माझे आजी आजोबा तर खास खामगावला चांदी खरेदीसाठी यायचे पूर्वी. आणि बर्याच प्रसिद्ध सेलिब्रेटींमध्येही खामगावची चांदी प्रसिद्ध आहे असं ऐकलं होतं. शिवाय ती चांदी इतरांपेक्षा उत्तम आहे अशी पावती आमच्याच नातेवाईकांनी दिलेली आहे. जिल्हास्तरीय काही सरकारी कार्यालयं बुलढाण्यात नसून इथे आहेत, कारण कदाचित दळणवळणाच्या दृष्टीने जास्त सोयीचे वाटले असेल तेव्हा.
लोणार - उल्कापाताने झालेलं जगातलं तिसरं मोठं सरोवर. ही ओळख तशी आता बरीच प्रसिद्ध होते आहे. आता युट्यूब वर पण बरेच चांगले व्हिडिओ उपलब्ध आहेत. याशिवाय इथे एक गोमुख आहे जिथून अखंड पाण्याची धार येत असते आणि ती कधीही बंद होत नाही, पहिल्यांदा कधीतरी गेल्या चार पाच वर्षात एकदा बंद झाली होती असं ऐकलं. या पाण्याचा उगमस्त्रोत माहीत नाही. (या जागेची दुरावस्था केली आहे लोकांनी मात्र) अजून एक म्हणजे इथे एक विहीर आहे, जिला सासूसुनेची विहीर म्हटलं जातं, अर्धं पाणी गोड आणि अर्ध खारट आहे असं म्हणतात. इथे अनेक हेमाडपंथी मंदिरं पण आहेत.
मलकापूर - आमच्या साठी सगळ्यात जवळचं रेल्वे स्थानक. आणि त्यामुळेच तसं चांगलं कपडा मार्केट सुद्धा. मलकापूर आणि शेगाव ही दोनच रेल्वे लाईन वरची गावं. बाकी मुख्य सगळी एस टी च.
नांदूरा - इथला खवा प्रसिद्ध होता आणि एक जण तो घरी घेऊन यायचा हेच आठवतं. आणि आता तिथे एक मोठ्ठी हनुमानाची मुर्ती झाली आहे, जी रेल्वेतून पण दिसते म्हणे. एवढीच तशी ओळख.
शेगाव - गजानन महाराज मंदिर. याबद्दल फार काही सांगायची गरज नाही. मी अजिबातच मंदिरं, धार्मिक स्थळं यात रमणारी नाही, पण इथे इतकं प्रसन्न वाटतं. शांत वाटतं या मंदिरात खूप. भाविकांची इतकी उत्तम सोय आहे, सेवेकरी पण खरंच मनापासून सेवा देणारे आहेत. मंदिराचे व्यवस्थापन खरोखर छान आहे.
सिंदखेड राजा - राजमाता जिजाऊंचं माहेर, जन्मस्थान, लखुजीराजे जाधव यांचं गाव. गेल्या काही वर्षात तिथला वाडा वगैरे बराच चांगला केला आहे आणि यापुढेही हे जतन केलं जाइल असं वाटतं.
इतर गावांची म्हणजे चिखली, मेहकर, संग्रामपूर यांची मला खूप माहिती नाही म्हणून फार लिहू शकत नाही. याशिवाय काही प्रसिद्ध व्यक्ती / संस्था
ताराबाई शिंदे - स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहीणार्या ताराबाई शिंदे ही ओळख इतिहासाच्या पुस्तकात होती. दुर्दैवाने त्यापेक्षा अधिक माहिती नव्हती . गेल्या वेळी जुन्या गावात गेले तेव्हा त्यांच्या घरावर आता पाटी आहे निदान की त्या इथे राहायच्या म्हणून.
