Tuesday, July 15, 2025

कपडे वाळत घालणं - एक कला

कपडे वाळत घालणं हे एक काम असलं, तरी ती एक कला आहे असं आम्हाला, म्हणजे मला आणि बाबांना वाटतं 😁. कपडे नीटनेटके वाळत घालणं हे कौशल्य माझ्या बाबांकडून माझ्याकडे आलेलं आहे. बाबा आणि मी याबाबतीत अती चिकित्सक आहोत. त्यामुळे हे काम आम्ही आनंदाने स्वतःकडे घेतलेलं आहे. 

मी लहान होते तेव्हापासून नोकरीच्या वेळेत जमत असेल तर बाबा हे काम करायचे. जमत असेल तर मीही बरेचदा करायचे. आमच्याकडे बुलढाण्याला घरी ज्या मदतनीस होत्या, त्यांचं काम काही बरं नव्हतं पण विश्वासू होत्या. त्या आजी आजोबांसाठी सोबतीला पण असायच्या. मला वेळ असेल तर मी "तुम्ही राहू द्या मी कपडे वाळत घालीन" असं मी त्यांना सांगायचे. मग दर वेळी "मधुरा नादर कपडे वाळत घालती" असं त्या आईला सांगायच्या, नादर म्हणजे चांगले. 😁 कपडे धुण्याचा मला कंटाळा होता आणि वाळत घालायला आवडायचं. 

अर्थात मोठ्ठ्या गच्चीत असलेल्या दोऱ्यांवर कपडे वाळत घालणं हेच सवयीचं होतं. अगदी लहान जागेत उंचावर कपडे वाळत घालणं हे हॉस्टेल लाइफ मध्ये अवघड वाटायचं. एखाद्या घरात कुठेही कसेही लटकणारे लोंबणारे कपडे बघून मनात अजून नीट हवेत हे यायचंच. 😉 बिल्डिंग बाहेर ठिकठिकाणी अस्ताव्यस्त घातलेले कपडे बघून सुद्धा असं वाटायचं. 

पूर्वी परदेशात ड्रायर असतात एवढंच माहिती होतं. सुमेध इकडे आल्यावर मग दुकानात स्टँड मिळतात हे समजलं. उन्हाळ्यात बऱ्याच जणांच्या बाल्कनीत स्टँड बघून, काही ठिकाणी तर अंगणात दोऱ्या बांधून त्यावर कपडे बघून चला आपल्यासारखंच आहे असं वाटलं होतं. पण जागोजागी कसेही कपडे दिसत नाहीत, त्यामुळे बाहेरून बिल्डिंगचा लुक खराब होत नाही. घरगुती फील देणारे तरी व्यवस्थित या दोन्हीत बसणारी ही गोष्ट वाटली, जे मला आवडलं. तरी आपण कपडे दोरीवर घालतो आणि इथे बरेच जण अख्खा कपडा एकाच बाजूने आणि दोरीला चिमटा लावून ते कपडे literally hang करतात, लटकवतात हा फरकही दिसला. 

आता स्वतः ते स्टँड वापरताना सगळी जागा नीट वापरली जावी, त्या कपड्यांची सिमेट्री नीट असावी, दोरीच्या दोन्ही बाजूंना समान भाग यायला हवा असा माझा प्रयत्न असतो. 
हे टोकाचं वाटू शकेल हे मान्य आहे, हेही आहेच की यासाठी काही कोणतं सर्टिफिकेट नाही की अवॉर्ड नाही, पण स्वतःच्या समाधानापुढे अजून काय हवं? 😊 

आमच्या पूर्वीच्या इमारतीत, तळमजल्यावर एक खोली होती जिथे दोऱ्या बांधलेल्या होत्या, त्यावर कपडे वाळत घालता यायचे. हा कॉमन एरिया होता. आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहायचो आणि lift नव्हती. त्यामुळे चढ उतार बरीच व्हायची. त्यामुळे आम्ही शक्यतोवर वर बाल्कनीतलाच स्टँड वापरायचो. पण आई बाबा आले की आवडीने सगळे कपडे घेऊन खाली जायचे आणि तिथे वाळत घालायचे. इथे खाली कपडे जसे वाळतात तसे बाल्कनी मध्ये वाळत नाहीत असं त्याचं ठाम मत होतं. विशेषतः चादरी,  पांघरूण असे मोठे कपडे तर तिथे वाळत घालणं सोयीचं होतं. शिवाय तिथे हीटर होतं, त्यामुळे हिवाळ्यात पण कडकडीत कपडे कोरडे व्हायचे. सवयीने आम्ही पण ती खोली भरपूर वापरायला लागलो. ते घर सोडताना या खोलीचा फोटो काढायचा राहून गेला हे मला आज जाणवलं. 

कडक हिवाळ्यात गरज म्हणून ड्रायर वापरला जातो (वॉशिंग मशीन आणि ड्रायर वेगळे, या ड्रायर मध्ये कपडे पूर्ण वाळतात, घड्या करून कपाटात ठेवता येतील असे) पण जरा हवामान चांगलं झालं की पुन्हा गार्डन मध्ये मोकळ्या हवेत माझ्या पध्दतीने रमत गमत हे काम करते. घरून काम करताना काही वेळा लंच ब्रेक मध्ये जेवण करून, मग उरलेल्या वेळेत हे काम होतं. एकीकडे आकाशातले रंग, झाडाजवळ आलेले पक्षी हेही सगळं दिसत असतं. तो कपडे झटकण्याचा आवाज, कपड्यांचा वास हे सगळं तंद्री लागेल असं असतं. त्यातून अंगावर येणारे तुषार वॉशिंग मशीन मधल्या कपड्यांमधून अनुभवता येत नाहीत एवढंच, आणि जाहिरातीत किंवा सिनेमात दाखवतात तसा नवरा काही रोमँटिक होत नाही 😂. आताही बाबा इथे आले की लगेच हे काम त्यांच्यावर सोपवलं जातं. 

काही घरातली कामं ही आवडीने केली जातात, काही करायची म्हणून. कपडे हाताने धुण्याचा मला कंटाळा आहे आणि वाळत घालण्याचा उरक. मागच्या काही दिवसात त्याच दरम्यान सुचलेलं हे सगळं 😊 

मधुरा देशपांडे शेंबेकर
१५-०७-२०२५

No comments:

Post a Comment