Monday, June 15, 2026

बालपणातली ओळख

आज मेमरीमध्ये हे फोटो आणि एक लेख दिसला. तो लेख खूप मोठा आहे, पण याच फोटोंवरून नवीन थोडं सुचलं म्हणून त्याबद्दल..

मी प्राथमिक शाळेत असताना, दुसरीत किंवा तिसरीत होते तेव्हा एका शिबिराला गेले होते, तिथले हे कागद. आई बाबांनी जपून ठेवले आहेत. हे सगळं पुन्हा वाचताना तेव्हा आपण कसे होतो, आजुबाजूला कसं वातावरण होतं हे आठवून त्यावर विचार केला तर बऱ्याच गोष्टी जाणवतात. 


वय साडेसात असताना वाचन बरंच चांगलं होतं हे यातून दिसतं, कारण आवडते कवी कुसुमाग्रज लिहिले आहेत आणि लेखक साने गुरुजी. 😅 आवडती व्यक्ती बाबा आहेत 😁 आणि बहुतेक त्यांच्यामुळेच कपिल देव हा आवडता खेळाडू लिहिलं असावं. आवडते खेळाडू नंतर बदलत गेले, बाबा आवडती व्यक्ती कायमच आहेत 😊 गुलाबजांबू हे 😂 आहे. आई तेव्हा घरी केक करायची त्यामुळे आवडता खाद्य पदार्थ केक हे समजण्यासारखं आहे. येणाऱ्या कला यात गाणं कुठून लिहिलं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे😆. रांगोळी ही माझी ओळख होती खरंच, आता वर्षानुवर्ष अजिबातच सराव नाही. 😏


गेल्या काही महिन्यात जर्मन पेजवर अनेकांनी तू आम्हाला भाषा शिकवशील का असं विचारलं. मी नम्रपणे नकार दिला, मी भाषा बोलत असले तरी औपचारिक पद्धतीने ती शिकवणे हा माझा प्रांत नाही असं सांगितलं. त्यावर काहींनी तुमच्याकडे teaching skills आहेत, तुम्ही शिकवलं तर आम्हाला समजेल असंही सांगितलं. आणि आता या कागदावर आवडीचा व्यवसाय म्हणून "शाळेतील बाई" हे बघून हसू आलं. माझ्या जर्मन व्हिडिओ मधून अप्रत्यक्षपणे सुद्धा काही जण जर्मन आणि स्वयंपाक दोन्ही शिकत आहेत ही आनंदाची बाब आहे. 😊 


आता यातले शिक्षक, मैत्रिणी यांच्याशी खूप संपर्क नाही, पण हा कागद म्हणजे खूप गोड आठवण आहे. समृद्ध बालपणाची साक्ष आहे. हे असं परदेशात राहून याबद्दल मी लेख लिहीन, तो अजून वेगवेगळ्या ठिकाणचे लोक वाचतील असं कधी त्या तेव्हाच्या मधुराने स्वप्नातही पाहिलं नसेल. आता इतक्या वर्षात विविध ठिकाणी जी काही स्वतःची ओळख निर्माण केली, जे काही मिळवलं त्यात हा कागदही तेवढाच महत्त्वाचा आहे. आपण पुढे भविष्यात काय करणार आहोत हे काहीही माहीत नसताना, यावर कोण काय म्हणेल इत्यादी शंका न घेता, जे मनात आलं ते तसं यात लिहिलेलं आहे. तेवढंच सहज, सोपं आणि खरं खरं जगण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न पुढेही करायचा आहे. 


मधुरा देशपांडे - शेंबेकर 

२८-०२-२०२६






 मागच्या आठवड्यात मीच काहीतरी शोधायला सृजनचं पहिल्या वर्गातलं एक पुस्तक बाहेर काढलं. ते नंतर सृजन वाचत बसला. कसं वाटतं आहे आता तीन वर्षांनी हे वाचायला असं विचारल्यावर nostalgic असं उत्तर आलं 😂 ही पिढी तीन वर्षात नॉस्टॅल्जिक होते आहे याचं मला हसू आलं. 


No comments:

Post a Comment