साल २०१८ असेल कदाचित, जर्मनीत आमच्याच कंपनी मधले आमचे दोन कलीग कामानिमित्त चार दिवस भारतात आले होते. ते जाण्या आधी आम्हाला माहीत नव्हतं, ते परत आल्यावर बोलणं झालं, मला खरंतर उत्सुकता होती, त्यांचे अनुभव ऐकण्याची. ते दक्षिण भारतात एका रिमोट जागी गेले होते, तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था अजिबातच चांगली नव्हती. टॉयलेट टिश्यू मिळणार नाहीत असं त्यांना वाटलं नव्हतं, त्यामुळे पंचाईत झाली वगैरे ऐकलं. पण त्याचा एक प्रश्न मनात घर करून बसला होता, Wie kann Mann eigene Land so schmutzig machen? म्हणजेच माणूस आपल्या देशाला, आपल्या जमिनीला इतका खराब कसा करू शकतो? इतका कचरा तिथे कसा टाकू शकतो? त्याच्या टोन सकट मला तो आजही ऐकू येतो.
प्रश्न खरा होता, आपल्या परीने स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या मला पर्सनली लागला होता. लोक पण काळजी घेत नाहीत आणि सरकार पण कचरा विल्हेवाट यावर काही काम करत नाही अश्या दोन्ही बाजू यात आहेत असं तेव्हा मी काहीतरी त्याला सांगत होते. पण हे वरवर दिलेलं उत्तर होतं, त्याचं बोलणं खोलवर टोचलं होतं. आपण घर नेहमी स्वच्छ ठेवतो, रस्त्यात कधीही कचरा टाकत नाही, पर्स मध्ये सांभाळून ठेवतो असं मी स्वतः लाच समजावलं होतं.
एवढ्यात एक दिवस पुन्हा एकदा ऑफिस कलीग सोबत काहीतरी बोलताना, त्याने गुगल Maps उघडले आणि आम्ही
Virtualley मॅप वरून पुण्यात उतरलो होतो. नेमका तिथे ठिकठिकाणी कचरा, भटकी कुत्री हे दिसत होतं. कचरा टाकू नये असं लिहिलेली ती भिंत होती, मी त्याला ते translate करून सांगितलं तेव्हा भारतीय म्हणून त्याचा खूप त्रास झाला.
आमचं ऑफिस पुण्यात आहे म्हणून आम्ही ते शहर बघत होतो, इतरही ठिकाणी काही वेगळं दिसणार नाही, त्यामुळे यात कुण्या एका गावाचा मुद्दा नाही, आपण देश म्हणून कसे आहोत याचं हे दुर्दैवी चित्र आहे.
आजूबाजूला स्वच्छ रस्ते, ठिकठिकाणी कचरा पेट्या, वेळोवेळी त्यातून उचलून नेला जाणारा कचरा, त्याची विल्हेवाट, कचरा वर्गीकरण आणि प्रवासात बहुतांशी दिसलेली अतिशय स्वच्छ अशी टॉयलेट्स हे सगळं मी गेल्या अनेक वर्षात जर्मनीत आणि आजूबाजूला पण रोज बघत होते.
त्यामुळे दिवसेंदिवस कचरा, स्वच्छता हे सगळं आमच्या नजरेला जास्तच खटकायला लागलं होतं. आपल्याला सवयीच्या झालेल्या कित्येक गोष्टी नव्याने दिसायला लागतात, जाणीवा बदलतात हे होतंच.
त्यानंतर दर वेळी भारत वारीत, एकूणच स्वच्छता, रस्त्यावरचा कचरा आणि सार्वजनिक टॉयलेट्स या तीन बाबतीत कमालीची वाईट परिस्थिती दिसते.
यावेळी नाशिक मुंबई हायवे वर, जिथे सर्व साधारण सुस्थितीतल्या घरातली लोक येतात, अश्या ठिकाणी थांबलो होतो. टॉयलेट पासून दहा मीटर अंतर असेल, तिथूनच भयाण वास येत होता. लोक तिथेच वस्तू विकायला पण बसले होते. कसे बसे टॉयलेट मध्ये जाऊन आल्यावर sanitiser वापरून हात स्वच्छ केले. पुणे नाशिक रस्त्यावर पण कमी जास्त प्रमाणात हेच दिसलं. यावेळी पुण्यात नदी काठच्या रस्त्याने जाताना जो काही कचरा आणि घाण दिसली ती असह्य होती.
बुलढाण्यात तर कचरा न्यायला गाडी येणे हेच मुळात आत्ता सुरू झालं आहे. सध्या जयपूर मध्ये आहे. या चार दिवसात हॉटेल व्यतिरिक्त इतरत्र भयंकर परिस्थिती दिसली आहे.
या चार दिवसात गावात जेवढं फिरलो त्यात कितीतरी उकिरडे दिसले, नाक बंद करून घाणीतून चालत यावं लागलं. थुंकणे हा तर जन्मसिद्ध अधिकार आहे असं प्रत्येकाला वाटत होतं. चोखी ढानी मध्येही टॉयलेट ची अवस्था यथा तथाच होती. नाक दाबून आणि डोळ्यांना काही बघू नका असं समजावत दोन मिनिट काढायची असा प्रकार होता. अश्या ठिकाणी आणि, पुरुषांपेक्षा बायकांचे प्रश्न किती पटींनी वाढतात, त्यांना याचा किती जास्त त्रास होतो हे अजून वेगळं.
