यावर्षी बाबांच्या वाढदिवसाला भारतात जायचं आणि बाबांना सरप्राइज द्यायचं असं मी मागच्या वर्षीपासून ठरवलं होतं. पण हाताच्या दुखापतीने सगळे बेत बारगळले. आज वाढदिवसानिमित्त ही पोस्ट खास बाबांसाठी -
मला ज्या काही आठवणी ठळक पणे आठवतात ते बाबा -
- खाकी ड्रेस घालून ऑफिसला जाणारे..अनेक जण त्यांना पोलिस समजत, पण ते एस टी ऑफिस मध्ये होते..
- आई कॉलेज मध्ये गेली की सकाळी माझं सगळं आवरून डबा भरून मला तयार करून देणारे..
- मी अभ्यास करायचे त्या काळात अलार्म न लावता मला उठवणारे..
- क्रिकेट खेळणारे बल्लू देशपांडे म्हणून आजही बुलढाण्यात अनेकांच्या आठवणीत असणारे
- वेळ पाळण्याच्या बाबतीत अतिशय काटेकोर असणारे..
- महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी म्हणून अभिमान असणारे, लाल डबा असं कुणी म्हटलं तर वाईट वाटणारे..
- मला नोकरी लागल्यावर, आता एसटी पासमधून तुझं नाव काढतो तू आता या सोयी घेऊ नकोस हे सांगणारे (अतिशय प्रामाणिकपणा आणि कोणत्याही सुविधांचा गैरफायदा घ्यायचा नाही असं तत्व असणारे)
- ऑफिस मधून काम घरी आणून रात्री रात्री ते जागून करणारे
- सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवणारे आणि त्यांना आवर्जून शुभेच्छा देणारे..
- कोणतीही अपेक्षा न ठेवता कामं करणारे..
- गल्लीत कुणालाही मदत हवी असेल तर करणारे..
- करोना काळात ओळखीच्या लोकांना डबे नेऊन देणारे..
- भावांच्या आजारपणात दवाखान्यात रात्री जागून काढणारे
- पाण्याच्या दुष्काळात बाकीच्यांकडे पाणी नाही म्हणून आमच्या बोअर वेलला असणारं पाणी सगळ्या गल्लीसाठी देणारे (विना मोबदला)
- इथे आले की इथल्या गल्ल्या गल्ल्या पालथ्या घालणारे..
- इथल्या अनेक गोष्टींचं, व्यवस्थेचा बारीक निरीक्षण करणारे
- मला दवाखान्यात रोज डबा आणून देणारे, त्यासाठी इथली बस सिस्टिम समजून घेऊन बरोबर सगळं एकट्याने
- अत्यंत तापट अशीही एक प्रतिमा असलेले..
- खाण्याच्या बाबतीत फार बंधनं असणारे..ठरावीक चारच प्रकार खाणारे, त्यात प्रयोगांना अजिबात वाव नसणारे..
- व्यायामाचा कंटाळा असणारे..
- कधीकधी काही अनावश्यक प्रश्न विचारणारे..
- तरी बऱ्याच बाबतीत अतिशय भिडस्त असणारे..
- स्वच्छता आणि टापटीप फार प्रिय असलेले
- कपडे धुणे, नीटनेटके कपडे वाळत घालणं, घरात झाडू पोछा सगळी कामं नेहमी करणारे..
- आता कंटाळा आला की सृजनचे व्हिडिओ बघत बसणारे..
- वेळ जावा म्हणून पझल लावत बसणारे, शब्दकोडे सोडवणारे..
- फोनवर मराठी टायपिंग, त्यातले वेगळे Apps, शेअर्स अश्या कितीतरी नवीन गोष्टी समजून घेणारे
अजून काय काय आठवेल..सध्या इतकंच 😊
सृजन मध्ये बाबांचे अनेक गुणदोष उतरले आहेत, क्रिकेटची आवड, त्यातही बॉलिंगची आवड, मॅच बघताना बसण्याची स्टाईल ते खाण्याबाबत असणाऱ्या टोकाच्या नावडी, थोडा तापट स्वभाव (जो मीही घेतला आहे 😜)
आई सोबत जेवढं बोलणं होतं तेवढं बाबांशी होत नाही, पण ते शांतपणे असतात सोबतीला..काळजी करू नकोस हे सांगायला..वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाबा..Happy Birthday 🎂
मधुरा देशपांडे शेंबेकर
०४-०४-२०२६
No comments:
Post a Comment