आणि घरी येऊन पुन्हा तिचे प्रयोग चालू झाले, केक आणि त्यावर लोणी आणि पिठीसाखर वापरून केलेलं आयसिंग.  आईला आवड होतीच, शिवाय तेव्हा पैशांची गरज होती. बुलढाण्यात कुणी केक वगैरे करून देणारे नव्हते, मग आईने केकच्या ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आणि ते लोकांना आवडत पण होते. माझ्या वाढदिवसाला तर घरीच मग हमखास केक केला जायचा. अजूनही माझ्या मैत्रिणी त्या घरी केलेल्या केकची आठवण  काढतात, त्याचं फार अप्रूप होतं. आई जेव्हा केक करायची, तेव्हा खास लोणी वेगळं काढून ठेवणे, उष्ण हवामानामुळे खराब होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागायची, ते केक नेण्यासाठी स्पेशल खोके पण नव्हते, मोठ्या पोळ्यांच्या डब्यात ते न्यावे लागायचे आणि हे सगळं ती नेटाने ते करायची.

या सगळ्या दरम्यानच्या 2 आठवणी अजून माझ्या डोळ्यासमोर आहेत. एकदा आईने बॅटर तयार केले, मी बालवाडीतच होते, घराबाहेर बरीच वाळू असायची अंगणात, तर ओव्हन मध्ये खाली टाकण्यासाठी आईने मला बाहेर अंगणातून वाळू आणायला सांगितली, मी वाळू आणली आणि आईला काही न विचारता ती ओव्हन ऐवजी केक बॅटर मध्ये टाकली, नशीबाने अगदी चमचाभरच, आईने थांबवले म्हणून. तेवढी बाजूला करून केक नीट होऊ शकला. नंतर बहुतेक पाचवीत होते, माझा वाढदिवस होता, वाढदिवसाच्या दिवशी शाळेतून दुपारीच घरी यायला परवानगी होती, म्हणून मी शाळेतून लवकर घरी आले. घरी येऊन खेळत बसले. आईनी केक वेगळ्या खोलीत ठेवला होता, पण खेळताना माझा धक्का लागला आणि तो पडला, एक बाजू पूर्ण खराब झाली. इंग्लिश विंग्लिश सिनेमात शशी गोडबोले जशी ते सगळे लाडू पुन्हा करते, तसंच आईनेही काही न बोलता तो त्यातल्या त्यात सुधारला आणि उरलेल्या कामाला लागली. संध्याकाळी सगळे जण आले, तो केक, आयसिंग, त्याचे रंग हे सगळं मला अजूनही आठवतं आणि नंतर मला खूप वाइट वाटलं होतं हेही. पुढे आईच्या मागे इतर व्याप वाढले आणि केक बनवणे कमी होत गेले, शिवाय विकत वेगवेगळ्या बेकरींमधून केक सहज मिळायला लागले. मग पुण्यात आल्यावर मॉन्जिनिज, बेकर्स बास्केट अशा ठिकाणांची ओळख झाली, त्यातून ब्लॅक फॉरेस्ट केक, पाईनअ‍ॅपल केक, पेस्ट्रीज चे प्रकार कळत गेले. हे केक आपण स्वतः कधीतरी करू असं स्वप्नातही तेव्हा वाटलं नाही.

