परवा घरात गप्पांमध्ये विषय निघाला, तेव्हा लक्षात आलं, की आम्ही घरी राहत होतो, त्यापेक्षा जास्त वर्ष आता आम्ही घराबाहेर राहतो आहे. सतरा वर्षांची होते पुण्याला शिकायला गेले तेव्हा, आता त्यानंतर एकवीस वर्ष झाली घराबाहेर आहे. घरी नेहमीच जात असले, अजूनही ते घर 'घर'च असलं, तरी ते सुरक्षित वातावरण वेगळं, तिथे मुख्य भूमिकेत आई बाबा असतात. पण बाहेर पडल्यावर आई बाबांनी कितीही आधार दिला, तरी मुख्य भूमिका आपल्याला करावी लागते. आता लढाया आपल्यालाच लढायच्या आहेत, जबाबदारी निभवायची आहे हे सतत डोक्यात असतं.
या सगळ्या गप्पांमधून मागच्या वर्षीच्या काही गोष्टी आठवल्या.
मागच्या वर्षी सृजनला उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या, तेव्हा त्याला मी रोज स्विमिंग क्लासला घेऊन जायचे. ठरलेल्या वेळेच्या दहा मिनिट आधी सगळे पालक मुलांना घेऊन यायचे. शिवाय आधीच्या बॅच मधल्या मुलांना घ्यायला आलेले पण असायचे. रोजच्या त्या १०-१५ मिनिटात कुणाशी गप्पा मारत, तर कधी फक्त सगळ्यांच्या गप्पा ऐकण्यात वेळ जायचा. त्यावेळचा एक प्रसंग - एका मुलाच्या आईने तिथल्या दुसऱ्या एकीला जाऊन विचारलं, की मला ना तुझा चेहरा खूप पाहिल्यासारखा वाटतो आणि तू या शाळेत होतीस का? नाव आठवत नाही पण असं वाटत आहे. योगायोगाने तिचा अंदाज बरोबर निघाला, मग त्या दोघींच्या "तुला ती ही आठवते का? ती दुसरी माझी शेजारीणच आहे" वगैरे गप्पा झाल्या. एक आजोबा त्यांच्या नातवाला घेऊन यायचे, त्यांच्या गप्पांमधून ते आजोबा इथेच जन्माला आले, वाढले, शाळा इथेच आणि स्विमिंग पण इथेच शिकले असे विषय ऐकू यायचे. जेवढे इथले स्थानिक लोक ओळखीचे होत गेले, तेवढे त्यांच्या बोलण्यात पण असेच संदर्भ यायचे. हे सगळं आमचं २२-२३ हजार लोकसंख्येचं, आणि आजूबाजूची काही ८-१० हजार लोकवस्ती असलेली अजून लहान गावं अश्या पंचक्रोशीत.
तर त्या पालकांच्या गप्पा ऐकताना माझ्या मनात असंख्य विचार यायचे. माझा बुलढाणा ते इथपर्यंत झालेला सगळा प्रवास डोक्यात घोळत असायचा. कधी ते सगळं ऐकून काही क्षण जरा उदास वाटायचं, मागे सोडून आलेल्या अनेक गोष्टी, आठवणींच्या रुपात डोळ्यासमोर यायच्या. काही वेळा त्यातले संघर्ष, कठीण दिवस याही आठवणी असायच्या. काही वेळा या लोकांचा हेवा वाटायचा. इथे चांगलं शिक्षण, विविध प्रकारच्या नोकऱ्या, वैद्यकीय सुविधा हे सगळं जवळपास उपलब्ध आहे, त्यामुळे आपसूक लोकांचा भर हा आपल्या कुटुंबाजवळ, माहितीच्या, ओळखीच्या ठिकाणीच सेटल होण्याचा असतो. त्यात काही गैर नाही.
