काही दिवस वैताग वाणे पण गमतीशीर असतात. तसा नेहमी सारखाच दिवस सुरू झाला, सकाळची घाई गडबड नेहमी असते तशी, मग सृजन शाळेत गेला, सुमेध ऑफिसला आणि मी घरून माझ्या कामाला सुरुवात केली.
दुपारी एक वाजता एक मीटिंग होती, पण ज्याच्या सोबत काम होतं तो आधीच फ्री झालेला दिसला, म्हणून मीटिंग प्रिपोन केली, थोडं काम पुढे गेलं, लंच ब्रेक घेतला आणि पुन्हा पुढे सुरुवात केली. आता मी हॅलो म्हणाले आणि त्या क्षणी बेल वाजली, थांब मी येतेच असं सांगून मी लागली जाऊन दार उघडलं, पार्सल घेतलं आणि पुढे काम सुरू केलं.
आता सगळं नीट सुरू असताना, मी वहीत नोट लिहायला घेतली तेव्हाच शेवटचा घोटभर राहिलेला चहाचा कप कलंडला. मी पुन्हा कलीगला सांगून थांबून दोन मिनिटात ते सगळं पुसून घेतलं आणि पुढे काम सुरू झालं. इतक्या अनेक वर्षात हे असं होण्याची ही मोजून दुसरी वेळ, सगळं लॅपटॉप पासून दूर होतं आणि वहीवर पण काही सांडलं नाही, पण असो.
आता वेळेपेक्षा काम बरंच जास्त लांबलं, सृजन येण्याआधी मीटिंग झाली की मी माझं काम एकटीने पुढे करेल असा प्लॅन होता, सहसा त्याच्या सोबत पाच मिनिट बोलायचं, तेव्हाच कॉफी किंवा चहा घ्यायचा आणि मग पुढे काम करायचं असं एरवी जमतं, पण हे नेहमी शक्य होत नाही. मग ठरल्या वेळी सृजन आला, पुन्हा मीटिंग थांबवून सृजन साठी दार उघडलं, त्याला पटकन खायला करून ठेवलं आहे एवढं सांगून पुढे पुन्हा कॉल वर गेले.
आता ईजा बिजा तीजा झालं, असं वाटण्याच्या नंतर थोड्याच वेळात पुन्हा बेल वाजली 😂 आता कोण पुन्हा म्हणून जरा त्राग्यातच उठले, तर शेजारच्या आमच्या आजीला काही वेळा बाहेरचं मुख्य दार उघडता येत नाही ( तो भला मोठ्ठा दरवाजा आहे) अश्या वेळी ती आमची बेल दाबते आणि मी उघडून देते. एरवी मी शेजाऱ्यांची पार्सल घेणे, आजीला दार उघडून देणे सहज करते, माझी ऑफिसची जागा मुख्य दाराजवळच असल्यामुळे काही वाटत नाही, जेव्हा मी स्वतंत्र माझं काम करत असते तेव्हा फरक पडत नाही. पण आज सलग हे सुरू होतं तेव्हा मलाच कानकोडं झालं. काही वेळा नुसती श्रवणभक्ती असते मीटिंग मध्ये, तसं नव्हतं, उलट फार लक्ष देऊन प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची होती. शिवाय हा कलीग इथल्या शेजारच्या राज्यातला आहे, त्याच्या जर्मन भाषेला तिथला लहेजा आहे जो समजायला अजिबात सोपा नाही, त्यामुळे अजून कान देऊन ऐकावं लागतं होतं.
सृजननेच जाऊन आजीला दार उघडून दिलं पण मी चेक करायला उठून आले, सृजन आला म्हणून ती पूर्ण कौतुक मोड मध्ये होती, त्यामुळे गप्पा मारायच्या होत्या पण मर्फी काकांच्या नियमा नुसार बरोब्बर इकडे आधीच दोन तासात चार वेळा काहीतरी झालं म्हणून मी तिला फक्त हॅलो आणि पटकन बाय करून पुन्हा कामाला बसले.
आता अजून हे संपलं असं नाही, अर्ध्या तासात पुन्हा एकदा बेल वाजली..नशीब एवढंच की सुमेध आता घरी आलेला होता त्यामुळे त्याने जाऊन दार उघडलं आणि माझी मीटिंग पुढे सुरू राहिली. बरं आता होतं कोण, तर आमच्या पाण्याचं मीटर रीडिंग घ्यायला ते लोक बाहेरूनच घेतात, पण त्याला रेंज येईना आणि शेजारी गावाला गेलेत, सो तो आत बिल्डिंग मध्ये आला आणि रेंज मिळाल्यावर दोन मिनिटात परत गेला. अश्या वर्षातून एकदा येणाऱ्या, तेही एरवी बाहेरून परत जाणाऱ्या लोकांना पण आजच कसं यायचं होतं यावर काही उत्तर नाही.
बरं नेमकं बऱ्यापैकी किचकट काम सुरू होतं त्यामुळे त्यानेही हळूहळू डोकं बंद व्हायला आलं होतं. एकीकडे सृजनला आजची परीक्षा कशी झाली, दिवस कसा गेला हेही विचारायला जमलं नाही म्हणून जरा वाईट वाटत होतं. आजी सोबत पण नेहमी प्रमाणे बोलता आलं नाही, पण मी कामात होते हे सांगितलं तर तिला कान कोडं होतं. एरवीच ती नेहमी सॉरी मला त्रास द्यावा लागला म्हणते, त्यामुळे त्याबद्दल काहीच न बोलता, जनरल एक दोन दिवसात तिच्याशी जाऊन बोलून यावं असं मी ठरवलं. इकडे पाच वाजत आले होते, आणि मग आम्ही जे काम करत होतो ती सिस्टीम हँग झाली 😂 तरीही बाकी काही चर्चा करून शेवटी आधीच लांबलेली आमची मीटिंग पण संपवली आणि मग फायनली मी लॅपटॉप बंद केला.
२९-०१-२५
मधुरा देशपांडे - शेंबेकर
No comments:
Post a Comment