नंतर परदेशात आले, वेगवेगळे बेक केलेले उत्तमोत्तम पदार्थ चाखता आले. घरात रेडी ओव्हन मिळाला, तर तो वापरायलाच हवा हा नियम असल्यासारखं उठसुठ बेकिंगची इच्छा व्हायची. बेकिंग म्हणजेच जर्मन भाषेत बाकेन, तेव्हाच मी गमतीने पाककलेसारखी ही बाककला असा शब्दप्रयोग करायला लागले. प्रत्येक दुकानात बेकिंग साठी लागणारं सामान हे सगळं बघून हे घेऊ की ते घेऊ अशी अवस्था व्हायची. भारतात जसं कुकर, पोळपाट लाटणं, मिसळणाचा डबा यासारखे काही प्रकार प्रत्येक घरात असतातच, तसं परदेशात सगळ्यांकडे बेकिंग साठी लागणारं सामान असतं, असं ते सगळं बघून वाटायचं. जर्मन बेकिंग बद्दल ऐकलं पण होतंच. भारतातून आणलेलं स्वयंपाकाचं पुस्तक होतं, त्यात केकच्या पाककृती होत्या, त्या वाचल्या. युट्युबवर केक बेकिंगचे शोज पाहिले की वरवर सगळं सोपं वाटायचं. त्याच उत्साहात मग थोडीफार बेकिंगच्या सामानाची खरेदी झाली. दुकानात साधे मैद्याचे दहा प्रकार दिसायचे, त्यातला कोणता केकसाठी घ्यायचा हे कळायचं नाही. त्यावर लिहिलेलं असतं तसं, ते खूप बारीक अक्षरातलं जर्मन वाचून सुद्धा खात्री नसायची. आयसिंग, फ्रॉस्टिंग साठी पण प्रत्येक घटक पदार्थाचे असेच अनेक प्रकार दिसायचे आणि काय घ्यावं हा प्रश्न पडायचा. युट्युब वर इंग्रजीतून पाककृती बघून मग त्यातल्या प्रत्येक घटक पदार्थाला जर्मन मध्ये काय म्हणतात हेही शोधावं लागायचं. मापं नेमकी असावी म्हणून मग मेजरिंग स्पून्स घेतले, लहान वजनकाटा आणला. गुगल कृपेने मग इतके कप म्हणजे किती ग्रॅम अशी मापं समजून घेणे असा याचाही अभ्यास झाला.

याच दरम्यान मी जिथे जर्मन शिकायला जायचे, तिथे मी एका बेकिंग क्लास बद्दल वाचलं. मग एका मैत्रिणीला विचारलं की सोबत जाऊयात का, तिलाही कल्पना आवडली. मग अजून एक मैत्रीण जॉईन झाली आणि तिची अजून एक मैत्रीण पण येते म्हणाली. आम्ही नावं दिली, पैसे भरले. चार भारतीय बायका बघून की काय, क्लासच्या दोन दिवस आधी फोन आला, की संख्या कमी असल्याने हा क्लास काही होणार नाही. एका मैत्रिणीला याच ठिकाणाहून पूर्वी पण मेकअप चा क्लास कॅन्सल झाल्याचा अनुभव होता, त्यामुळे तिने ओके, ऐसा भी होता है म्हणून सोडून दिलं. आम्ही तिघी बेकिंग शिकून आता दाखवतोच बेस्ट केक अशा हवेतून जमिनीवर आलो.

पण केकचे प्रयोग चालू राहिले. काही वर्षात मग भाषेला सरावलो. जर्मन युट्युबर्सचे व्हिडीओ बघून मग इथे स्थानिक मिळणारे घटक पदार्थ, ब्रँड्स हे समजायला लागले. बेकिंग साठी लागणारं घरातलं सामानही तसं वाढत गेलं. मैद्याऐवजी कणिक, बदाम पूड वापरून, अंड्याचे बिनअंड्याचे प्रकार केले. ओव्हन वरची सेटिंग्ज समजायला लागली. ठराविक पदार्थासाठी ठराविक ब्रँड अशी आवड-निवड होत गेली. लायब्ररीत जाऊन पाककृतींची पुस्तकं आणली, कारण मोठमोठ्या जर्मन पुस्तकांपेक्षा ती सोपी वाटायची, आणि त्यात पारंपारिक पाककृती मिळतील असंही वाटायचं. ते वाचताना नवीन शब्दही समजायचे.

बेकिंग मध्ये प्रमाण अगदी जसंच्या तसं पाळायला हवं. माझं स्वयंपाकात बरंच अंदाजपंचे असायचं, त्यामुळे मग जसे काही प्रयोग जमले, तसे काही सपशेल आपटले. एकदा मफिन करायला घेतले, काहीतरी चुकलं असेल पण सुरूवातीला ते छान फुगताना दिसले. एक मित्र कुटुंब घरी येणार होते, तर त्यांनाही देऊ याचे इमले बांधले आणि मफिन्स जेवढे वर फुगले होते तेवढेच खाली जाऊन बसले. आलेल्या मैत्रिणीने तिच्या केकला एकदा कशी बुरशी लागली होती हे सांगून माझं सांत्वन केलं. एकदा नवर्‍याच्या वाढदिवसाला केक करणार होते. उगाच फसगत नको म्हणून केकचं रेडी मिक्स आणलं आणि सूचनांप्रमाणे बेक केला, केकही अगदी छान जमला. मग आता यावर क्रीमने डेकोरेशन करायचं या विचाराने उचल खाल्ली. हरभर्‍याच्या झाडावर चढून सगळं साहित्य आणलं आणि केक पूर्ण गार होऊ न देता बाहेर काढायला गेले. व्हायचं ते झालंच, त्याचे तुकडे, भुगा सगळं काही झालं आणि माझेही पाय जमिनीवर आले. मग सुरूवातीला वैतागून रडून नंतर तो केक कुस्करून त्याचा बेस केला, त्यावर क्रीम, मग परत केक आणि क्रीम मग फळं (विविध प्रकारच्या बेरीज) असं तिरामिसू स्टाईल ते केलं. हा प्रकार दिसायलाही चांगला झाला आणि खायलाही.