बुलडाणा अर्बन - हे नाव गेल्या काही वर्षात अनेकांनी ऐकलं, वाचलं असेल. अगदी लहान पातळीवर चालू झालेली ही बँक, आता सगळीकडे विस्तारली आहे आणि मुख्य म्हणजे बुलढाण्याचं नाव बर्याच ठिकाणी माहीत होण्यात यांचा बराच वाटा आहे. अनेक धार्मिक स्थळी बुलडाणा अर्बन तर्फे जी राहण्याची सोय आहे, ती चांगली आणि स्वच्छ आहे, असं ऐकलं आहे.
निषाणी डावा अंगठा हा चित्रपट पाहिला आहे का? ते पुस्तक लिहीणारे लेखकही बुलढाणा जिल्ह्यातलेच आहेत. आणि ते सगळं जे वातावरण घेतलं आहे ना त्यात, ते अस्सल त्या ठिकाणचं खरं वाटतं. त्यामुळे माझा आवडता चित्रपट.
माझे बाबा १९८० साली बुलडाण्यात आले, १९८५ मध्ये आई आली. या गावातली माणसं ही माझ्या जीवनात अविभाज्य आहेत. आमचे कोणतेच नातलग नव्हते बुलढाण्यात, पण एक तरी अक्खा परिवार आहे. आजी, मावशी, मामी अशी अनेक नाती इथेच नव्याने बनत गेली आणि आजतागायत तशीच जिवाभावाची आहेत. सृजनला अजूनही या आजोळी जायला मिळतं, तिथे राहायला मिळतं, त्याचे आजी आजोबा आहेतच, पण हे गाव अनुभवता येणं ही गोष्ट मला प्रत्येक बुलढाणा ट्रिप वेळी समाधान देऊन जाते.
चिखली मार्गे येताना केळवद नामक अगदी लहान खेडं दिसतं. आणि खामगांव कडून येताना भादोला हे गाव लागतं. ही गावं म्हणजे आता बुलढाणा जवळ आलं याची ती एक खूण. ही गावं माझ्या मनात इतकी पक्की बसली आहेत (फक्त एस टी मधून बघून हां, प्रत्यक्षात मी कधीच गेले नाही तिथे) की युरोपातल्या अनेक गावांना मी केळवद आणि भादोला म्हटलं आहे, केवळ चेहरामोहरा बघून. बराच फरक असला तरी कहीतरी आठवणी जुळतात आणि जुनी गावं आठवतात. शिवाय मेहकर मध्ये अगदीच सगळे चढ उताराचे रस्ते होते हे आठवणीत आहे, त्यामुळे इथेही मी अश्या गावांमधून जाताना हे मेहकर आलं म्हणते. आत्ता आम्ही राहतो त्या हॉकेनहाइम ला मी बुलढाणा केलं आहे. म्हणजे इथे बर्लिन, म्युनिक अश्या मोठ्या शहरात गेलो की मला पुण्या-मुंबैत आल्यासारखं वाटतं, आणि हॉकेनहाइम मधलं लहान गावाचं वातावरण, अनेक लोक, दुकानदार ओळखीचे असणं हे बुलढाण्यात घरी आल्यासारखं वाटतं. रेफरन्स म्हणून माझी सगळी गावं ही माझ्या लहानपणचीच असतात.
तर असं हे माझं बुलढाणा. जन्मापासून वयाची सतरा वर्ष तिथे राहिले, मग बाहेर पडले, जाणं येणं होतंच, आता तर कायमस्वरुपी भारताबाहेर आले, तरी अजूनही तेवढंच जिव्हाळ्याचं आहे बुलढाणा आणि तिथले लोक. आता खूप बदल झालेत, दर वेळी आता ओळखू न येणाऱ्या अनेक जागा दिसतात, तरी सुद्धा तिथे जावंसं वाटतंच. अजून जे काही लिहायला नंतर आठवेल, तेव्हा पुन्हा लिहेन. पण तोवर ही तीन भागातली बुलढाणा ओळख समाप्त.
No comments:
Post a Comment