याआधीचा भाग - जर्मनीतले वास्तव्य - भाग ६ - जर्मन रविवार
जर्मनीतलं वास्तव्य - हॉकेनहाइम
माझ्या काही यापूर्वीच्या लेखांमधून, फोटोंच्या पोस्ट मधून आम्ही सध्या राहतो त्या गावातले, म्हणजे हॉकेनहाइम (Hockenheim) मधले बरेच फोटो मी शेअर केलेत. पायी फिरत जाताना, सृजनला शाळेत सोडताना, कधी सायकलने जाताना ही जागा ओळखीची होत गेली, आपलीशी होत गेली. आज त्यातल्या काही जवळच्या पायवाटांवरच्या अनुभवाबद्दल -
घरातून बाहेर पडलं की डाव्या बाजूला आधी दिसतो एक पूल, त्यामागे लाल कौलांची इमारत जिथे गावातली लायब्ररी आणि एक म्युझियम आहे आणि मग मागे उंच दिसतं चर्च, त्यावरचं घड्याळ. चर्च ही गावाची ओळख, मध्यवर्ती जागा अशी खूण. आणि त्यामागे दिसणारं आकाश, तिथले रंग दर वेळी वेगळे असतात. कधी निळं, कधी त्यावर पांढरे ढगांचे पुंजके तर कधी काळ्या करड्या रंगातले कधीही पाऊस कोसळेल असे ढग. झाडं दिसतात, तीही दर ऋतूत वेगळी. पण हे एक चित्र रोज बघायचं आणि मग त्या त्या दिवशी कसा मूड आहे त्याप्रमाणे कुठे जाऊयात हे ठरवायचं अशी रोजची पायी जाण्याची सुरूवात होते.
पूल ओलांडून पुढे गेलो चर्च कडे, तर सगळं जुनं गाव लागतं, काही सरकारी इमारती आहेत, गावातले बरेच कार्यक्रम होतात तो हॉल आहे. तिकडे सकाळी पायी जाण्यासाठी पावलं सहसा वळत नाहीत. हा जो पूल आहे तो कोणत्या नदीवरचा नाही, लहानसा ओढा म्हणता येईल. पुलाच्या अलीकडेच ओढ्याच्या एका बाजूने गेलो तर तो रस्ता पुढे जातो पलीकडच्या गावात. या रस्त्याने गाड्या नसतात. फक्त पायी चालणारे आणि सायकल वाले. तिथे आधी दोन तीन बाक दिसतात बसायला, हा अनेकांचा कट्टा आहे. या कट्ट्यावर कधी नवमाता बसलेल्या असतात, मुलं स्ट्रोलर मध्ये बसलेली किंवा झोपलेली आणि यांच्या गप्पा किंवा फोन चालू असतात. कधी काही आज्या असतात, ऊन्हात मस्त गॉगल लावून मैत्रिणींच्या गप्पा चालू असतात. कधी वयस्कर लोक असतात.
मग पाण्याच्या एका बाजूला दोन तीन शाळा आहेत आणि पाण्यापलीकडे घरं दिसतात, काही जुनी काही नवीन. पाण्याच्या आजूबाजूने भरपूर झाडं झुडपं आहेत, फुलझाडं आहेत. या पाण्यात भरपूर बदकं आहेत. त्यातली काही अधून मधून बाहेर येतात आणि तुरूतुरू चालत असतात. मी त्यांना चला, सोबतीने जाऊ असं म्हणते, त्यांचा फोटो काढेपर्यंत ते उडून पुन्हा पाण्यात जातात. ठराविक काळात एका जागेवर सगळी पिल्लं दिसतात आणि बद्किणी पण. तो त्यांचा मॅटर्निटी वॉर्ड असंच मी ठेवलेलं नाव. एक करकोचा आहे, तो एकटाच दिसतो अधून मधून. थोडं चालत पुढे गेलो की दोन फाटे फुटतात, एक रस्ता पाण्यासोबत वळतो आणि एक पाण्याकडे पाठ फिरवून दिशा बदलतो. तिथे झाडांचे ओंडके आहेत ठेवलेले, त्यावर बसून या तिन्ही दिशांकडे बघता येतं. इथेच पाण्याचा जो प्रवाह पण दिशा बदलतो, तिथे खळखळ आवाज येत असतो, तो आवाज ऐकत बसावा वाटतो. युट्युब वर मेडिटेशन, शांत वाटावं म्हणून जे व्हिडीओ आहेत, त्यातलं संगीत जसं नादमय आणि सुदिंग असतं तसाच हा आवाज असतो.
