शनिवार सकाळची वेळ, सृजनला क्रिकेट ट्रेनिंग साठी घेऊन निघालो तेव्हा बाहेर किर्र अंधार होता (साडे सात वाजता). भुरभुर बर्फ पडत होता. डोंगराखाली वसलेल्या गावात एका जुन्या इमारतीत असलेला तो स्पोर्ट्स हॉल, सृजनला तिथे सोडून, मग कॉफी घेऊयात म्हणून निघालो तेव्हा झुंजू मुंजू होत होतं. त्या हॉलच्या बाहेरच असणाऱ्या पटांगणात, शनिवारचं फार्मर्स मार्केट भरत होतं, ते लोक सकाळच्या गप्पा मारत दुकान थाटत होते. पुढे जरा चालत गेल्यावर पेट्रोल पंपावर असलेलं दुकान आणि कॅफे बघून आत शिरलो. ऑर्डर देऊन काऊंटर शेजारीच असलेल्या दोनच टेबल आणि उंच स्टूल असलेल्या कोपऱ्यात कॉफी घेऊन बसलो. तिथल्या येणाऱ्या जाणाऱ्यांशी काऊंटर वरच्या काकू गप्पा मारत होत्या. वर्तमानपत्र घ्यायला येणारे लोक होते, काही सिगारेट घेत होते, काही कोणतं मॅगझिन, काही फक्त पेट्रोल भरून त्याचे पैसे द्यायला आलेले. त्यातल्या एकासोबत महागाई किती वाढली आहे अशी त्यांची चर्चा झाली. मग एक जण आला, तो नेहमीचा असावा, काकूंनी त्याला काय हवंय आज? असं विचारलं. त्याने जरा विचार केला आणि फक्त एक कोल्ड्रिंक घेऊन तो निघत होता. खायला नको काही? असा पुन्हा प्रश्न आला. "मला आज बरंच लांब जायचं आहे आणि भूक नाहीये रस्त्यात बघेन काहीतरी" असं त्याने उत्तर दिलं. त्यावर काकूंनी त्याला Brezel (जर्मन ब्रेडचा एक प्रकार) तरी घेऊन जा, भुकेल्या पोटी राहू नये रे" असं अगदी काळजीने सांगितलं. त्यानेही ते ऐकलं आणि पैसे देऊन निघाला. त्यांच्या बोलण्यातून ते केवळ माल खपवायचा म्हणून नाही तर मनापासून आलेलं वाटलं. मग कुणी नव्हतं तेव्हा आम्हीही त्यांच्या सोबत बोलायला लागलो. मघाच्या महागाई वरून विषय पोलंड कडे गेला. पोलंड मधून इकडे जर्मनीत स्थलांतरीत झालेल्या काकू, त्यांची मुलं, देश, नागरिकत्व, निकृत्ती, म्हातारपण अश्या विविध विषयांवर आमच्या गप्पा झाल्या, एकीकडे सराईत पणे दुकानात कामं पण करत होत्या, काही आवरून ठेव, पुसून ठेव वगैरे. येणारे ग्राहक पण बघत होत्या. अधून मधून आमच्या दोघांच्या घरातली कामं, विकेंड ची ग्रोसरी ते पुढची ट्रिप कुठे करावी याही सगळ्या विषयांवर गप्पा सुरू होत्या.
मग आमच्या प्लेट्स घेऊन गेल्या, पण तुम्ही बसू शकता अजून असं आवर्जून सांगितलं. मग तुम्ही भारतातून आलात का? असं विचारलं. माझ्या मुलाचे बॉस भारतीय आहेत आणि त्यांच्या बद्दल तो सांगत असतो वगैरे बोलल्या. वैद्यकीय शिक्षणासाठी विशेष ओळख असणाऱ्या इथल्या युनिव्हर्सिटीत तो काम करतो, प्रामाणिक काम करतो हे कौतुकाने म्हणाल्या. पण त्याच वेळी त्याला माझी मातृभाषा येत नाही याची खंत पण व्यक्त केली. तो अजून पुढे शिक्षण घेऊ शकतो, पण त्याला आता ही नोकरी आवडते आहे तर तेही ठीक आहे, एक वय झालं की पुढे मी काय जास्त सांगू शकत नाही, हरकत नाही असं म्हणत पुन्हा दुकानातली साफसफाई करायला लागल्या. अशी कितीतरी माणसं भेटतात, अनोळखी असूनही मोकळेपणाने संवाद होतात. वेगवेगळ्या प्रांतातली ही माणसं, मुलांचं कौतुक, थोडी त्यांच्या भविष्याची काळजी, मागे सोडून आलेल्या देशाच्या आठवणी या भावना मात्र बऱ्याच सारख्या असतात. आमच्या मनात त्या जागे सोबत काकूंच्या आठवणी कायमस्वरूपी जोडल्या गेल्या. बराच वेळ झाल्यावर त्यांना बाय म्हणून निघालो.
बाहेर आलो तेव्हा चर्चच्या मागून बरोबर सूर्योदय होत होता. चालत पुढे आलो, जुना पण खास युरोपियन चार्म असलेला तो परिसर आणि तिथली घरं, मग एक झाडाचा पार दिसला. त्याच्या पुढे पुस्तकांचं कपाट होतं, इथे गावाच्या मध्यवर्ती जागेत बऱ्याच ठिकाणी अशी कपाटं असतात, पुस्तकांनी भरलेली आणि ज्याला जे हवं त्याने त्यातून घेऊन जावं आणि परत आणून द्यावं अश्या अलिखित नियमानुसार ही यशस्वी पणे चालतात. वेळ होता म्हणून आम्ही पण पुस्तकं चाळत उभे राहिलो. थंडीने हात गारठले होते. सुमेध एक गणिताचं पुस्तक बघत होता, आपल्या आणि यांच्या पद्धती यातले फरक, साम्य, जर्मन नावं सगळी समजत नव्हती, पण उदाहरणं बघून हे म्हणजे बहुतेक आपलं हे असे संदर्भ शोधायला मजा येतं होती.
तेवढ्यात एक काकू सायकल वर आल्या, आधीचं पुस्तक परत ठेवलं आणि नवीन शोधून घेऊन गेल्या. एवढ्या थंडीत साठीच्या आसपास असलेल्या या काकूंच्या सायकल वर येण्याचं कौतुक वाटलं.
शोधता शोधता मला एक इंग्रजी पुस्तक दिसलं, त्यावर बघितलं तर कुणा भारतीयाने तिथे ठेवलं असावं हे लक्षात आलं, कारण प्रिंट भारतातली होती. दर शनिवारी तिकडे जाऊच तेव्हा परत ठेवू शकतो त्या कपाटात, तर त्या निमित्ताने हे पुस्तक घेऊन यावर्षीची वाचनाची सुरुवात करू म्हणून, मनोमन ते ठेवणाऱ्याला धन्यवाद देत मी ते पुस्तक घेतलं. तोवर ट्रेनिंग संपण्याची वेळ झाली, पुन्हा हॉल वर जाऊन शेवटचा गेम बघितला आणि परत निघालो.
कॉफी, बर्फ, पुस्तक, सूर्योदय अश्या खास व्हाईब असलेल्या गोष्टी, आणि वेगवेगळ्या प्रतला वरचे संवाद, हे सगळं काही मनात भरून घेत दिवस सुरू झाला.
No comments:
Post a Comment