Friday, April 21, 2023

Spaghetti Eis - आइस्क्रीमचा अनोखा जर्मन-इटालियन प्रकार

 Eis म्हणजे आइसकीम आणि Spaghetti Eis म्हणजेच नुडल्स फॉर्म मध्ये आइसकीम असं म्हणता येईल. पण हा पदार्थ आला कुठून, कसा याबद्दल  आणि त्या अनुषंगाने त्यासोबतच जोडल्या गेलेल्या इथल्या आइसकीमबद्दलचा हा लेख.

जर्मनीतल्या प्रत्येक गावात किमान एक तरी आइसक्रीमचं दुकान असतंच असतं, कमाल अर्थातच कितीही असू शकतात. ही दुकानं त्या त्या गावातल्या लोकांसाठी अगदी अभिमानाची गोष्ट असते, त्यात ठराविक आवडीची दुकानं पण असतात. आइसकॅफे, आइसडीलं (Eis Diele), आइसथेकं (Eis Theke) अशी याची विविध नावं असू शकतात. यातली बहुतांश दुकानं ही  इथे स्थायिक झालेल्या इटालियन लोकांची आहेत. यापैकी काही जण तर हिवाळ्यात इथलं दुकान बंद करून इटलीत जाऊन राहतात. फेब्रुवारी आला की ही दुकानं उघडतात आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बंद होतात, फार कमी आहेत जी हिवाळ्यात सुद्धा उघडी असतात. हिवाळ्याच्या ब्रेक नंतर दुकान उघडलं की त्यानंतर येणारा पहिला सूर्यप्रकाशाचा दिवस म्हणजे त्या दिवशी प्रत्येकाकडे आइसक्रीमचा कोन दिसायला लागतो. सहसा एक कोन आणि त्यावर तीन आइसक्रीमचे स्कूप्स असं चित्र असलेली पाटी या दुकानाबाहेर कुठेतरी दिसते, बाहेर टेबल खुर्च्या असतात बसायला. त्यातल्या मेन्यू कार्ड वर आइसक्रीमचे फॅन्सी प्रकार दिसतात, ते सगळेच आकर्षक वाटतात. आतमध्ये काउंटर वर वेगवेगळ्या साइजचे कोन आणि कप असतात आणि खाली विविध प्रकारचे आइसक्रीम्स असतात. वाफेल म्हणजे कोन, बेशर म्हणजे कप/वाटी आणि कुगेल म्हणजे एक स्कूप. आपण हवे तेवढे आणि हवे ते आइसक्रीम स्कूप्स घेऊ शकतो, थोडक्यात टेक अवे, किंवा मग तिथेच बसून खाऊ शकतो. तिथे बसून खायला नुसत्या स्कूप शिवाय इतरही बरेच प्रकार असतात, वेगवेगळी फळं, ड्राय फ्रुट्स, फरेरो रोशर सारखी चॉकलेट्स अश्या धर्तीवर एकेक प्रकार असतो, हे सगळं अगदी पोटभरीचं होइल इतके मोठे असतात. त्यासाठी नीट भूक हवी.

आणि या सगळ्यात मुख्यत्वे पश्चिम जर्मनीच्या भागात प्रसिद्ध असलेला प्रकार म्हणजे Spaghetti Eis. नेमका हा प्रकार कुणी शोधून काढला याबाबत मतमतांतरं आहेत, पण मानहाइम (Mannheim) या गावातल्या फोन्टानेला (Fontanella) या आइस कॅफेने पहिल्यांदा हा प्रकार लोकांसमोर आणला असं म्हटलं जातं. त्यांना तेव्हाच पेटंट फाइल करायचं होतं, पण त्यासाठी लागणारी फी खूप जास्त होती म्हणून ते केलं नाही. डारियो फोन्टानेला याने केलेल्या एका प्रयोगात व्हॅनिला आइसक्रीम Spätzlepresse म्हणजेच पोटॅटो मॅशर चा एक प्रकार, ज्यात नुडल्स फॉर्म मिळू शकतो, त्या मधून काढले. पण ते मॅशर रूम टेंपरेचरला असल्यामुळे आइसक्रीम पटकन वितळायला लागलं आणि हवा तो परिणाम झाला नाही. मग त्याने तेही गार केलं आणि हवा तसा इफेक्ट मिळाला. या नुडल्स खाली बेस म्हणून व्हिप्ड क्रीमचा वापर अश्याच काही प्रयोगातून आला. मग पूर्ण इटालियन नुडल्स विथ टोमॅटो सॉस याच्याशी साधर्म्य म्हणून टोमॅटो सॉस ऐवजी स्ट्रॉबेरी सॉस त्यात आला. चीज ऐवजी डेसिकेटेड कोकोनट किंवा किसलेलं व्हाइट चॉकलेट वरून स्प्रिंकल केलं आणि हा नवीन डेझर्ट प्रकार अस्तित्वात आला. असं म्हटलं जातं की सुरूवातीला आइस्क्रीमच्या दुकानात जाऊन हे काय खायचं म्हणून अनेक लहान मुलं नकोच म्हणायची. मग हळूहळू हा पदार्थ लोकांच्या आवडत्या पदार्थात आला आणि आता इथल्या कोणत्याही आइसकॅफे मध्ये याचे इतरही म्हणजे चॉकलेट, किवी असे वेगवेगळे सॉस वापरून केलेले ही अनेक प्रकार आता मिळतात.  तरी शेवटी हा बेसिक स्ट्रॉबेरी सॉस असलेला प्रकारच जास्त आवडीने खाल्ला जातो.