मग पाण्याकाठाने पुढे जात राहायचं, एका बाजूला लोकांची गार्डन्स दिसतात (घरं नाही, फक्त गार्डन जिथे लोक आपली भाजीपाला, फुलं आणि इतरही झाडं लावण्याची हौस भागवतात, उन्हाळ्यात मित्र मंडळींसोबत इथेच कट्टे होतात, जेवण आणि गप्पा रंगतात) आणि मग शेतं दिसायला लागतात. या शेतात घोडे चरत असतात. शेतात दूर मोठे गोठे, गोदामं असावीत असं वाटतं, लाकडी ओंडके रचलेले दिसतात, कधीकधी तिथे लोक मशीन वर ते लाकूड कापायचं काम करताना दिसतात. इथून पुढे उंच झाडं जास्त दिसतात. हा रस्ता ज्या गावात जातो तिथलं उंच चर्च दिसायला लागतं. अधून मधून वाटलं तर बसायला बाक आहेतच. इथे आमचं गाव संपतं आणि फक्त हे पाणी, बाजूने जाणारा रस्ता, त्यातले बदक बगळे पक्षी, पाण्यावरचे ठराविक अंतरावरचे काही पूल आणि ऋतूंप्रमाणे बदलत जाणारं दृष्य. हिवाळ्यात पानं गळून गेल्यावर नुसत्या फांद्याच फांद्या असणारी झाडं, वसंतात नव्याने कोवळी पालवी आलेली, नंतर सगळीकडे फुललेली फुलं आणि मग पानगळ होण्यापूर्वी रंगांनी सजून धजून नटलेली झाडं. उन्हाळ्यात काही गुलाबही दिसतात, त्यातल्या काही फुलांचा सहज वास घेऊन पाहिला तर तो गुलकंदाचा गुलाब आहे असं वाट्तं. फुलपाखरं खूप असतातच, पक्ष्यांची किलबिल अखंड ऐकू येते. तिथून चालताना सृजन सोबत असेल, तर तो आम्हाला हळू बोला असं सांगतो, कारण पक्ष्यांना आपल्या आवाजाचा त्रास होइल म्हणून. अर्थात इतकं काही ते पाळता येत नाही, पण त्याला हे जाणवतं हेही सुखावणारं असतं.
ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये रस्त्याच्या कडेने अनेक आकाराचे मश्रुम्स दिसतात. पाऊस असेल किंवा नुकताच पडून गेला असेल, तर प्रचंड प्रमाणात गांडूळं दिसतात. पण पुन्हा दोन तासात सगळं कोरडं झालं की सगळे गायब होतात. याशिवायही बरीच जीवसृष्टी या ओढ्यात आणि आजूबाजूच्या झुडपात नांदते, असे माहितीफलक दिसतात. नशीबाने त्यात सापासारखे जीव नाहीत, नाहीतर मी सहज तिकडे फिरकलेच नसते. ऑक्टोबर आला की हिरवा पिवळा आणि लाल असे सगळे रंग दिसतात. हिरव्या झाडाच्या खोडाचा आधार घेऊन चढलेला लाल पानांचा वेल असतो. लोकांच्या गार्डन मध्ये खरे-खोटे भोपळे दिसायला लागतात. कधी तिथेच झाडाला लागलेला मोठ्ठा भोपळा सहजपणे पेलणारा भोपळ्याचा वेल पण दिसतो. हिवाळ्यात लवकर अंधार पडतो, पण मग एकेका घरात नाताळची तयारी म्हणून दिव्यांच्या माळा दिसायला लागतात.
