Saturday, May 18, 2024

जर्मनीतलं वास्तव्य - ब्युरोक्रसीच्या गोष्टी - १

इतके लेख लिहिले, त्यात अजून ब्युरोक्रसी बद्दल लिहिलं नाही तर ते वास्तव्य खरं वाटणार नाही, इतकी जर्मन ब्युरोक्रसी प्रसिद्ध आहे. माझा व्हिसा मिळण्यासाठी किती वेळ गेला आणि किती तपासणी झाली, ते खूप पूर्वी लिहिलं होतं. मग इथे आल्यावर जर्मनीच्या व्हिसा सोबत अश्या बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्याला पुजल्या जातात हे आता पूर्णपणे समजलं आहे. 

इथे आल्यावर मोजून काही दिवसात तुमच्या नावाने एका मागोमाग एक पत्र येऊन धडकायला लागतात. व्हिसा एक्स्टेंशन साठी ठीक आहे, पण इन्शुरन्स, टॅक्स, रेडिओ टॅक्स, अमका टॅक्स, तमका इन्शुरन्स अशी यादी मग पुढे लायसन्स, गाडी, त्याची कागदपत्र, त्याचे टॅक्स, घर, भाडे करार, अशी वाढत जाते. सृजनच्या जन्मानंतर काही दिवसात त्याचा टॅक्स आयडी पत्राने घरी आला होता, त्याच्या नावाने आलेलं पहिलं पत्र. पत्रपेटी हा आपल्या घराचा अविभाज्य भाग आहे, अत्यंत महत्वाचा आहे आणि येणारी पत्र नित्यनेमाने चेक करणं हे आद्य कर्तव्य आहे असं इथे इमिग्रेशन करतानाच लिहून घ्यायला हवं. काही नाही तर नागरिकत्व देताना हेही तपासून कसे घेत नाहीत असा प्रश्न पडतो. खास पत्र पेटी चेक करण्यासाठी ठराविक वेळी बाहेर येणे असं करणारी जर्मन वयस्कर मंडळी तर नेहमीच आजूबाजूला दिसतात. 

या आठवड्यात एक अर्ज भरून, त्याला लागणारी सगळी कागदपत्रं घेऊन आमच्या गावातल्या सरकारी कार्यालयात गेले होते. या एकाच ठिकाणी नगरपालिका, फॉरेनर्स ऑफिस आणि अजून बरीच ऑफिसेस आहेत. माझा अर्ज हा खरंतर एका वेगळ्या गावातल्या, विभागीय कार्यालयात प्रोसेस होणार, पण तो आमच्या गावातल्या या कार्यालयात दिला, की तो ते पुढे पाठवतात. तिथे रीतसर अपॉइंटमेंट घेतली होती. घरापासून चालत पाच मिनिटात, जरा वेळे आधीच पोचले. सकाळी आठला बहुतांशी सगळी ऑफिसेस सुरु होतात. मी बाहेर थांबले होते तेव्हाच सगळे कर्मचारी आत जात होते. चौकशी कक्षातल्या बाईला हे ऑफिस कुठे आहे विचारलं, 'अजून दहा मिनिट आहेत मग उघडेन' असं उत्तर मिळण्याची शक्यता जास्त होती. पण तिने चक्क मला वेटिंग रूम मध्ये बसायला दार उघडून दिलं, तेही वेळेआधी. हसून छान बोलली, त्यामुळे मी पुन्हा एकदा आमच्या गावाच्या प्रेमात पडले. छान ऊन होतं म्हणून तिथे बसून एक फोटो पण काढला. माझा नंबर लागलाच आठ वाजता, तिकडे गेले, मोठी रूम होती मस्त, एक तरुण मुलगी बसली होती. काय काम आहे? असा प्रश्न आला. मी हा अर्ज द्यायचा आहे हे सांगितलं, आणि मला फॉर्म मध्ये एक प्रश्न होता, इथे नेमकं काय अपेक्षित आहे असं विचारल्यावर "त्यावर आम्ही काहीच सांगू शकत नाही, आम्ही फक्त हे पुढे पाठवू आणि काही अजून लागणार असेल तर तुमच्या घरी पत्र येईल" असं सांगण्यात आलं. मला हे उत्तर अपेक्षित होतं, पण तरी अपेक्षाभंग होऊन नीट उत्तर मिळेल अशी एक टक्का आशा होती. अपेक्षाभंग असे होत नाहीत. मी पाचव्या मिनिटाला बाहेर आले होते. अपॉइंटमेंट घेण्यात माझा जास्त वेळ गेला असेल असं वाटलं. खास कॅटेगरी आहे प्रत्येक प्रकारच्या अर्जाची ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्यासाठी, त्यामुळे प्रोसेस हीच आहे हे माहीत होतं. माझं काम स्थानिक कार्यालयात झालं, त्यासाठी दुसरीकडे जायला लागलं नाही,  ही चांगली गोष्ट होती, पण मनात अश्या वेळी 'हे एवढं मोठं ऑफिस काय फक्त इकडून तिकडे पाठवायला बनवलं आहे का' हे ही वाटलंच. आता ती काय करणार, ते कागद एका पाकिटात घालणार, ते बंद करून पुढच्या ऑफिसला पोस्टाने पाठवणार. पाकीट आणि पोस्टाचा खर्च माझा वाचला असं म्हणता येईल. मग त्यांच्याकडे पोचल्यावर मला पत्र येईल आणि पत्रातून पुढचे संवाद होतील, अजून काही कागदपत्र मागितली जातील, किंवा त्यात चुका काढल्या जातील, ते बघू. काळ्या पैशांचा टेबलाखालून व्यवहार होत नाही, त्यांची पद्धत फॉलो करत इकडून तिकडे तिकडून इकडे खेळ झाले तरी कामं होतात, पण वेळ किती लागेल हे सांगता येत नाही. 

एका लेखात पूर्ण होईल असं ते कामच नाही. ब्यूरोक्रसी आणि त्या अनुषंगाने विविध ऑफिसेस, कागदपत्रांचे गठ्ठे, आपलं गाव, विभागीय कार्यालयं, याशिवाय टॅक्स आणि त्याचे प्रकार, इन्शुरन्स आणि त्याचं महत्व असे बरेच विषय इथे राहताना अनिवार्य होतात आणि इच्छा असो नसो शिकावे लागतात. त्याबद्दल नंतर कधीतरी...

No comments:

Post a Comment