Monday, June 15, 2026

Keep notes वरील नोंदी

 माझ्या फोनवर सगळ्यात जास्त वापरलं जाणारं एक app आहे गुगल keep. आज थोडा वेळ होता तेव्हा बऱ्याच नोट्सचं वर्गीकरण करायचं, म्हणून काही लेबल add करत होते. त्या शेकडो नोट्स मध्ये काय काय सापडलं? 

डायरी / दैनंदिनी / जर्नल - वेळ आणि मूड असेल तर सविस्तर दैनंदिनी लिहिली जाते. कधी फक्त मुद्दे लिहून ठेवले जातात. कधी विस्कळीत अर्धवट लिहिलं जातं, नंतर जमेल तेव्हा ते नीट केलं जातं किंवा वर्षभरानंतरही ते तसंच दिसतं. 

सृजनच्या अनेक गमती जमती, आठवणी लिहून ठेवलेल्या असतात. आज शाळेतून येताना काय गप्पा झाल्या, त्याने उत्साहात सांगितलेल्या गोष्टी, शब्दांच्या केलेल्या कोट्या, बास्केटबॉल मध्ये एखाद्या unfair गेममुळे झालेला त्रास, त्याला रागावल्या बद्दल वाईट वाटणे असं काहीही यात सापडू शकतं. 


यातच मनातले असंख्य विचार, दिवसातले आवडलेले क्षण, झालेला त्रास, कधी त्यासाठी स्वतःला समजवायला सेल्फ टॉक हेही त्यात असू शकतं. हे नेहमी जमतं असं नाही पण त्या क्षणी वेळ असेल तर नक्कीच केलं जातं. एखादा लेखासाठी सुचलेला विषय, त्याचे मुद्दे हेही त्यात येतं. एखाद्या व्हिडिओ साठी विषय सुचला तर तो विषय आणि काही मुद्दे लिहिले जातात. व्हिडिओ पूर्ण झाल्यावर त्याच्या caption साठी काही ओळी लिहून ठेवल्या जातात. याशिवाय काही पाककृती लिहिलेल्या असतात. 


घरात नवीन फर्निचर करायचं होतं, तेव्हा जे काही प्लॅनिंग सुरू होतं, ती चित्र काढलेली असतात. कपाट इकडे की तिकडे, प्लॅन ए, प्लॅन बी, Ikea मधल्या कपाटांची नावं की इथे billy इथे besta वगैरे नोंदी केलेल्या असतात. 


प्रवासात एखादं छान गाव दिसलं, पण तिथे थांबणं जमणार नसेल तर त्याचं नाव लिहून ठेवलेलं असतं. म्हणजे पुढच्या वेळेला कधी त्या बाजूला गेलो तर जाऊ म्हणून. आता हे संदर्भ लिहून ठेवले तर ठीक आहे, पण काही वेळा संदर्भ लिहायचं विसरून जाते मग नुसत्या नावावरून अंदाज आला तरी नेमकं आठवत नाही. 


कामांच्या याद्याच याद्या असतात, किराणा सामान, भारतीय सामान, आठवड्याची कामं, महिन्याची कामं असे प्रकार असतात. याशिवाय घरातकाही कागदांवर याद्या असतात पण याही असतात. 


Reminder तर सतत असतात. उद्या इन्शुरन्स ऑफिस मध्ये जायचं आहे पासून कधी एखाद्या मैत्रिणीला काही माहिती पाठवायची असते, कामाच्या गडबडीत विसरायला नको म्हणून कुणाला फोन करायचा असेल तर तेही काही वेळा लिहिलेलं असतं. अगदी बेसिक पासून तर खूप महत्वाची अशी ही सगळी reminder असतात आणि फार उपयोगी वाटतात. 


मध्यंतरी voice input जास्त वापरत होते, तेव्हाच्या नोट्स म्हणजे स्वल्पविराम नाही, पूर्णविराम नाही अश्या असतात. पण ७०-८० टक्के काम त्याने होतं मग नंतर जाऊन हे दुरुस्त करता येतं. 


कागद घेऊन लिहिणे कितीही छान असलं तरी हल्ली तेवढी सवय नाही, आणि या नोट्स मुळे त्यात जमणारा वेग, गाडीत, घरात कुठेही पटकन लिहून काढता येण्याची सोय हे शेवटी वरचढ ठरतं. लिखाणाला लेखाचं स्वरूप येण्याच्या आधी जी काही खर्डेघशी असते ती या keep मध्ये होते. इथे मोजके लेख येतात, त्यामागे अनेक विस्कळीत विचार आणि शब्द अस्ताव्यस्त पसरलेल्या अवस्थेतल्या नोटस असतात. 


याशिवाय कित्येक गोष्टी इच्छा असूनही कधी नोट्स वर येण्यापूर्वीच विसरल्या जातात. कधी वेळ नाही, थकवा आला, लिहावं वाटतंय पण लिहिलं जात नाही, मूड नाही म्हणून राहून जातात. ज्या लिहिल्या जातात त्यातल्या कितीतरी गोष्टी इथे लिहिण्यासाठी नसतात, त्या आठवणी म्हणून माझ्यापुरत्या असतात. आज अर्धा तास या आठवणींमध्ये रमताना सुचलेली ही अजून एक नोट, की लेख? 😁 


मधुरा देशपांडे शेंबेकर 

२७-०३-२०२६





No comments:

Post a Comment