निळं मोकळं आकाश असेल तर अनेक सतत विमानं दिसत राहतात. विमानं गेल्याच्या खुणा म्हणून कितीतरी पांढरे पट्टे दिसतात इकडून तिकडून. लहानपणी कधीच विमान बघायला मिळालं नाही, तेव्हा आम्ही गच्चीत झोपायचो आणि एक विमानाचा दिवा दिसायचा, ते नागपूर-मुंबई विमान होतं असं नुसतं ऐकून होतो, खरं खोटं माहीत नाही. पण ती विमानं बघून बुलढाण्याच्या गच्चीतली ही आठवण येतेच. अनेक पॅराशूट्स, हॉट एअर बलून हेही दिसतात, मुख्य उन्हाळ्यात. कधी खूप धुकं असतं, दहा फुटांवरचं दिसत नाही. पण बदकांच्या पंखांचे फडफडण्याचे आवाज येतात. वरून एखादा कावळा पण असतो, संध्याकाळच्या वेळी पक्ष्यांचे थवे दिसतात. या भागात बर्फ क्वचित पडतो, पहिल्याच वर्षी तेही दृष्य बघायला मिळालं.
चालणारे लोक दिसतात त्यात बहुतांशी जर्मन भाषिक असले, तरी बरेच इतर भाषा बोलणारेही असतात. मग त्यांच्या बोलण्यावरून तुर्किश की रशियन की पोलीश असा विचार मनात येतो. मला यातल्या कोणत्या भाषा येत नसल्या तरी आता कानांना अंदाज आहे, आणि त्यावरुन तर्क लढवायला मजा येते. अगदी लहान बाळ, एक अजून मोठं मूल आणि शिवाय कुत्रा घेऊन फिरणार्या बायका बघून प्रत्येक वेळी कसं जमतं यार यांना असं वाटतं. सत्तरीच्या वाटणार्या आज्या जेव्हा सायकल वरून जाताना दिसतात, तेव्हा त्यांच्या फिटनेस बाबत कमालीचं कौतुक वाटतं. शाळेची वेळ असते तेव्हा पायी आणि सायकलने मोठी दप्तरं घेऊन जाणारी अनेक मुलं मुली दिसतात. ओढ्याच्या काठाने एका ठिकाणी एक भिंत/कठडा आहे. यावर करोना काळात लोकांनी सुंदर रंगवलेले दगड ठेवले होते, मनोबल वाढावे म्हणून. बरीच लहान शाळकरी मुलं यावरूनच चालत येतात. थोडी मोठी मुलं शाळेच्या ब्रेक मध्ये इथेच बसतात. कुत्र्यांना चालायला घेऊन जाणारे अनेक जण असतात. कुत्र्यांच्या नैसर्गिक विधींसाठी पिश्व्या ठेवलेल्या असतात, ज्या घेऊन मालकांनी सगळं स्वच्छ करून ठेवणं अपेक्षित असतं. नव्वद टक्के वेळा लोक पाळतात. कुत्र्यांना आत पाण्यात सोडू नका अश्या सूचना असल्या, तरी काही जण ते ऐकत नाहीत, पण प्रमाण कमी. लहान मुलं त्या पाण्यात दगड टाकण्याचे खेळ खेळतात. एखादं लहान बाळ नुकतंच चालणं शिकून तिथे इवलीशी पावलं टाकत असतं. काही थोडी मोठी मुलं तिथेच सायकल शिकत असतात. एक आजी तिच्या नवर्याला व्हीलचेअर वर बसवून तिकडे फिरवून आणत असते. काही ओळखीचे चेहरे दिसतात तेव्हा जुजबी बोलणं होतं, अनेक अनोळखी लोक सुद्धा हॅलो म्हणजेच 'हालो' म्हणतात, सवयीने आम्ही पण स्वतःहून म्हणतो. इथूनच अजून काही पायवाटा घेतल्या तर शेतातून जात मग वेगळ्या रस्त्याने पुन्हा आपण गावात पोचतो. चालताना मधूनच चर्च मधल्या घंटेचा आवाज येतो, आपोआप डोक्यात मग किती वाजले याचे हिशोब होतात. इथून अगदी जवळ फॉर्म्युला वनचा रेसिंग ट्रॅक आहे, तिथून गाड्यांचे आवाज पण येत असतात.
