साधारण १५ वर्षांपूर्वी, तेव्हा अमेरिकेत असणाऱ्या लोकांचे हॅलोविन चे फोटो पहिल्यांदा पाहिले होते, तेव्हा काहीही काय असतं हे असं वाटलं होतं. जर्मनीत आल्या नंतर सुद्धा इथे या सणाचं तेव्हा एवढं प्रस्थ नसल्यामुळे काही माहिती नव्हती, तेवढा इंटरेस्ट पण नव्हता. एका वर्षी बेल वाजली आणि लहान मुलं süßes oder saures म्हणाली, हे Trick or treat चे जर्मन रूप आहे हे समजायला वेळ लागला, मग घरात होती ती चॉकलेट त्या मुलांना दिली. त्या नंतर पुढची दोन वर्ष मी आठवणीने चॉकलेट ठेवली घरात पण कुणीच आलं नाही. 😃
ऑक्टोबर म्हणजे लाल भोपळे सगळी कडे दिसायला लागायचे, इतके वेगवेगळे प्रकार बघून नवीन पाककृती करून बघणे एवढंच माझं हॅलोविनशी नातं होतं. दुकानांमध्ये ते सगळे कॉस्च्युम दिसायला लागायचे. पण आम्हाला त्यात आवड नसल्या मुळे आम्ही कधी तिकडे फिरकलो नाही.
सृजन पाच सहा वर्षांचा असताना त्या दरम्यान त्याला पहिल्यांदा या हॅलोविन बद्दल समजलं. आम्ही ज्या गावात राहायला आलो तिथे हॅलोविन साजरे करणारे बरेच लोक आहेत असं समजलं. आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये घरोघरी ती कोळ्याची जाळी, ते अक्राळ विक्राळ मुखवटे दिसायला लागले. मग पालकांकडून "या एका भागात खूप उत्साहाने करतात लोक, जाऊन बघा तुम्ही तिकडे" अशी माहिती मिळाली. मला पण हॅलोविन साठी कॉस्च्युम हवा अशी मागणी सृजन कडून आली. आम्हीही उत्साहाने ती पुरवली. अनायसे त्याला एका मित्राने हॅलोविन पार्टी साठी बोलावलं आणि ते सगळे मग घरोघरी फिरत गेले. त्या वर्षी मी आमच्या गावातले हॅलोविन डेकोरेशनचे फोटो पाहिले आणि अवाक झाले. मग मागची तीन वर्ष त्याच्या सोबत आणि त्याच्या काही मित्रांसोबत आम्हीही आता फिरतो. कॉस्च्युम प्रकार काही आवडत नाही, सृजनची हौस तेवढी पुरवतो, तोच ड्रेस नंतर कार्निवल साठी पण वापरायचा अश्या बोलीवर ती खरेदी होते. त्याशिवाय रस्त्याने दिसणारी भुतं ते लाल भोपळ्याचा कॉस्च्युम घातलेली क्यूट लहान मुलं हे सगळं बघत, तासभर एका जवळच्या भागात फिरून परत येतो.
काल ही तसेच गेलो, त्यातला थोडा बिभित्सपणा बाजूला ठेवला, तर बाकी तो माहौल उत्साही असतो. बहुतेकांनी बाहेर आपली कला पणाला लावून भयंकर असे देखावे तयार केले होते, गार्डन मधले चित्र विचित्र सापळे, त्यातून येणारे रंगीत धूर दिसत होते, मधूनच एखादा तिथला लहान मुलगा त्यातल्या एखाद्याचं बटन दाबायचा आणि त्या आवाजाने मग काही जण घाबरायचे. बऱ्याच घरांच्या बाहेर सुरेख carving केलेले लाल भोपळे होते. मित्र मंडळी किंवा शेजारच्या लोकांसोबत, बाहेरच्या गॅरेज मध्ये लोकांच्या पार्टी सुरू होत्या. प्रोजेक्टर लावून घराच्या भिंतीवर चेटकीण आणि अजून कुणाचे लायटिंग केले होते. वरच्या मजल्यावर काहींनी खिडक्या लाल रंगाने रंगवल्या होत्या. मुलांसाठी चॉकलेट होतेच, पण येणाऱ्या जाणाऱ्यांना, मोठ्या लोकांना सुद्धा केक, ब्रेडचे प्रकार असे खाऊ ऑफर करत होते. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या, थंडीत मधूनच त्याच्या जवळ जाऊन ती ऊब मिळाली की बरं वाटत होतं. एरवी थोडे रिझर्व्ह वाटणारे जर्मन लोक सुद्धा निवांत सगळे अंगणात खुर्च्या टाकून, दारं उघडी ठेवून शेकोट्या पेटवून थंडीत गप्पा मारत बसले होते. काही भूतांना बघून लहान मुलं सुद्धा हसत होती इतके ते लूक फसले होते 😂 एका ठिकाणी घरात लहान बाळ आहे, प्लीज बेल वाजवू नका असं लिहून ठेवलं होतं. काही ठिकाणी चॉकलेट संपले होते, ते पुन्हा भरून ठेवणे जर्मनांच्या बाबतीत होणार नाही, अश्या ठिकाणी मुलं उत्साहाने जाऊन मग हिरमुसून परत येत होती.
पुढच्या दोन तीन वर्षात सृजन एकटाच जायला लागेल, तोपर्यंत त्याच्या सोबत हे सगळं बघत भटकण्यात मजा आहे म्हणून आम्ही जातो. हा काही आपला जर्मन सण नाही, अमेरिकन लोकांचा आहे असं इथेही बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. माझ्या भारतीय मनाला अजून हा ' आपला ' सण अजूनही वाटत नाही, पण त्यातला काही भाग बाजूला ठेवून, तटस्थ पणे त्याकडे बघता येतं. ते भोपळे, सजावटी साठी चालवलेली डोकी आणि मुलांचा आनंद, सृजनने नवीन कॉस्च्युमची पाहिलेली वाट आणि त्या कोणत्याही कपड्यात, निरागसच वाटणारा लेकाचा चेहरा 😊 हे अनुभवताना छान वाटतं.
तिथे फिरताना, तिथलं ते वातावरण बघताना उलट दिवाळीच्या आठवणी अजून प्रकर्षाने आल्या. शेजारी, नातलग यांच्या सोबत मिळून मिसळून साजरी झालेली, होणारी..फराळ, खाण्याची चंगळ, देवाणघेवाण करत आणि सगळं उजळवून टाकत दिवाळी आली..काल निंजा झालेला सृजन आज कुर्ता घालून, सध्याचं भाडीपाचं "दिन दिन दिन दिवाळी" हे गाणं म्हणत उत्साहात पूजा करायला तयार झाला होता. फुलं, दिवे, पणत्या सगळी सजावट झाली. फुलबाज्या उडवून झाल्या. हॅलोविन आम्ही बाहेरून अनुभवला, तसे इथले अनेक जण दिवाळी Lichterfest बघत असतील, कदाचित भविष्यात हाही सण इथे सामावला जाईल आणि हा आनंद जगभर अजून जास्त पसरेल. 😊
शुभ दीपावली 🙏 हॅपी दिवाली...ही दिवाळी सगळ्यांना आनंददायी, सुखा समाधानाची जावो..
🪔
No comments:
Post a Comment