Thursday, November 14, 2024

जर्मनीतलं वास्तव्य - ट्रेन मधले अनुभव

पहिल्यांदा जर्मन ट्रेन ने गेले तेव्हा तिथली स्वच्छता, चांगले सीट, या सगळ्या गोष्टी जश्या दिसल्या, त्यात एक गोष्ट फार खटकली होती - पूर्ण ट्रेन मध्ये अनेकांनी आपल्या बॅग, पर्स, पिशव्या या शेजारच्या सीट वर ठेवल्या होत्या आणि गर्दी असताना सुद्धा, लोक डबल डेकर ट्रेन मधल्या पायऱ्यांवर बसले होते, उभे होते पण प्रत्येक बोगीत असे किमान ३-४ सीट होते, ज्यावर लोकांचं सामान होतं. सुरुवातीला बुजरे पणा होता, असं कसं करू शकतात वाटलं पण पटकन काढा बॅग असं म्हणता आलं नाही. शिवाय इथलेच लोक निवांत उभे होते, त्याचं आश्चर्य वाटत होतं. 

मग असे बरेच ट्रेन प्रवास झाले, तेव्हा हे इथे किती कॉमन आहे हे दिसलं. पण हळूहळू बुजरे पण बाजूला ठेवून सामान बाजूला ठेवा असं सांगून जागा मिळवायला शिकलो. खरं तर तेही ' प्लीज बाजूला कराल का सामान? ' असं अत्यंत अदबीने बोलून विचारायचो, काही वेळा मग त्यात "बाजूला ठेवा प्लीज" असा फरक केला, कारण जर ते सीट रिकामं असेल, रिझर्व्ह केलेलं नसेल तर पुन्हा कराल का? कश्या साठी असं काही अनुभवांनी वाटलं. उद्धट पणा नाही पण अति अदब अश्या ठिकाणी नको असं जाणवलं. 

ट्रेनचे प्रवासच गाडी आल्यानंतर कमी झाले, आता कधीतरीच वेळ येते. त्यातही जवळच्या अंतरावर जायचं असेल तर फरक पडत नाही. पण दूर जायचं असेल आणि जागा नसेल तर सांगून मागून घेतो. 

आज पुन्हा ट्रेन मध्ये बसले, तेव्हा गर्दी असतानाही सीट वर अनेक बॅग ठेवलेल्या होत्या. मी एकीला सांगून बॅग काढून जागा मिळवली. थोड्या वेळाने जवळच्या एका काकूंना एकाने जागा मागितली, त्यावर त्यांनी " ओह, मला माहीतच नाही हां, लक्षातच आले नाही" टाईप उत्तर देऊन मग बॅग हलवली. इतक्या वेळात समजलं नाही काही हे उत्तर जरा न पटणारं होतं पण ठीक आहे, जागा दिली. 

मागच्या वेळी रिकाम्या ट्रेन मध्ये आमचीच बॅग ठेवून मी हा फोटो काढला होता, याबद्दल लिहायचं म्हणून, ते आज पुढच्या ट्रेन प्रवासात लिहून झालं. 😃 

#जर्मनीतीलवास्तव्य #जर्मनी

No comments:

Post a Comment