ही झाली एक बाजू. घरापासून पुलाच्या दुसर्या बाजूला गेलो की आधी एक रस्ता लागतो, जिथे बेकरी, पिझ्झा शॉप्स, भाजीचं दुकान, पोस्ट, औषधांचं दुकान, हेअर सलून, काही दवाखाने, इन्शुरन्स कंपनीचं ऑफिस असं सगळं आहे, ती गजबज जाणवत नाही कारण फक्त तो रस्ता क्रॉस करायचा, तिथून पुढे गेलो की पुन्हा एका बाजूला लोकांची मोठी गार्डन्स, त्यात लावलेला भाजीपाला, फुलझाडं आणि या रस्त्यांवर कमान दिसावी अश्या फांद्या पसरलेली काही झाडं. आणि मग दोन तीन मोठे पार्क्स. पूर्ण हिरवळ आणि शांतता, आणि एक पायी आणि सायकलस्वारांसाठी रस्ता. गाड्या नाहीत. गावात एक तंबाखू म्युझियम आहे, त्याबद्दलचे काही पुतळे या एका पार्क मध्ये आहेत. एका पार्कात एक एम्फी थिएटर आहे, तिथे मागे कारंजे आणि पुढे खुर्च्या. इथे कधीच कुणी दिसलेलं नाही आजवर, पण हे बघून कोणत्याही कलाकाराला इथे नाटक करायला किती आवडेल हे नेहमी वाटतं. अजून एक रस्ता क्रॉस करून वेगळ्या पार्क मध्ये आलो, की पलीकडून ट्रेन जातात त्यांचा आवाज येतो अधून मधून. या पार्कात पण तशी गर्दी नसते. लहान पायवाटा दिसतात. लहान मुलांना खेळायला एक जागा आहे, तिथे दुपारनंतर गर्दी होते. तिथेच समोर कारंजे आहेत. बसण्यासाठी बर्याच जागा आहेत. एका बाजूला गावातली जुनी घरं, वर्षानुवर्ष इथे राहिलेले इथले स्थानिक असतील असं त्या घरांकडे बघून वाटतं. यातल्या काही घरांवर नाताळच्या वेळी आकर्षक आणि मोठ्ठी रोषणाइ केलेली असते.
या जागेच्याच प्रेमात पडलो होतो आम्ही पहिल्यांदा हे घर बघायला आलो तेव्हा. तेव्हा तर लॉकडाउन होतं, वर्दळ नसायचीच फारशी, पण या ओढ्याच्या आजूबाजूने कुठेही गेलो की बरं वाटायचं, पक्ष्यांचे आवाज यायचे, लोक दिसायचे. आता रस्ता, जागा, माणसं हळूहळू ओळखीचे होत गेले. कुठे एखादं जुनं घर पाडून नवीन बांधकाम होतं आहे, कुठे नवीन झाड आलं का, ओढ्यातलं पाणी कमी जास्त झालं का, ऊन्हानी गवत खूप वाळलं का अश्या बारीक सारीक बाबींची आपोआप मनात नोंद होत जाते. फोटो काढाव्यात अश्या अनेक फ्रेम्स दरवेळी सापडतात, सूर्याच्या किरणांनी काढलेली नक्षी दर वेळी बदलते. पोर्णिमेचा चंद्र, लखलखत्या चांदण्या आणि पाण्याचा खळखळाट हे फक्त अनुभवायचं असतं. अश्या वेळच्या कितीतरी भावना शब्दातून, कॅमेर्यातून कश्यातूनच व्यक्त होत नाहीत, जे काही मोजकं जमतं ते या लेखातून, छायाचित्रातून मांडावंसं वाटतं, एवढंच.





















No comments:
Post a Comment