आम्ही लहान असताना पत्ते, सापशिडी, लुडो, बुद्धिबळ, व्यापार असे काही गेम्स होते, मोजकं साहित्य आणि अगदी कमी नियम असलेले असे. आताच्या भाषेत minimalistic होते आणि आयुष्य सोपं होतं.
पण मग जग बदलत गेलं आणि इतर गोष्टींसोबत बोर्ड गेम्स मध्येही क्रांती झाली. कल्पनाशक्तीला जितके उंच उडवता येईल तितके करून बघू म्हणत काही लोकांनी बोर्ड गेम्स डिझाइन करायला सुरुवात केली. त्यात दहा प्रकारचे कार्ड, त्या प्रत्येक कार्डाची अवघड नावं, त्यात चार रंग, काही कार्डच्या दोन्ही बाजूंना दोन वेगळी नावं, सोंगट्याना पर्याय म्हणून वेगळेच दहा प्रकार हे सगळं साहित्य add होत गेलं. प्रत्येक गेम वाल्यांनी मी काय वेगळं करू शकतो म्हणून रंजकतेच्या नावाखाली त्यात वेगवेगळे प्रयोग केले. शिवाय आकर्षक रंग, त्याहून आकर्षक पॅकिंगचे खोके यांचीही त्यात भर पडली. आणि याच क्रांतीच्या काळात आम्ही पालक झालो. यथावकाश अश्या गेम्सनी आमच्या आयुष्यात प्रवेश केला.
मग हे गेम समजून घेणे हा विषय किती अवघड आहे हे समजत गेलं. अतिशय बारीक अक्षरात सगळी माहिती लिहिलेला तो गुळगुळीत कागद आणि त्यातली जर्मन भाषा हे पहिलं आव्हान होतं. Challenge accepted म्हणून वाचायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला एकदम साहित्यिक वर्णन वाचूनच दमतो आणि मग Spielvorbereitung म्हणजे preparation for game याच्या अंतर्गत पानभर मजकूर असतो. ते सगळं समजून घेण्यापर्यंत मजल गेली तर पुढे अजून if else चे नियम दिलेले असतात. संयमाची परीक्षा असते. बरं आता त्यावरचे व्हिडिओ बघायला गेलो, तर तेही काही सोपं करून सांगत नाहीत. एकेक स्टेप समजून, pause play करत करत आधी तर नुसती पूर्वतयारीच होते आणि मग now you are ready to play म्हणे पर्यंत उत्साह पार दूरदेशी गेलेला असतो. तोवर आता स्वयंपाक काय करू असाही प्रश्न असतो. डायनिंग टेबल या सगळ्या गोष्टींनी भरून वाहतो.
नंतर ते खेळायला मजा येते वगैरे सगळं ठीक आहे, पण ते डिझाइन करणाऱ्यांना इतकं किचकट का करावं वाटतं, हा प्रश्न प्र त्ये क नवीन गेम उघडल्यानंतर आम्हाला पडतो. तरीही लेकाच्या आग्रहासाठी आम्ही खेळायला लागतो. मग शेवटी इंतजार का फल मीठा होता है म्हणत गेम रंगात येतो, चढाओढ सुरू होते आणि गेम संपतो. आता एकदा समजल्यावर पुन्हा खेळताना एवढा त्रास होणार नाही असं म्हणतो. आणि असं काही वेळा खेळून झालं की लेकाचा त्यातला इंटरेस्ट संपलेला असतो. मित्र आल्यावर ते गेम सोडून वेगळं काहीतरी खेळायचं असतं. तोपर्यंत नवीन एखादा गेम भेट म्हणून मिळतो आणि त्या instructions बघून धडकी भरते. 🤦
दर वेळी खोली आवरताना हे सगळे गेम दिसतात. इतकी मेहनत घेऊन शिकलो आहे, कुणाचीतरी आठवण आहे किंवा इतका छान खोका आहे 😂, तर ठेवू म्हणून जपून ठेवले जातात. गॅप नंतर पुन्हा तो कागद न बघता, कुणाला किती आठवतं आहे हे ऐकत खेळले जातात आणि आठवणी साठत जातात. ❤️
मधुरा देशपांडे शेंबेकर
१५-०५-२०२६
No comments:
Post a Comment