फेसबुक आणि अल्गोरिदम
कर्म, नशीब, राशिभविष्य, अंकशास्त्र यांच्यानंतर या यादीत येऊ शकेल असं अनाकलनीय आणि गूढ काय असेल तर फेसबुक अल्गोरिदम. कोणत्या लेखाचा रिच किती असेल, कुठपर्यंत तो पोचेल, कोणता अनपेक्षितरीत्या व्हायरल होईल आणि कोणता फ्लॉप होईल हे सगळं ठरवणारा प्रकार म्हणजे हा अल्गोरिदम. नेमका कसा तो काम करतो, हे त्या नियती प्रमाणेच अनिश्चित. पडवळासारख्या भाजीबद्दल लिहिलेला एक प्रसंग, त्यावरचा लेख ९०००० व्ह्युज मिळवतो, आणि नाहीतर अनेक चांगले वाटलेले लेख दहा जणंही वाचत नाहीत.
वरवर बघता हा अल्गोरिदम तुम्हाला विविध प्रकारच्या व्रतवैकल्यात अडकवायला बघतो.
कर्मकांड, व्रतवैकल्ये यांनी आपलं नशीब बदलू शकतं असं सांगणारे, जसे अमुक व्रत करा मग हे मिळेल, तमुक पूजा केली की ही फलप्राप्ती होईल सांगतात, त्याच पद्धतीने इथे फेसबुक सांगत राहतं. प्रोफेशनल मोड मध्ये फेसबुक वापरत असाल तर एका आठवड्यात ७ पोस्ट, ७ रीळ, २० फॉलोअर मिळवा अश्या या अटी असतात, इथे तमुक महाराजांचे नाव लिहा होईल फलप्राप्ती अश्या पोस्ट दिसतात त्याच धर्तीवर हे असतात.
बरं हे सगळं पूर्ण करायला चुकून जमलं तर पुढे "कारल्याचा वेल लाव गं सुनबाई" या गाण्यासारखं, अजून ग्रुप पोस्ट करा, अजून इथे कमेंट द्या वगैरे नवीन व्रतांचे प्रकार सांगितले जातात. यात मधल्या काही स्टेप नंतर, व्रतांचे उद्यापन साजरे व्हावे म्हणून मग हा क्रिएटर badge मिळतो, तेवढ्यापुरता आपल्या टाइमलाइन वर टाकून आपण खुश होतो. पण मग त्याचाही कंटाळा येतो. म्हणजे हे बॅज मिळतात ते छान वाटतं, अजून चांगलं करायला हवं असं वाटतं. पण फेसबुकची गणितं किती वेळ सोडवत बसणार. इथून ज्यांचे बिझीनेस चालतात, ज्यांचे प्रॉडक्ट आहेत, त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण हौशी लिखाण करताना हे सगळं अजिबात सोपं नाही.
त्यामुळे खऱ्या आयुष्यात जसं अश्या कोणत्याही बाबींना, कर्मकांडांना मी अजिबात बळी पडत नाही, तसंच इथेही, खरंखुरं आतून आलेलं, वाटलेलं, पाहिलेलं असं तेवढंच प्रामाणिकपणे पोस्ट करते. मग त्याचे परिणाम दिसतात, पण त्या पलीकडे आयुष्य आहे. नंबर्स साठी काहीही करायचं नाही हे पक्कं माहित आहे, त्यामुळे तेही ठीकच आहे.
बाकी हा लेख तुमच्यापर्यंत पोचला असेल, तुम्ही इथपर्यंत वाचला असेल, आवडला असेल तर एक लाइक अवश्य करा, त्याने हुरूप येतो. माझे युट्यूब व्हिडिओ बघितले नसतील तर त्याचीही लिंक आहे, तेही बघू शकता. आणि माझे इतरही लेख जे माझ्या प्रोफाईल वर आहेत तेही वाचू शकता.
मधुरा देशपांडे शेंबेकर
२३-०१-२०२६
No comments:
Post a Comment