Sunday, July 6, 2025

कोल्हापुरी चप्पल, Prada आणि क्रेडिट्स

Prada आणि कोल्हापुरी चप्पल हा मुद्दा सध्या गाजतो आहे. कोल्हापुरी चप्पल Prada ने कोणत्याही क्रेडिट शिवाय उचलून ते डिझाईन काहीच्या काही किमतीला मार्केट मध्ये आणलेत.  जगभरातून याचा निषेध नोंदवला गेला. या सगळ्याचा परिणाम म्हणून आता योग्य क्रेडिट दिले गेले आहेत. पूर्वीही अशा घटना झाल्या असतील, पण आता कदाचित सोशल मीडिया मुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहचलं आणि योग्य पावलं उचलली गेली. 

या सगळ्यावरून काही जुन्या गोष्टी आठवल्या...

ऑफिस मध्ये आपण केलेलं काम एखादी दुसरीच व्यक्ती सहजपणे स्वतःच्या नावाने खपवते तेव्हा आपण पहिल्या वेळी अवाक होऊन बघत राहतो. मग ही दुनियादारी समजायला लागते, असे अजून लोक भेटत राहतात. हे सगळं ते बिनधास्त आणि आत्मविश्वासाने जमवतात. कसं जमतं, मुळात कश्याला करायचं असं असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आपण बरं आणि आपलं काम बरं, आपण चांगलं काम केलं तर ते दिसेलच, पुढे पुढे कश्याला करायला हवं या मानसिकतेला तडा जातो. असे धक्के पचवत  "आपलं काम नुसतं करून भागत नाही, ते सांगावं लागतं, लिहून ठेवावं लागतं" हे धडे आपण शिकतो. त्यातले काही बदल जमतात, काही नाही. हे क्रेडिट हिरावून घेणारे तसेच असतात, त्यांना नवनवीन लोक सापडतात, सगळं पुढे सुरू राहतं..देश बदलला तरी काही प्रकार युनिव्हर्सल असतात. 

चार वर्षांपूर्वी मी एका प्रोजेक्ट वर काम करत होते. प्रोजेक्ट वर्क खूप जास्त आणि प्रत्येक आठवड्याच्या डेडलाइन होत्या. खूप मनापासून त्या प्रोजेक्ट मध्ये काम केलं होतं. कामाचे तास आणि कामाचं स्वरूप दोन्ही आव्हानात्मक असून बरेचदा over the board जाऊन काम पूर्ण केलं होतं. प्रोजेक्ट संपला तेव्हा मात्र मी आणि अजून एक कलीग सोडून इतर तीन लोकांची नावं त्यावर दिसली. याबद्दल विचारलं असता "तुम्ही मुली फार मनाला लावून घेता गोष्टी, एवढं काय त्यात" अशी एका बॉसची प्रतिक्रिया होती. तेव्हा मी नाराजी दर्शवली तरी जेवढं बोलायचं होतं ते बोलताच आलं नव्हतं. क्रेडिट न मिळणे यापेक्षाही त्याबद्दल काहीही जाणीव नसणे हे मनाला फार लागलं होतं. 

अजूनही असे लोक भेटत राहतात. व्यक्ती वेगळ्या असतात, प्रसंग बदलतात, परिस्थिती वेगळी असते. आता असं होऊ द्यायचं नाही हे कितीही ठरवलं, तरी अधून मधून आपण बळी पडत राहतो. 

ग्रुपने मिळून करायच्या अनेक activities मध्येही हे कायम होत असतं. प्रत्येकाचा समान सहभाग हे कागदावर राहतं. आणि शेवटी क्रेडिट मात्र सगळ्यांना मिळतं. किंवा या सगळ्यात आपलं योगदान किती जास्त होतं हे "सांगणारे" लोक जास्त वाहवा मिळवू शकतात. 

घरात, विशेषतः स्वयंपाकघरात पदार्थांचे, त्यामागच्या कष्टांचे क्रेडिट योग्य व्यक्तीला दिलं जात नाही अशी अनेक उदाहरणे आपल्या आजुबाजूला दिसतात. एखाद्याला योग्य क्रेडिट देण्यासाठी मनाचा जो मोठेपणा लागतो तोच मुळात नसतो. 

आता तर AI कडून अनेक गोष्टी करवून घेता येतात. परवाच इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ पाहिला ज्यात एक मुलगी Interview देत होती आणि पूर्ण वेळ एकीकडे फोन वर उत्तरांसाठी AI वापरत होती. यावर आलेल्या कमेंट्स मध्ये "आम्हाला हे शिकायचं आहे" असं म्हणणारे अनेक होते, पण कुणालाही यात चुकीचं वाटत नव्हतं. काम सोपं करण्यासाठी AI वापरणे यात काही चूक नाही पण Interview त्याच्याच बळावर देणे हे योग्य नाही. फक्त AI ही एखादी व्यक्ती नसल्यामुळे कुणाच्या भावना यातून दुखावल्या जाणे हे होणार नाही 😉 

असो पण जगात सगळीकडेच कोल्हापुरी चप्पल सारखाच आपला वापर करवून घेणारे अनेक जण असतात. काहींना उशीराने का असेना न्याय मिळतो, कित्येकांना मिळतच नाही. एकूणच आपलं काम हे "आपलं" आहे हे काही वेळा सतत ठासून सांगावं लागतं. हे जमतं असं नाही, पण प्रत्येक वेळी नवीन अनुभवातून आपण थोडं थोडं बदलत जातो. दुसऱ्याचं क्रेडिट घेत नाही, पण आपल्या कामाबद्दल थोडं बोलण्याबद्दल जागरूक होत जातो. कोल्हापुरी चप्पल बाबत न्याय मिळाला, त्यामुळे अशा वेळी निषेध नोंदवणे आणि त्यातून दखल घेतली जाणे हे उदाहरण लक्षात ठेवण्यासारखं आहे. 

मधुरा देशपांडे शेंबेकर 
०६-०७-२०२५

No comments:

Post a Comment