Monday, June 15, 2026

Mother's Day २०२६

रविवारची सकाळ, अलार्म न लावता झोपण्याचा दिवस. सकाळी जाग येते तेव्हा सृजन स्वतःची उशी सोडून माझ्या उशीवर डोकं ठेवून, मला एका कोपऱ्यात ढकलून झोपलेला असतो. पलीकडे एवढी जागा असून आईच्याच उशीवर हक्क दाखवणे म्हणजे Happy mother's day असं मी स्वतःलाच म्हणते आणि माझी सकाळ होते. मी उठल्याक्षणी तो पुन्हा स्वतःचं पांघरूण ओढून दुसऱ्या बाजूला शिस्तीत पुन्हा झोपून घेतो. 😁 

मग उशीरा उठल्यावर येऊन दहा मिनिट सोफ्यावर माझ्यासोबत कुशीत बसून सगळ्या गोड गप्पा होतात. शाळेत Muttertag साठी काहीतरी तयार केलं होतं पण ते माझ्याकडून तुटून गेलं असंही त्यात मला सांगण्यात येतं. ठीक आहे की म्हणून तो विषय संपतो. 


मग दुपारी पुन्हा एक संवाद होतो..


मी: हे अंडं उकडून ठेवलेलं आहे. फक्त स्वतः उठून घे. 

सृजन: हे कुठे फोडू मी? 

मी: माझ्या डोक्यावर 🤷

सृजन: अरे हां मी एक प्लेट घेतो आणि मग साल काढतो. 

मी: मग हे माहीत आहे तर असे प्रश्न का विचारतो 🤔 कसं समजावून सांगायचं काही बाबतीत हे मी स्वतःशीच सहाव्यांदा बोलते. तोपर्यंत पुन्हा एकदा एका जागी बसून खायचं हे मी किती वेळा सांगितलं आहे हे ऐकवावं लागतं. 


दिवसभर अखंड बडबड, प्रश्न, आईचं ऐकणे, ऐकून न ऐकणे, दुर्लक्ष करणे हे सुरू राहतं. 


आणि मग रात्र होते, आम्ही दोघं मिठ्या मारून सोबत सध्याचं आमचं आवडतं you are my cuppycake हे गाणं म्हणतो. मग तेच दोन तीन वेळा म्हणतो आणि शेवटी गुड नाइट म्हणत दिवस संपतो. 


आईपण निभावताना भरभरून प्रेम मिळतं आणि तेवढाच कसही लागतो. त्याच्यासाठी दहा गोष्टी करताना, त्याचे आनंदाचे उत्साहाचे क्षण अनुभवताना, त्याला काही लागलं तर त्या वेदना बघताना, त्याच्या सोबत असताना आणि नसतानाही आईपण सतत सोबत असतं. प्रेमाचा वर्षाव, शिस्त, नियम, जबाबदारी, कष्ट आणि अजून बरंच काही सातत्याने करावं लागतं. चुका होतात, वाईट वाटतं, जे जमत नाही त्याची टोचणी असते. कठोर होऊन काही वेळा "नाही" म्हणताना परीक्षा असते. कधी लोकांच्या त्याच्याबद्दल टिप्पण्या ऐकताना त्रास होतो. तरी एरवी भिडस्त असणारी मी सृजनसाठी लोकांशी स्पष्ट बोलते, तेव्हा आईपण जाणवतं. 


आजुबाजूच्या चांगल्या गोष्टींचं सृजन निरीक्षण करून त्याच्या नजरेतून सांगतो तेव्हा अभिमान वाटतो. शाळेतून येताना मी पडलो, पण रस्त्यावर ज्यांनी मला मदत केली ते खूप चांगले होते, हे रडत रडत सांगतो तेव्हा त्याही प्रसंगात त्याला जाणीव आहे याचं समाधान वाटतं. आपल्याला सापडत नसलेली वस्तू आईला कशी दिसते हे बघून आई कसं जमतं म्हणतो तेव्हा जीव सुखावतो. आत्ताच्या आत्ता हे ऐक ममा म्हणून हक्क गाजवतो तेही तेवढंच आवडतं. तू किती रागावते मला असं म्हणून दरडावतो..Chill ममा असं मलाच सांगतो तेव्हा..माझ्यावर रुसतो, चिडतो, तेव्हाही या त्याच्या सगळ्या व्हर्जन मला तेवढ्याच आवडतात..It's a blessing to be सृजनची आई ❤️


Happy mother's Day! 



No comments:

Post a Comment