पण या सगळ्या पलीकडे आपण इथपर्यंत पोचलो, नवीन देश, भाषा सगळं आपलंसं केलं, इथे पाय रोवून उभे राहिलो, आपल्या परीने जे जे निभावलं त्याचा अभिमान पण वाटायचा. कारण कंफर्ट झोन सोडून राहताना मिळालेले विविध अनुभव आणि त्यातून आज घडलेलो आम्ही, आमचा दृष्टिकोन, बदललेल्या विचारधारा, रुंदावलेल्या कक्षा हे सगळं आम्हाला फार जवळचं वाटतं. पुण्यात पहिल्या वर्षी प्रचंड भांबावून गेलेली, सतत धडपडणारी मी, घरच्यांची आलेली आठवण, बोचलेले प्रसंग हे सगळं घडलं. पण त्यापेक्षा त्यातून काय मिळालं हे जास्त महत्त्वाचं होतं, आहे. त्या साठी सगळं 'वर्थ इट' असंच वाटतं. तसे समाधानाचे प्रसंग पण अनेक वेळा अनुभवता येतात. योगायोगाने परवाच शेजाऱ्यांशी झालेलं संभाषण, पुन्हा त्याच विचारापाशी जाऊन रेंगाळलं.
परवा मी संध्याकाळी बाहेर गेले होते, तेव्हा बेल वाजली. शेजारच्या एक काकू होत्या (काकू हे आम्ही आमच्यात म्हणतो फक्त). आईने त्यांना सांगितलं की ती बाहेर गेली आहे. मी परत आल्यावर मग त्यांची बेल वाजवली. तर 'आम्ही आता ३ आठवडे ट्रिपला जाणार आहेत, तेव्हा तुम्ही झाडांना पाणी द्याल का आमच्या ?' हे विचारण्यासाठी त्या आल्या होत्या. या आधी पण काही वेळा आम्ही हे केलं आहे, पण फक्त गार्डन मधून जाऊन. आता यावेळी घरात पण खूप झाडं आहेत, ती उद्या दाखवून ठेवते म्हणजे मग पाणी देऊ शकाल हे त्या म्हणाल्या. खूप वेळा थँक्यू झालं, मी पुन्हा एकदा 'त्यात काय एवढं, आम्ही पण मागे झाडं तुमच्या घरात ठेवली होती, करू की आम्ही' असं म्हणाले. दर वेळी ते ट्रिप वरून येताना आमच्या साठी काहीतरी आणतात. आता आलो की आमच्या गार्डन मध्ये एकत्र भेटू जेवायला, कधीपासून आपण बाहेरच भेटतो आहे असं म्हणाले. दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे त्यांनी आतली झाडं दाखवली, त्यांना प्रवासाच्या शुभेच्छा देऊन, त्यांच्या किल्ल्या घेऊन मी घरात आले, तेव्हा पुन्हा तो या घरात आलो तो पहिला दिवस आठवला. अशी काय ओळख आहे आमची, की इतक्या विश्वासाने त्यांनी घराच्या किल्ल्या आमच्याकडे द्याव्या? म्हटलं तर आम्ही बाहेरच्या देशातून इथे आलेलो. त्यांनीच आम्हाला गवत कापायला शिकवलं होतं. आजवर आमच्या भेटी बहुतांशी गार्डन मधून, इमारती बाहेर कॉमन एरियात झाल्यात. आम्ही त्यांना आंबे दिले, कधी त्यांनी सृजनसाठी चॉकलेट दिले अशी देवाण घेवाण झाली असं सगळं. पण कोणतेही किंतू परंतू त्यांनी आणले नाहीत. मला पुन्हा ते मागच्या वर्षीचे प्रसंग आठवले. वर्षानुवर्ष ओळख असणारे लोक बघून, आपण इथे त्यामानाने नवखे, वेगळे असं वाटलेले क्षण. आणि 'हे विश्वची माझे घर' याची पुन्हा झालेली जाणीव.
आमचं स्वतःचं घर झालं तेव्हा एक स्वप्न पूर्ण झालं होतं, त्या किल्ल्या हातात घेताना डोळ्यात आनंदाश्रू होते. पण आज तिथेच, शेजाऱ्यांनी आमच्यावर त्यांच्या घराची जबाबदारी दिली तेव्हा, घरापलीकडे आपण बरंच काही मिळवू शकलो असं वाटलं.
जगातल्या कोणत्याही देशात, गावात कुठेही राहणं सोप्पं नसतंच, प्रत्येकाला आपापले संघर्ष असतात. त्यात जर आपण असे घरापासून लांब असू, तर ते अजून अवघड होऊ शकतं. त्यात अनेक दुखःद अनुभव असू शकतात. पण या अश्या सुखद अनुभवांचं पारडं जड होत राहावं, म्हणजे सीमोल्लंघन यशस्वी होत राहतं.
#जर्मनीतीलवास्तव्य #जर्मनीतलंवास्तव्य
No comments:
Post a Comment