प्रयोगागणिक आत्मविश्वास वाढत गेला. मफिन्स आणि साधे केक जरा जमायला लागल्यावर मग जरा मोठे, घरच्या पार्टी साठी पण केक केले. बेसिक आयसिंग आणि फ्रॉस्टिंगचे प्रकार, ते स्टिफ व्हावं यासाठी काय वापरायचं याबद्दल माहिती मिळत गेली. केकचे लेयर्स कापून मध्ये पण फिलिंग करणे हे शिकायला सुरूवात केली. त्यातलं तंत्र समजलं, तरी सुधारणेला अजून वाव आहे असं ते बघून वाटत राहतं. शिवाय या सगळ्यासाठी नीट वेळ द्यावा लागतो, नाहीतर वेळेवर घाई होते आणि काहीतरी चुकतं. अजूनही केक करताना मनात थोडी धास्ती असतेच. आता केक बिघडण्याचे प्रसंग सहसा घडत नाहीत. पण मग एकेक पायरी पुढची गाठता येईल असं वाटतं आणि त्या दिशेने शिकणं चालू राहतं.

बाहेर गल्लोगल्ली बेकरीज मध्ये अनेक आकर्षक केक दिसतात आणि तेही आवडतात, त्यातून इथे बाकी अनेक गोष्टी घरीच कराव्या लागतात त्यामुळे केक आयता खाता येणं हे सुख असतं. इथल्या चवीची सवय झाल्यामुळे भारतातले बेकरी मधले केक खाताना वेगळं वाटतं, आवडतात दोन्ही कडचे, पण ती जुनी आठवणारी चव आता सवयीची वाटत नाही. अजून ब्रेड करण्याकडे गाडी नेलेली नाही. दोन तीन वेळा खास लादी पाव केले, पण ती मेहनत बरीच आहे असं वाटल्यामुळे तेवढ्यावरच थांबलं. ब्रेड्च्या नवीन रेसिपी वाचताना, बघताना आता ब्रेड करूच लवकर असं ठरवलं आहे.

काफे उंड कुखेन ही जर्मन खाद्यपरंपरेतली महत्वाची गोष्ट. बर्‍याच आज्या खास रविवारी केक करतात. एरवीही इमारतीत कुणाकडे केक होत असेल तर पायर्‍यांवर त्या वासानेच भूक लागते. नाताळच्या आधी तर कुकीज आणि विविध बेकिंगच्या पदार्थांचे वास हमखास येतात.

कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा येतो, पण तोच कंटाळा घालवायला बेकिंगची मात्र मदत होते. आई बाबांसाठी स्वतः केक करताना त्याचं वेगळं समाधान वाटतं. आता केक करताना लेक पण मदतीला येतो. मी अंडी फोडून द्यायची आणि त्याने हॅन्ड मिक्सर फिरवायचं, मी घटक मोजून द्यायचे आणि त्याने ते मिक्स करायचे अशी कामांची विभागणी होते आणि केक जास्तच गोड लागतो. आपणही नंतर ठरवून रविवारी केक पण करायला लागू की काय काही वर्षांनी, असाही प्रश्न मनात येतो. लायब्ररीत मिळणारी पाककृतींची पुस्तकं वाचून, नवीन व्हिडीओ बघून केक आणि बेकिंगचे इतर प्रयोग चालू राहतात. बेकिंग शिकण्याच्या प्रवासातला अगदी लहानसाच टप्पा आहे हा सगळा, पण या प्रयोगांमधून आनंद मिळाला. तो जोवर आहे, तोवर प्रवास चालू राहील.   





 

No comments:

Post a Comment