सुरूवातीला आश्चर्य वाटलं होतं, तरी खाऊन बघू म्हणून हा प्रकार एकदा घेतला. त्यावरचं स्ट्रॉबेरी सॉस मला तेव्हा खूप आंबट वाटलं, पण एकूण चव आवडली. 'त्यात काय आइसक्रीम सारखं आइसक्रीम असं कशाला खायचं' असं न वाटता, एक वेगळा प्रकार म्हणून एखाद्या वेळी खाल्लं जातं. लहान मुलांसाठी मिकी माऊसच्या आकारातलं आइसक्रीम वगैरे असे काही प्रकार असतात. त्यावर एक पुन्हा बिस्कीट वाफेल आणि कधी लहान मुलांना त्यावर गमीबेर किंवा रंगीत स्प्रिंकल्स पण टाकून देतात. आइसकीम शिवाय फ्रोझन योगर्ट्स पण मिळतात. पण याच दुकानांमध्ये मिळणारी कोल्ड कॉफी मात्र आम्हाला अज्जिबात आवडली नाही. 

अजूनही थंडी आहे तशी, पण आमच्या गावातलं दुकान मार्च मध्येच उघडलं आहे. इथे कुणीही सर्दी होइल म्हणून आइसक्रीम खायचं नाही असलं काही पाळताना दिसत नाहीत,  दुकान उघडलं की लगेच थोडे तरी लोक आइसक्रीम घेताना दिसतातच आणि वर्षभर सुद्धा लोकांच्या फ्रिज मध्ये आइसकीम असतंच. अगदी लहान मुलांना पण सहज आइसक्रीम दिलं जातं. पण हे अजून आमच्याकडून होत नाही, आम्ही अजूनही खरा उन्हाळा आल्याशिवाय सहसा आइसक्रीम घेत नाही. लवकरच  ऊन वाढेल, मे नंतर मग गजबजून गेलेला रस्ता असेल आणि त्यातल्या अनेकांच्या हातात आइसक्रीम दिसायला लागेल. 

सवयीने आईस म्हणजे बर्फ नाही तर आईस्क्रीम, हे पक्कं डोक्यात बसतं. तसंच उन्हाळ्यात आवर्जून एकदा तरी Sphaggeti Eis खाणं हेही शास्त्र झालं आहे. इतर वेळी चालत चालत साधा एक कोन घेऊन खाल्ला, तरी असं निवांत आइसक्रीम आणि ऊन खात बसणं आमच्यात पण मुरलं आहे. उलट ही Sphaggeti खाताना काटा  शिवाय सहज खाता येते. त्यातून आम्ही एक वर्षभर मानहाइम मध्येच राहिलो असल्यामुळे, या सगळ्याला ओळखीचं आपलं गाव ही एक किनार पण आहे. जरी आता तिथे जाणं फार होतं नाही. तसंही कोणत्याही पॅकेटबंद आइसक्रीम पेक्षा, या दुकानातल्या आइसक्रीमची चव जास्त आवडते, एकतर फ्रेश आणि तो तिथला माहौल वेगळा असतो. तेव्हा उन्हाळ्यात जर्मनीत आलात, तर आईस्क्रीम सोबतच हा खास जर्मन खाद्य संस्कृतीतला नूडल्स आईस्क्रीम प्रकार पण अवश्य खाऊन बघा.






No comments:

Post a Comment