आज अमेर फोर्ट बघायला गेलो होतो, तिथे जायला आधी पूर्ण गावातून जायचं होतं. पूर्ण गावात ठिकठिकाणी कचराच कचरा दिसत होता. ही या राज्याची राजधानी आहे, पर्यटन स्थळ आहे. आज बदल म्हणून, आमच्या हॉटेल ऐवजी बाहेर नाश्ता करू म्हणून आम्ही त्या फोर्ट जवळ गेलो, तिथे चांगले रिव्ह्यू असणारं हॉटेल, त्याची बिल्डिंग आणि आत सुद्धा यथा तथाच परिस्थिती होती. तिथे गाडीतून उतरत नाही तर दहा जण आम्ही जीप देतो, गाईड देतो म्हणत जवळ आलेली होती. दहा विक्रेते पण असेच येऊन सरळ टोप्या आमच्या डोक्यावर ठेवत होते, स्पष्ट आणि किंचित आवाज वाढवून त्यांना सृजन पासून दूर केलं. त्या किल्ल्यात ह्याव त्याव, आमच्या राजांनी हे केलं आणि ते केलं म्हणत नुसत्या बढाया मारणारे लोक तिथेच थुंकलेले दिसत होते. तो पूर्ण रस्ताच कोणत्याही प्रकारे राजधानी, पर्यटन स्थळ, ऐतिहासिक वास्तू या कश्याला ही जागणारा नव्हता, उलट अत्यंत disappoint करणारा होता.
पोकळ नारे दिसले सगळी कडे स्वच्छ भारतचे, तिथेच प्लास्टिक बॅग खाणारी गाय उभी होती. परत येताना उबर वरून कॅब बुक केली, त्यातून जे लोक उतरले त्यांनी गाडीत उलटी केलेली होती. ती स्वतः साफ करावी याचा त्यांच्याशी काहीही संबंध नव्हता, ना टॅक्सी वाला त्यांना काही म्हणाला. वरून तो आम्हाला, साईडने बसा की असं म्हणाला. आम्ही भुर्दंड भरून ती कॅब कॅन्सल केली, दुसरी कॅब पुन्हा ज्या रस्त्याने आली, त्यातून दिसलेलं गाव बघून जयपूर दर्शन आता कधीही करणार नाही यावर शिक्का मोर्तब झालं. नुसते झेंडे, मोठमोठे फलक, नेत्यांचे फोटो आणि घोषणा, प्रत्येक सणांच्या शुभेच्छा यातून काहीही साध्य होत नाही.
आता असं नाही की आम्ही फक्त निगेटिव्ह बघतो, त्या किल्ल्यावर जाताना उन आणि लोकांच्या एकूण प्रकाराने वैतागलेला, काहीसा घाबरलेला सृजन तिथे वाद्य वाजवत बसणारे लोक बघून किती छान वाजवत आहेत म्हणाला. आम्ही इतर ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या appreciate केल्या. रस्त्यावर दिसलेल्या बेघर मुलांना बघून पैसे दिले, चांगली सर्व्हिस मिळाली तिथे प्रत्येक ठिकाणी जास्तीचा मोबदला दिला. हॉटेल मधली hospitality एन्जॉय केली.
आताही हॉटेल मध्ये आलो, आंघोळ करून स्वच्छ वाटलं.
पण या सगळ्यातून १५-२०-२५ वर्षांपूर्वी एस टी ने प्रवास करताना लोकांच्या उलट्या, तिथली रात्री बेरात्री जावं लागलेली सार्वजनिक अस्वच्छतागृह, रात्रीच्या वेळी तिथल्या खिडक्यांमधून डोकावणारे लोक आणि त्यांच्या नजरा हे सगळं आठवलं आणि अंगावर काटा आला. बऱ्याच गोष्टी बदलल्या पण स्वच्छता, त्यातही सार्वजनिक ठिकाणची या बाबत अजून अगदीच कमी सुधारणा आहे असं वाटलं. आपल्याला किमान आता हे क्वचित फेस करावं लागतं, रोज हे बघावं लागत नाही अशी जरा सुटकेची भावना पण वाटली.
पण केवळ संस्कृती, इतिहास यातून आपण महान होत नाही. स्वच्छता ही अत्यंत बेसिक गोष्ट आहे आणि त्या बाबतीत आपण नापास आहोत हे खेदाने मान्य करायला हवं. परदेशात सुद्धा अपवाद म्हणून काही अस्वच्छ परिसर, टॉयलेट्स असतात, पण प्रमाण जर १० टक्के असेल तर ते आपल्या कडे खूप जास्त आहे. उत्साहाने एखाद्या ठिकाणी फिरायला येऊन हे सगळं बघून निराशा झाली, आणि पुन्हा कुठे यावं का हा प्रश्न पडला. सृजन ला तर अनेक प्रश्न पडले होते, त्यात स्वच्छता सोडून इतर मुद्दे लिहायला अजून चार लेख लिहावे लागतील. सध्या पुरतं इतकंच...
मधुरा देशपांडे - शेंबेकर
#एनआरआयच्यानजरेतून
#अनिवासीभारतीयत्व
#nripov
No comments:
Post a Comment