या भारतवारीत घरी आणि सगळ्यांच्या भेटी याशिवाय एक ट्रिप करूयात असं ठरवून यावेळी जयपूर मध्ये आलो. भारतात अशी ट्रिप करण्याची पहिलीच वेळ, एरवी विमानतळ ते नाशिक - बुलढाणा आणि पुन्हा विमानतळ यातच भरपूर प्रवास होतो. पण पर्यटन स्थळी अशी ही आमचीही अनेक वर्षानंतरची ट्रिप, सृजनची तर पहिलीच.
आज पहिलाच दिवस, बाहेर कुठेही फिरताना दर दुसऱ्या मिनिटाला रिक्षा वाले येऊन 'कहा जाणा है? हम घुमाके लायेंगे' अश्या ऑफर घेऊन येत असतात. आम्ही नाही म्हणून पुढे जात होतो. सृजनला अजून हिंदी समजत नाही. त्यामुळे तो मग लागली 'ते काय म्हणत होते?' असं विचारतो. मग त्याला समजेल असं त्याला समजावून सांगावं लागतं. बाकी नेहमीच मराठी बोलत असलो, तरी अश्या वेळी कधी कधी जर्मन मधून सांगतो, म्हणजे आजूबाजूच्या कुणाला कळण्याची शक्यता अगदी कमी होते. आणि त्या गर्दीत गोंधळात हे सोपं वाटतं.
पुढे पुन्हा एका ठिकाणी असेच सगळे जण मागे आले, आता रिक्षा लागणार होती म्हणून एका रिक्षात आम्ही खरोखरीच बसलो, बसण्या आधी भाव ठरवून घेतला, रिक्षात बसल्यावर पुन्हा अखंड 'यहा मै लेके जा सकता हूं, आप बताओ, ज्यादा नहीं है पैसे' वगैरे त्याचं सुरूच होतं. अश्या वेळी हे काय चाललंय याबद्दल आई बाबांना काही विचारायचं असेल तर जर्मन मधून विचारायचं हे सृजनने हेरलं आणि आम्ही मग जर्मन मधून बोलायला लागलो.
अजून एक दोन ठिकाणी जाऊन पुढे उबर वरून कॅब करून निघालो. आता आमच्या अगदी जनरल गप्पा सुरू होत्या, पण गरज पडेल तिथे पुन्हा आम्ही जर्मन मधून बोलायला लागलो. थोड्या वेळाने कॅब ड्रायव्हर ने कहांसे हो आप? असं विचारलं. त्याच्याशी आधी हिंदीत बोललो होतोच. आम्ही पण 'महाराष्ट्र से ' असं म्हणून मोकळे झालो. तो काही बोलला नाही, पण 'ऐसी मराठी तो कभी सूनी नहीं हमने, अलग ही है ye' असं मनातल्या मनात म्हणाला असावा. 😂 आम्ही आधीही काही वेळा गरजे प्रमाणे भाषा बदल केले होते, अश्या वेळी भारतीय चेहरे आणि भलतीच भाषा, किंवा अचानक मराठी वरून मारलेली उडी ऐकून लोकांचे एक्स्प्रेशन बघायला पण मजा येते. आपल्याला भारतीय भाषांपेक्षा एखादी वेगळी भाषा येत असेल तर ती अश्याही वेळी उपयोगात येऊ शकते हे लक्षात आलं आणि आम्ही इच्छित स्थळी उतरलो. 😆
ता. क. जर्मनीत घरी आणि इथेही एरवी आम्ही मराठीच बोलतो, पण इथे जर्मन अडी नडीला फार महत्वाची वाटते एवढंच.
#एनआरआयच्यानजरेतून #अनिवासीभारतीयत्व #nripov
No comments:
Post a Comment