मदर्स डे निमित्ताने, आई बद्दल..
भारतात पुढचा दिवस सुरू झाला आहे खरं तर,, दिवसभर नेमके शब्द शोधत होते, हे शेवटी जसं जमलं ते..
प्रेमळ वगैरे आई आहेच पण कमालीची शिस्तीची आहे..अत्यंत स्पष्टवक्ती, हाडाची शिक्षिका, स्वतःचे स्वतंत्र विचार असणारी, , बरीचशी चारचौघींसारखी पण त्याहून जास्त चारचौघींपेक्षा थोडी वेगळी असणारी..त्या वेगळेपणा बद्दलच जास्त आठवतं नेहमी म्हणून आज त्याबद्दल थोडं..बाकी नंतर कधीतरी..
आई स्पष्ट बोलणारी तर मी भिडस्त (निदान होते पूर्वी खूपच), तेव्हा वेळोवेळी
इतका भिडस्त पणा काही योग्य नाही, वाईट पणा घ्यावा लागला तरी चालेल पण बोलून मोकळी होत जा, घाबरून राहू नकोस हे सांगणारी, तसं स्वतः वागून दाखवणारी..त्यातून काही चुकलं तर तेवढ्याच सरळ ते मान्य करून पुढे जाणारी..
केवळ मुलगी आहे म्हणून हे यायला हवं, ते यायला हवं असं न सांगता पहिले स्वतःच्या पायांवर उभं राहायला प्रोत्साहन देणारी..
मला सुरुवातीला स्वयंपाक येत नव्हता पण माझ्या पेक्षा जास्त आत्मविश्वासाने वेळ येईल तेव्हा नक्की निभावू शकशील असं मला सांगणारी (हे अगदीच खरं ठरलं हे आता मी सांगू शकते)
कष्टाला कधीही कमी पडू नकोस, काम कमी जास्त कोणतं समजू नकोस, पण अपयश आलं तरी घाबरु नकोस, आम्ही आहोत हे सांगणारी..
तुझ्या कष्टांची किंमत केली जात नाही असं होत असेल, ऑफिस असू दे किंवा एखादं नातं, ते सहन करू नकोस हे सांगणारी..
स्वतः जबाबदारी घेणारी आणि मोठी होत असताना वेळोवेळी मलाही ते शिकवणारी..
आई म्हणून घ्यायचे ते कष्ट घेतलेच तिने, त्याबद्दल खूप लिहिता येईल, पण तिची स्वतःची शिक्षिका, स्त्री म्हणून ओळख पण सदैव जपणारी...
माझ्या वर लाख प्रेम केलं असेल तरी तिच्या अनेक विद्यार्थिनी आणि कित्येकांना लेकी सारखा जीव लावणारी..
लहान सहान बंधनं घातली मला तरी त्याहून जास्त मोकळीक पण देणारी..
शिक्षणासाठी बाहेर पडताना काळजीने आणि प्रेमाने माझी सोय बघताना पैशांचा विचार न करणारी, पण तरी घराबाहेर राहून टक्के टोणपे खाऊन मिळणारे अनुभव लाख मोलाचे असतात हे सांगणारी...
एखादा निर्णय घेताना तुला खात्री असेल पण माझं मत वेगळं असेल, तर मला विरोध केलास तरी बेहत्तर, पण निश्चय सोडू नकोस असं सांगणारी...
आणि हे झालं तरीही मी खात्रीने तुझ्या पाठीशी असेन असा विश्वास देणारी..
मुळात विचारपूर्वक पण खूप घोळ न घालता निर्णय घेऊ शकणारी...काही वेळा अतिशय अवघड निर्णय सुद्धा घ्यावे लागतात हे जाणून असणारी..त्याचे बरे वाईट परिणाम स्वीकारणारी...
कधीतरी भावनेच्या भरात अती वाहवत जाऊन मग माझी बोलणी खाणारी आणि शेवटी स्वतःच गोष्टी निस्तरणारी...
काही बाबतीत अजिबातच कुणाचं काहीच न ऐकणारी... ;)
लहानपणी कधी कौतुक केलं नाही, पण आता मधुराची आई म्हणून कुणीही ओळखलं की प्रचंड अभिमानाने आणि कौतुकाने मला ते ऐकवणारी...
जेवढी हळवी, निराश होणारी त्याहून कैक पटीने लढाऊ वृत्तीची, अत्यंत strong असणारी...
आता दूर राहून सुद्धा मला तेवढाच भक्कम आधार देणारी...
सृजन बघ हट्टीपणा करतो हे तक्रारीचे सुर पण तिला ऐकवले जातात आणि त्याचं भरभरून कौतुक पण पहिले तिलाच ऐकवलं जातं...मन मोकळं करायला ती असतेच आणि कधी माझ्या उद्वेगाचा निचरा करायला सुद्धा, मला जेवढी ती प्रेमाने समजावून सांगते तेवढीच परखड पणे तुझं चुकतंय हेही सांगते...
जेव्हा मी थोडी खारीच्या वाट्या एवढी का असेना, कुठे लढते, झगडते, कधी थोडा चाकोरी बाहेरचा विचार करते, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी आई कडून यातलं बरंच काही आलं हे नेहमी जाणवतं...त्यात पुन्हा आमच्या पिढ्यांची तफावत म्हणून मतं वेगळी असू शकतात, पण मला स्वतंत्र विचार करायला शिकवण्यात आईचा फार मोठा वाटा आहे हे नेहमी जाणवतं..जेवढे मला आईच्या हातचे काही पदार्थ खायला आवडतात, तेवढेच खूप वेगवेगळ्या विषयांवर तिच्याशी चर्चा करायला पण आवडते, हे विषय अत्यंत फालतू ते सखोल चिंतन, इतिहास, वर्तमान आणि भविष्य काळ असे कोणतेही असू शकतात आणि ते तिच्याशी मोकळे पणाने बोलता येतात ही आमच्या नात्यातली अत्यंत आवडती गोष्ट..
हॅपी मदर्स डे आई, हा माझा खूप आवडता जुना, सृजन एक महिन्याचा होता तेव्हाचा एक फोटो, खास आजच्या साठी :)
#mothersday
No comments:
Post a Comment